आरोग्य

सदृढ महाराष्ट्र!

महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचं आरोग्य चांगलं, परिपूर्ण आणि निकोप असावं म्हणून...

आरोग्य सेवा म्हणजे फक्त आजारी पडल्यावर करावयाचे औषध-उपचार नव्हे. खर्‍या अर्थाने आरोग्य सेवा म्हणजे कोणी आजारीच पडू नये अशी व्यवस्था, आणि पडल्यास सहज, सोपे उपाचार करून बरे होता यावे अशी योजना!

असे आरोग्य स्वराज्य बनवण्याचा हा प्रयत्न.

प्रश्नाचं स्वरूप


महाराष्ट्रात आरोग्याची सर्वसाधारण काय स्थिती आहे?

 • राज्यातील ४७% टक्के घरात शौचालय नाही
 • शौचालय नसल्यानं साथीचे रोग पसरतात, रोगराई वाढते, लोक कामावर जात नाहीत, त्यांचा औषधपाण्यावर खर्च होतो आणि या सर्वांमुळे महाराष्ट्रावर दरवर्षी २४,००० कोटी रुपयांचा आर्थिक परिणाम होतो असं जागतिक बॅंकेच्या एका अहवालानुसार - जो देशाच्या पातळीवर केलेला आहे - सांगतो. म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाचं साधारण दरवर्षी २,००० रुपयांचं नुकसान दरवर्षी होतं. एका घरात साधारण ५ माणसं आहेत असं धरलं तर प्रत्येक घरटी सरासरी १०,००० रुपये! इतक्या खर्चात संपूर्ण राज्यात दोनदा किंवा तीनदा शौचालयं बांधता येतील आणि सार्वजनिक स्वच्छता खूप सुधारेल.

  जागतिक बॅंक आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या WSP ESI (Water and Sanitation Program - Economics of Sanitation Initiative नी त्यांच्या अहवालात म्हटलंय की भारतात दरवर्षी पुरेशी शौचालयं आणि सार्वजनिक स्वच्छता नसल्यानं ५३.८ बिलियन डॉलर्स इतका आर्थिक परिणाम देशावर होतो. आपण महाराष्ट्राची स्थिती देशाच्या तुलनेत बरी आहे असं मानलं तरी शौचालयं आणि सार्वजनिक स्वच्छता नसलयानं महाराष्ट्रावरचा आर्थिक परिणाम हा २४,००० कोटीच्या पुढेच जातो

 • महाराष्ट्रातील ४८% महिला अॅनिमिक आहेत किंवा अशक्त - फिकट आहेत आणि ५८% गरोदर महिला अॅनिमिक आहेत .
 • गरोदर महिला जर अॅनिमिक असतील तर त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होणार आणि मग कुपोषण आणि बालमृत्यूंचं प्रमाण वाढणार. येणारी पिढी ही अधिक सक्षम, सशक्त व्हायची असेल तर या गोष्टीकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे.

 • महाराष्ट्रात जे ३ जन्म होतात त्यातील एक जन्म घरी होतो, म्हणजे दवाखान्यात, डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत नाही
 • याचा परिणाम स्त्री-आरोग्यावर आणि बालमृत्यूंच्या प्रमाणावर होतो हे वेगळं सांगायला नको.

 • महाराष्ट्रात सुमारे ७८% उपचार हे खाजगी क्षेत्रात होतात
 • हे प्रमाण जगाच्या तुलनेत खूपच आहे. उदा. थायलंड मध्ये हे प्रमाण ३६% टक्के आहे. माणसाला खाजगी ठिकाणी गेल्याशिवाय चांगले उपचार मिळत नाहीत असा अनुभव आहे.

  एक आकडेवारी अशी आहे की भारतात दरवर्षी ४ कोटी लोक महागडे उपचार करावे लागल्यामुळे गरीबीच्या खाईत लोटले जातात. तसं असेल तर हीच गोष्ट महाराष्ट्राच्या बाबतीत ४०-४५ लाख लोकांपर्यंत असणार.

 • महाराष्ट्रातील दीड कोटी मुलांपैकी ३५% म्हणजे ५० लाख मुलं कुपोषित आहेत आणि दरवर्षी ८०,००० बालमृत्यू होतात

हे प्रमाण इतकं मोठं असेल तर महाराष्ट्राचं भविष्य कसं घडणार?

असं का होतं?


एक गोष्ट नक्की की आरोग्य म्हणजे फक्त औषधं, इस्पितळं नव्हे. आरोग्यावरून, आरोग्याच्या परिस्थितीवरून आपल्याला समाज कसा आहे ते कळतं. समाज कुठे आहे, तो कसा वागतो आहे, त्यात काय गफलती आहेत हे समजतं. समाजात आरोग्याची स्थिती ढासळणं हा एक परिणाम आहे, कुठल्यातरी गडबडीचा. उदाहरणार्थ, समजा एखाद्या समाजात बालमृत्यूंचं प्रमाण खूपच आहे. तसं जर असेल तर तो अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा परिणाम असू शकतो.

 • त्या समाजात भीषण गरिबी असू शकते.
 • मुळात जन्म देणारी आईच कुपोषित असू शकते.
 • अंधश्रद्धा असू शकतात.
 • इच्छा असली आणि परवडत असलं तरी तिथे सकस अन्न आईला मिळत नाही असं असू शकतं.
 • आईला मुलाची काळजी कशी घ्यायची ह्याचे संस्कार किंवा शिक्षण झालेलं नसू शकतं
 • प्रशिक्षित आरोग्य कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती उपलब्ध नाही असं असू शकतं.
 • उपचार करणारी यंत्रणा - दवाखाना, डॉक्टर नाहीत असं असू शकतं.
 • कदाचित दवाखान्यापर्यंत पोचता येत नाही असे रस्ते असतील, वाहनाची सोय नाही असं असू शकेल…

ही आणि यासारखी बरीच कारणं असू शकतात.

त्यामुळे एखाद्या समाजाचं "आरोग्य" ढासळलेलं असणं म्हणजे कुठेतरी त्या समाजाचा तोल बिघडला आहे, काहीतरी कमीजास्त झालं आहे हे नक्की. म्हणून ढासळलेली "आरोग्य स्थिती" हे काहीतरी चुकत असल्याचं लक्षण आहे.

चांगलं आरोग्य असणं ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि असं आरोग्य मिळणं ही राज्यात फार सहज गोष्ट झाली पाहिजे. अशा मूलभूत गोष्टींसाठी अतोनात पैसे मोजावे लागणं आणि त्या गोष्टी गरीबांना न परवडणं हे तर राज्याला लांछनास्पद आहे. हे सर्व कसं मिळणार, त्यासाठी काय करावं लागणार याची ही योजना.

काय करायला हवं?


एक छान गोष्ट आहे. एका राजाच्या दरबारात एक वैद्य असतो. तो राणीवर उपचार करतो. राणी बरी होते. राजा खूष होतो. त्या राजवैद्याला इनाम देतो, त्याचं कौतुक करतो. ते कौतुक झाल्यावर राजवैद्य म्हणतो "अहो राजे, तुम्ही माझं कौतुक करताय पण माझ्यापेक्षा माझा मोठा भाऊ फार हुषार आहे. मी तरी खूप औषधं दिली, पण तो याही पेक्षा कमी औषधात आणि अधिक परिणामकारक इलाज करतो."
राजेसाहेब म्हणतात, "कमाल आहे, वा!"
राजवैद्य पुढे म्हणतो "अहो हे काहीच नाही. माझा त्याच्या पेक्षाही मोठा भाऊ आहे, तो तर फारच श्रेष्ठ आहे."
"या पेक्षाही श्रेष्ठ?" महाराज विचारतात. "हो, हो. अहो त्याला तर आजार येणार हेच अगोदर समजतं. तो त्याचाच बंदोबस्त करतो, अगदी साध्या आहाराच्या आणि साध्या सूचना देऊन", राजवैद्य म्हणतो.

मूळ आरोग्य व्यवस्था अशी असली पाहिजे, ज्यामुळे मुळात लोक आजारीच कमी पडतील.

चांगलं आरोग्य हे साध्य आहे, साधन नाही…

आरोग्याचा प्रश्न खूपच मूलभूत आहे. त्याकडे फक्त 'सेवा' म्हणून किंवा 'दया' म्हणून किंवा 'कल्याण' म्हणून बघितलं जाऊ नये. तसंच आर्थिक विकास करण्याकरता आपल्याला सूदृढ लोकसंख्या पाहिजे, ती अधिक चांगली कामाला येईल इतकंही फक्त 'उपयोगी' दृष्टीनं त्याकडे पाहिलं जाऊ नये. तर महाराष्ट्रातील सर्वांचं आरोग्य चांगलं असावं हेच उद्दिष्ट असावं. समाजात कुणीही मुळात आजारीच पडू नये आणि पडलंच तर अत्यंत सहज, सोपी, सुटसुटीत आणि स्वस्त उपचार करावे लागावे अशी परिस्थिती हवी.

आरोग्य म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटनेनं "आरोग्य" या गोष्टीची फार सुटसुटीत व्याख्या केली आहे. म्हणतात: आरोग्याकडे निव्वळ रोगाचा किंवा काही अशक्तपणाचा अभाव इतक्या मर्यादीत अर्थानं पाहू नये, तर आरोग्य म्हणजे संपूर्ण उत्तम असं शारिरीक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य.

(WHO: Health is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity)

महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचं आरोग्य चांगलं असावं, परिपूर्ण असावं आणि निकोप असावं असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वाटतं.

म्हणून,

 • लोकांना आरोग्यपूर्ण जगता यावं असं वातावरण राज्यात निर्माण करायला हवं, टिकवायला हवं आणि वाढवायला हवं.
 • काही नेमके आरोग्याचे प्रश्न प्राधान्यानं सोडवू, जसं कुपोषण आणि बालमृत्यू, स्त्री-आरोग्य, मलेरिया-पोलियो-टी.बी., मानसिक आरोग्य, दारूमुक्ती.
 • आरोग्य स्वराज्य - सर्वांना परवडणारी आरोग्य-सेवा (सल्ला, उपचार, औषधोपचार, रूग्णालय सुविधा), प्रत्येकाच्या घराजवळ उपचाराची व्यवस्था आणि आरोग्य विमा असेल हे पहायला हवं.
 • आरोग्य क्षेत्रातील गैरव्यवहार आणि लूट ह्यांना चाप लावायला हवी.

महत्वाच्या कल्पना


 • आरोग्य स्वराज्य.
 • ५००० क्रिडांगणे.

कार्यक्रम


लोकांना आरोग्यपूर्ण जगता यावं असं वातावरण राज्यात निर्माण करायला हवं, टिकवायला हवं आणि वाढवायला हवं.

म्हणजे नेमकं कसं वातावरण?

तर - स्वच्छ पर्यावरण, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, अन्न-सुरक्षा, दर्जेदार आहार, शांतता, सार्वजनिक स्वच्छता, निकोप वातावरण असेल ते, आणि जिथे शाळेत आरोग्य-शिक्षण मिळेल.

सगळेच आरोग्यपूर्ण जगतील, आणि रोग झाला की तो बरा करण्याची व्यवस्था लावण्याच्या आधी तो रोगच होऊ नये म्हणून वातावरण निर्माण करण्यासाठी काही पावलं उचलावी लागतील.

 • कडेवर मूल घेऊन आई उपचार घेऊ शकेल इतक्या अंतरावर आरोग्य-केंद्र
 • पळत पळत खेळायला जाता येईल इतक्या अंतरावर क्रिडांगण
 • जेष्ठ नागरिकांना चालत जाता येईल इतक्या अंतरावर बाग

 • प्रत्येक वस्ती ला स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, सार्वजनिक स्वच्छता, शांतता, मनोरंजनासाठी मोकळ्या जागा - उद्यानं, बागा, क्रिडांगणं
 • एका विशिष्ठ घनतेपेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर त्यात हळूहळू बदल होईल असं पाहणं, तशी धोरणं आखणं
 • सार्वजनिक वितरण व्यवस्था - व्हाऊचर पद्धत सुरू करणं
 • घर तेथे शौचालय, परसबाग, शोषखड्डे
 • सर्वांना परवडणारी आरोग्य सेवा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला
 • सर्वांसाठी संपूर्ण आरोग्य
 • प्रत्येकाला "आरोग्य कार्ड"
 • "महाराष्ट्र औषध महामंडळ" - तमिळनाडच्या धर्तीवर स्वस्त औषधं खरेदी करणं आणि
 • प्रत्येक तालुक्यात, शहरात प्रत्येक वॉर्डात जनेरिक औषधेच विकली पाहिजेत म्हणून तशी कायदेशीर तरतूद.

"आरोग्य" म्हणजे उत्तम शारिरीक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य असेल तर आरोग्याची व्याप्ती फार मोठी आहे. आज दुर्दैवानं महाराष्ट्रात खेळ-संस्कृती लोप पावली आहे, विरून गेली आहे. एकेकाळची महाराष्ट्राची "ओळख" लढवय्या महाराष्ट्र अशी असताना ही अवस्था आपल्याला पालटवली पाहिजे. महाराष्ट्रात आज कित्येक तरूण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. शाळेतली लहान, लहान मुलं गुटखा आणि तंबाखूसाठी पानटपरीच्या पुढे उभी असलेली आपण सर्वत्र पहातो. हे चित्र अत्यंत वेदना देणारं आहे. एका फार चांगलं वाक्य आहे, "तुम्ही मला तुमच्या युवकांच्या ओठावरची गाणी सांगा मी तुम्हाला त्या देशाचं भविष्य सांगतो". ह्याच धर्तीवर असं म्हणता येईल की "तुम्ही मला तुमची मुलं, युवक-युवती संध्याकाळी काय करतात ते सांगा मी तुम्हाला तुमच्या समाजाचं भविष्य सांगतो".

ही परिस्थिती पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संपुर्ण महाराष्ट्रात एकंदर ५,००० क्रिडांगणं (छोटी-मोठी) विकसित करण्याची आणि त्यात रोज वय वर्ष ६ ते १४ वयोगटातली प्रत्येकी १०० मुलं-मुली म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ५ लाख मुलं दररोज किमान एक तास क्रिडांगणावर खेळतील असा निश्चय केला आहे.

याची योजना अशी -

 • प्रत्येक क्रिडांगणावर एक पुरुष शिक्षक आणि एक महिला शिक्षिका, एक पुरुष सहाय्यक शिक्षक आणि एक महिला सहाय्यक शिक्षिका असेल. एक वरिष्ठ समन्वयक असेल.
 • ह्या सर्वांचं प्रशिक्षण होईल. त्यांना अनुभव असेल तर उत्तम पण नसेल तर ते भरून काढण्यासाठी विशेष प्रशिक्षण असेल.
 • इथे जी मुलं-मुली येतील त्यांच्याकडून नाममात्र शुल्क घेतले जाईल. त्यातून या शिक्षकांचे मानधन आणि क्रिडांगणाची देखभाल केली जाईल.
 • यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळांसारखी सार्वजनिक सांस्कृतिक मंडळं, तेथील सामाजिक-शैक्षणिक संस्था यांची मदत घेतली जाईल.
 • तेथील क्रिडांगण आणि तिथल्या सोयी अद्ययावत असाव्यात म्हणून तेथील औद्योगिक संस्था, व्यापारी संस्था यांनाही सहभागी करून घेतले जाईल.
 • यात काय शिकवावं आणि काय नाही याचेही संदर्भ साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.
 • या क्रिडांगणावर काही ठिकाणी काही विशिष्ट खेळांना - जशी मागणी असेल तशी - प्राधान्य दिले जाईल.
 • दर वर्षी शहर पातळीवर, तालुका-जिल्हा आणि राज्य पातळीवर स्पर्धा घेतल्या जातील.
 • जी गुणवान खेळाडू आढळतील त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत उतरवले जाईल.
 • या सगळ्यातून ऑलिंपिक, आशियाई सारख्या स्पर्धात ५ ते १० वर्षात महाराष्ट्राची कामगिरी सुधारेल.

"खेळण्याच्या वयातील महाराष्ट्रातील प्रत्येकजण संध्याकाळी किमान एक तास क्रिडांगणावर!" ह्यातून महाराष्ट्राचं सामाजिक आरोग्य तर सुधारेलच पण तरूण पीढीमध्ये एक सकारात्मक दृष्टीकोन तयार होईल.

नवा महाराष्ट्र ह्यातून घडेल!

तळटीप


 • http://www.wsp.org
 • National Family Health Survey (NFHS-3) India, 2005-06
 • Recommendations of the High Level Expert group, Constituted by the Planning Commission of India, 2011
 • डॉ. अभय बंग ह्यांचा लेख

Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.