डिजिटल जगात मराठी

संगणकावर, माहितीच्या महाजालावर मराठी

राज्यातल्या जास्तीत जास्त मराठी लोकांना तंत्रज्ञान वापरता यावे यासाठी इंटरनेटवर अधिकृत मराठी भाषा...

शहरातीलच नाही तर गावांतील लोकांच्या जीवनात आवश्यक होत चाललेल्या महाजाल म्हणजेच इंटरनेटचा उपयोग महाराष्ट्रातील मराठी लोकांनी आपल्या विकासासाठी जास्तीत जास्त करून घेतला पाहिजे. केवळ इंग्रजी भाषा शिकलो नाही म्हणून आजचा मराठी तरूण या तंत्रज्ञानापासून वंचित राहायला नको. मराठी समाजाची भाषा, अस्मिता जपण्याबरोबरच बहुसंख्य लोकांना कोणताही बागुलबुवा न दाखविता, सहज तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी मराठी संगणक व इंटरनेटवर मराठी भाषा असावी अशी आग्रहाची भूमिका आम्ही मांडत आहोत.

प्रश्नाचं स्वरूप


आजच्या संगणक युगात मराठी भाषेचा संगणकामध्ये वापर सहजसोपा नाही. संगणकावर जगभर (भारतात व महाराष्ट्रात) इंग्रजी भाषा ज्याप्रमाणे दिसते, प्रदर्शित होते, टंकलिखित केली जाते, त्याप्रमाणे मराठी भाषा (किमान महाराष्ट्रात) सर्व संगणकांवर दिसेल, वापरता येईल अशी परिपूर्ण व्यवस्था अस्तित्वात नाही; ही एक महत्वाची समस्या आहे; याची जाणीवही शासकीय पातळीवर नाही. तसेच सांस्कृतिक संस्था, साहित्यिक, प्राध्यापक, संगणकतज्ञ, संगणक साक्षर मराठी नागरिक यापैकी काही निवडकच जण या समस्येचा, यामुळे होणार्‍या मराठी भाषेच्या र्‍हासाचा विचार करत असले तरी त्याला आज बळ मिळत नाही. ज्या सहजतेने इंग्रजी भाषा संगणकावर दिसते, वापरली जाते व आकर्षक पध्दतीने प्रदर्शित करता येते, तेवढ्याच सहजतेने मराठी भाषेबाबत या गोष्टी घडत नाहीत.

असं का होतं?


संगणकाची निर्मिती, त्याविषयीचे संशोधन व विकास या गोष्टी प्रामुख्याने इंग्रजी भाषिकांकडूनच घडल्या आहेत, त्यामुळे संगणक व इंग्रजी असे स्वाभाविक समीकरण तयार झाले आहे. या स्वाभाविक समीकरणामुळे आणि स्वभाषा प्रेम व स्वभाषाभिमान नसल्यामुळे भारतातील (अर्थातच महाराष्ट्रातीलही) बहुसंख्य नागरिकांना संगणकाला इंग्रजी भाषाच कळते असे वाटते. संगणक केवळ इंग्रजी भाषेतूनच काम करु शकतो, असे सर्वांना वाटते. असा गैरसमज कायम ठेवून लोक इंग्रजी भाषा शिकतात, संगणकावर प्रभुत्व मिळवतात, पण स्वभाषा सहजगत्या संगणकावर का वापरता येत नाही हा विचारही करत नाही.

मूळात मराठी संगणकावर वापरता यायलाच हवी, मराठी लिपी जगात सर्वत्र काहीही अडचण न येता दिसायला हवी हा आग्रह नाही, या मुद्याविषयी कोणालाही आच नाही. आग्रह नसल्यामुळे संगणक उत्पादक, संगणक विक्रेते, सायबर कॅफे चालक, देखभाल-दुरुस्ती करणारे (हार्डवेअर, सॉफ्टवेअरवाले), संगणक अभियंते आणि सर्वसामान्य संगणकधारक, संगणक वापरणारे यांपैकी खूप कमी जणांना युनिकोडप्रणित मराठीची माहिती आहे. त्यामुळे संगणकाची खरेदी-विक्री होताना, काही छोट्या-मोठ्या प्रणाली (सॉफ्टवेअर्स) तयार करताना किंवा देखभाल दुरुस्ती होताना युनिकोड-मराठी या मुद्याचा विचारच होत नाही.

संगणकावर मराठी भाषा येण्यासाठी आग्रह नाही; शासनाचा कायदा नाही; त्यामुळे उत्पादकांनाही या विषयाशी देणे-घेणे उरलेले नाही. त्यामुळे खाजगी उद्योग, कंपन्या, त्यांची कार्यालये, अनेक आर्थिक-शैक्षणिक-औद्योगिक संस्था; छोटी-मोठी दुकाने, मॉल्स अशा ज्या ज्या ठिकाणी संगणकाच्या माध्यमातून व्यवहार होतात; त्या त्या ठिकाणापर्यंत युनिकोड-मराठी पोहोचलेली नाही. ग्राहकही आवर्जून 'मराठी' ची मागणी करत नाहीत. त्यामुळे या सर्व ठिकाणचे संगणकीय व्यवहार इंग्रजीतूनच होतात.

काय करायला हवं?


  • सर्व स्तरांवरील प्रशासनामध्ये युनिकोडप्रणित मराठीचा अंतर्भाव करायला हवा.
  • संगणकावर एकच मराठी लिपी.
  • मराठीतून संगणक शिक्षण व संगणकावर मराठीचे शिक्षण.
  • महाजालावर अधिकाधिक मराठी.
  • मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान विद्यापीठ.

महत्वाची कल्पना


  • महाराष्ट्रात विकल्या जाणार्‍या प्रत्येक संगणकावर मराठी कळफलक तसेच युनिकोड असेल तरच त्याची विक्री केली जाऊ शकेल असा नियम.

कार्यक्रम


मराठीचे संगणकीकरण व संगणकाचे मराठीकरण यांबाबत विशेष जोमाने प्रयत्न करायला हवेत. युनिकोड प्रणाली व युनिकोडप्रणित मराठी यांचा सर्वत्र प्रसार करायला हवा. संशोधन, शिक्षण – प्रशिक्षण व प्रसार आणि कायदे व नियम या माध्यमातून युनिकोड – मराठीचे सार्वत्रिकीकरण करायला हवे.

संगणकावर मराठीचा वापर अधिकाधिक झाल्यानंतर संगणकाच्या माध्यमातून होणारा कोणत्याही क्षेत्रातील, कोणताही व्यवहार मराठीतून होणे सहज साध्य असायला हवे.

सर्व स्तरांवरील प्रशासनामध्ये युनिकोडप्रणित मराठीचा अंतर्भाव करता येऊ शकेल. त्यामुळे परस्पर संपर्कात एकजिनसीपणा व सुसूत्रता येईल. तसेच ई-गव्हर्नन्सचा योग्य तो परिणाम साधला जाईल. त्याचप्रमाणे खाजगी उद्योग, विविध प्रकारच्या सेवा संस्था, त्यांची कार्यालये, दुकाने यांनीही युनिकोडप्रणित मराठीचा वापर संगणकावर करावा यासाठी योग्य ती उपाययोजना करायला हवी.

इंग्रजी भाषाच संगणकाला कळते, संगणकावर वापरता येते असा बहुसंख्य लोकांमध्य गैरसमज आहे. परंतु मराठीही संगणकावर सहज वापरता येते ही खरी सद्यस्थिती आहे.

यावर उपाय म्हणून मराठीच्या संगणकीकरणाचा प्रसार, याचे प्रशिक्षण व आणखी संशोधन इत्यादी गोष्टी करणे अत्यावश्यक आहे. पण त्या न करता आपण संगणकाला इंग्रजीच कळते असा गैरसमज कायम ठेवून इंग्रजी शिकतो, त्याचे महत्व वाढवतो व इंग्रजीतूनच संगणक वापरतो (पण मराठीच्या संगणकीकरणाकडे जात नाही). हे एका अर्थाने द्राविडी प्राणायाम केल्यासारखे आहे.

श्री लिपी, आकृति, शिवाजी, कृतीदेव, लोकसत्ता अशा विविध ठिकाणी वापरल्या जाणार्‍या विविध' 'फॉंट्स' पेक्षा महाराष्ट्र शासनाने प्रमाणित केलेली 'एकच मराठी लिपी' (या लिपीचे २०-२५ फॉंट्सचे प्रकार) खरेतर संगणकधारकांसाठी उपलब्ध असायला हवी. ही प्रमाणित लिपी (संगणक उत्पादकांच्या विक्रेत्यांच्या माध्यमातून) महाराष्ट्रातील प्रत्येक संगणक धारकाकडे असायलाच हवी असा कायदा शासन निश्चितच करु शकते. हे करण्याची इच्छाशक्ती आमच्याकडे आहे.

मराठी भाषा (देवनागरी लिपी) टंकलिखित करणे, मराठी माहिती जगातील सर्व संगणकांवर दिसणे यांबाबत पूर्वी काही तांत्रिक समस्या होत्या पण आता युनिकोड प्रणालीमुळे या सर्व समस्या सुटल्या आहेत. युनिकोड प्रणालीच्या माध्यमातून मराठीचे संगणकीकरण सहज शक्य झाले आहे. म्हणजेच मराठी संगणकांवर वापरणे व मराठी माहिती व ज्ञान महाजालावर उपलब्ध करुन देणे सहज साध्य झाले आहे, या साध्या-सोप्या-छोट्या पण महत्वाच्या मुद्याचा कल्पकतेने व प्रभावीपणे प्रसार करायला हवा. प्रशिक्षण कार्यक्रम व प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचवायला हवा.

महाराष्ट्रातील प्रत्येक संगणकधारकांपर्यंत युनिकोड प्रणालीचा व संबंधित मराठी टंकाचा प्रसार होण्यासाठी प्रत्येक संगणक विक्रत्याने संगणक विकताना मराठी भाषा युनिकोड प्रणालीच्या माध्यमातून कार्यान्वित करुन द्यावी असा कायदाच करण्यात येईल. याबाबत संगणक उत्पादक, प्रणाली बनवणार्‍या कंपन्या यांच्याशीही संपर्क साधता येऊ शकेल.

संगणक विक्रेते, सायबर कॅफे चालक, शाळा-शाळांतील संगणक शिक्षक, सर्व विद्यार्थी, सर्व संगणकधारक यांना संगणकावर युनिकोड प्रणालीच्या माध्यमातून मराठी कार्यान्वित करणे व टंकलेखन करणे याबाबतचे छोटे, १ ते ३ तासांचे प्रशिक्षण देता येईल. यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन करता येईल.

MSCIT च्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात युनिकोड प्रणित मराठीचा समावेश करता येईल.

शासकीय कार्यालयातील टंकलेखकांना व आवश्यक त्या सर्व कर्मचार्‍यांना युनिकोड प्रणित प्रशिक्षण देता येईल.

टप्प्याटप्प्याने विधीमंडळ ते ग्रामपंचायत असा सर्व कारभार युनिकोड प्रणित मराठीतून चालेल अशी व्यवस्था करता येईल.

मुळात 'संगणक' व 'माहिती तंत्रज्ञान' हा विषय संगणकाचा इतिहास, त्याच्या भागांची नावे, त्याचे फायदे अशा 'थिअरी' च्या स्वरुपातच जास्त प्रमाणात शिकवला जातो. संगणक हाताळायला मिळणे, त्याची सवय होणे, उपयोगितेच्या दृष्टीने जास्त प्रमाणात शिक्षण देणे या गोष्टी घडणे आवश्यक आहे.

'मराठीतून संगणक शिक्षण व संगणकावर मराठीचे शिक्षण' या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून; स्वतंत्र विषयाची, अभ्यासक्रमाची आखणी करुन तो शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. अशा अभ्यासक्रमाची आखणी करता येईल. युनिकोड प्रणित मराठीचे शिक्षण शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांना देता येईल. मुख्य म्हणजे संगणक विषयक शिक्षण मराठीतून देण्याची व्यवस्था टप्प्याटप्प्याने करता येईल. मराठी भाषा प्रमाणित इन्स्क्रिप्ट कळफलकाचे शिक्षणही शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना देता येईल.

महाविद्यालयीन स्तरावरही विशेषत: मराठी साहित्य व वाड्मय विषय घेऊन पदवी व पदव्युत्तर शिक्षण, घेण्यार्‍या विद्यार्थ्यांना 'संगणक व मराठी भाषा' याचे प्रशिक्षण अभ्यासक्रमातूनच दिल्यास विद्यार्थांच्या कौशल्यात भर पडेल व मराठी भाषेचा प्रसार व काही प्रमाणात विकास साधता येऊ शकेल.

युनिकोड प्रणालीतील अधिक आकर्षक मराठी टंक उपलब्ध करुन देण्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. या संशोधनाला योग्य ते प्रोत्साहन देण्यात येईल व या टंकाचा प्रसारही वेगाने होईल अशी व्यवस्था करायला हवी.

युनिकोड प्रणालीबाबत आजही काही छोट्या तांत्रिक अडचणी आहेत, त्यांचे तज्ञांच्या साहाय्याने निराकरण करता येईल.

संशोधकांच्या मते मराठी भाषेतील टंकलेखनासाठी प्रमाणित असलेला इन्स्क्रिप्टचा कळफलक संगणकधारकांना सहजगत्या उपलब्ध होणे आवश्यक आहे. या कळफलकाच्या उपलब्धतेसाठी विशेष प्रयत्न करता येतील.

महाजालावर अधिकाधिक मराठी

भाषा विकास व भाषा प्रसार होण्याच्या द्रुष्टीने संगणकावर व महाजालावर मराठीचा वापर वाढणे, मराठी भाषेतील प्रचंड माहिती महाजालावर प्रदर्शित करणे अतिशय महत्वाचे आहे, हे सूत्र सर्वसामान्य संगणकधारकांपर्यंत अधिकाधिक तीव्रतेसह पोहोचवता येईल.

महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, अशासकीय खाजगी संस्था-कंपन्या-संघटना यांच्या संकेतस्थळांचे मराठीकरण होण्यासाठी वेळ प्रसंगी कायदेशीर तरतूद करुन सर्व संकेतस्थळे मराठीतून माहिती देतील अशी व्यवस्था निर्माण करता येईल.

मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळ मराठीमध्ये अनुवादित करण्यात येईल. तसेच त्याच संकेतस्थळावर सर्व राज्यस्तरीय कायद्यांची माहिती मराठीतून देता येईल.

मराठी भाषेतील ग्रंथ, पुस्तके, नियतकालिके, हस्तलिखिते, कोशवाड्मय...इ. माहिती महाजालावर प्रदर्शित करण्याचे छोटे-मोठे प्रकल्प एक चळवळ म्हणूनच कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत सांस्कृतिक संस्था, प्रकाशन संस्था आणि संगणकीय प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी व अन्य शाखांचे विद्यार्थी यांचा समन्वय साधून; कल्पक उपक्रम राबवून अधिकाधिक मराठी साहित्य महाजालावर प्रदर्शित करता येईल.

आज मराठी भाषेतही अनेक सकस संकेतस्थळे निर्माण होत आहेत. खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ हे शब्दसंख्या, आकारमान, विषय व गुणवत्ता या मुद्यांचा विचार करता मराठी भाषेतील उत्कृष्ट संकेतस्थळ आहे, हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते.

मराठी साहित्य, संस्कृती, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, पर्यटन, प्रभावी व्यक्तिमत्वे...इ. विषयी माहिती देणारी अनेक संकेतस्थळे सध्या कार्यरत आहेत, काही निर्माण होत आहेत.अशा संकेतस्थळांना प्रोत्साहन व पाठबळ देता येईल. यांचा प्रसार करता येईल. प्रत्येक सायबर कॅफेमध्ये, ग्रंथालयात याबद्दलचे माहितीपत्रक व सूची ठेवण्याची व्यवस्था करता येईल.

ही संकेतस्थळे शासन, प्रसारमाध्यमे, खाजगी सांस्कृतिक संस्था यांच्या माध्यमातून निर्माण झालेली आहेत. या संकेतस्थळांचा महाजालावरच एकत्रित असा महाकोश / महासूची बनण्याची आवश्यकता आहे किंवा यांमध्ये किमान एकसूत्रता आणण्याची गरज आहे.

या दृष्टीने निर्माण होणार्‍या मराठी संकेस्थळांची महाजालावर व लिखित स्वरुपात नोंद ठेवणारी व समग्र सूची बनवणारी एखादी शासकीय किंवा अशासकीय मध्यवर्ती यंत्रणा निर्माण करता येईल.

महाजालावर मराठी या मुद्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन व याबाबतचे सोपे तंत्र शिकून सर्वसामान्य मराठी संगणकधारक अनुदिनी (ब्लॉग), फेसबुक, संकेतस्थळे या माध्यमातून मराठी भाषेतील माहिती प्रदर्शित करु लागला, तर मराठी भाषेच्या महाजालावरील विकासाला कोणीही रोखू शकणार नाही.

इंटरनेटच्या माध्यमातून तामिळ विकास व प्रसार; जगभरातील तामिळींचे जाळे विकसित करणे; जगात तामिळचे प्रशिक्षण देणे; तामिळ भाषा संगणक-सुलभ करणे या विषयांवर तामिळनाडूमध्ये २००१ पासून कार्यरत असणार्‍या Tamil Virtual University च्या धर्तीवर महाराष्ट्रात 'मराठी संगणक विद्यापीठ' किंवा 'मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान विद्यापीठ' स्थापण्यात यावे. या विद्यापीठामध्ये सर्व क्षेत्रांत (शासकीय, औद्योगिक, आर्थिक, शैक्षणिक...इ.) विविध संगणकीकृत प्रक्रिया करताना मराठीचा सहजतेने वापर होईल या दिशेने प्रामुख्याने संशोधन करता येईल. तसेच हे संशोधन संगणक प्रणाली बनवणार्‍या संस्था, शासन-आर्थिक-औद्योगिक संस्थांमधील निवडक व्यक्ती व अन्य विद्यापीठांतील संगणक विभाग आदी घटकांपर्यंत पोहोचवता येईल. यासाठी नियोजनबध्द रितीने बैठका – प्रशिक्षण कार्यक्रम योजता येतील.

शासकीय व्यवहार ते छोट्या दुकानातील-कार्यालयातील संगणकीय व्यवहार हे मराठीत होण्यासाठी संशोधन-प्रशिक्षण-प्रसार-नियम-कायदे अशा सर्व साधनांचा वापर करता येईल.

संपूर्ण मराठी संगणकाबाबत उपाय

आज कोणत्याही संगणकावर आज्ञा, कृती या इंग्रजी भाषेतूनच दिलेल्या असतात, कळफलक इंग्रजी भाषेतीलच असतो. म्हणजेच संगणक इंग्रजी भाषेतूनच चालतो, कृती करतो व इंग्रजी भाषेतील शब्दच प्रदर्शित करतो.

खरे तर संगणकाला कोणतीही भाषा थोड्या फार फरकाने सारखीच असते. फक्त याविषयी आग्रह व निष्ठेसह संशोधन व विकास होणे गरजेचे आहे. असा आग्रह चीन, जपान, इस्त्राएल इत्यादी देशांतील नागरिकांनी धरला, संबंधित शासनानेही याकडे गांभीर्याने पाहिले. त्यामुळेच त्या त्या भाषेतील संगणक किंवा द्वैभाषिक (ती भाषा व इंग्रजी) संगणक निर्माण झाले. असाच मराठी भाषेतील संगणक किंवा मराठी व इंग्रजी भाषेतील द्वैभाषिक संगणक निर्माण करणे शक्य आहे का, याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. काही संशोधकांच्या मते हे शक्य आहे.

मराठी व संगणक या विषयीचे आपले सर्व न्यूनगंड नष्ट होण्यासाठी आणि एक आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी 'संपूर्ण मराठी संगणक' तयार होणे, तो सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

या संगणकावर मराठी भाषेतील आज्ञा असतील. आयकॉन्सची (खिडक्या) नावे मराठीत असतील. यासाठी संगणकीय परिभाषा विकसित करणे गरजेचे आहे. सुरुवातीला काही इंग्रजी शब्द / संकल्पना देवनागरी लिपीत वापरण्यास हरकत नाही. अर्थातच यावर मराठी टंकलेखन सहजपणे करता येईल. कोणत्याही संगणकावर दिसू शकतील, वाचता येऊ शकतील असे युनिकोड प्रणालीतील टंक (युनिव्हर्सल फॉंट्स) यावर असतील. इंग्रजी प्रमाणेच विविध प्रकारचे आकर्षक टंक संगणकधारकाला उपलब्ध असतील. गरज पडेल तेव्हा इंग्रजीचा वापरही करता येऊ शकेल...असा सर्वगुणसंपन्न, आदर्श मराठी संगणक महाराष्ट्रात निर्माण होणे आणि लोकांपर्यंत पोहोचून तो त्यांनी वापरणे...या गोष्टी घडणे आवश्यक आहे.

मराठी संगणकाबाबत आम्ही निश्चित प्रयत्न करु. महाराष्ट्रातील तज्ञ परम संगणक तयार करु शकतात, तर मराठी संगणक का नाही तयार करु शकणार!


Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.