मलनिस्सारण

सांडपाणी व पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन

विकेंद्रीत व्यवस्थापनातून सांडपाण्याचा आणि पूराच्या पाण्याचा पुनर्वापर

लोकांचे स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी मैलापाण्याचे योग्य पद्धतीने निस्सारण होणे गरजेचे आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी मुख्य प्रवाहात आल्यामुळे आणि पावसाच्या स्वच्छ पाण्यात मिसळल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. आपल्या परिसरातील नद्या, नाले, तलाव स्वच्छ रहावेत यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर करण्याची पुरेशी सुविधा पुरवायला हवी. पावसाच्या पाण्याची साठवण करून आणि पूराच्या पाण्याच्या व्यवस्थापनातून उपलब्ध होणार्‍या अतिरिक्त पाण्याचा उपयोग करून घ्यायला हवा.

प्रश्नाचं स्वरूप


सांडपाणी

पाणी वापरताना त्या अनेक गोष्टी मिसळल्या जातात आणि ते पाणी अशुद्ध होते. हे पाणी जसेच्या तसे परत वापरता येत नाही. अशा अशुद्ध पाण्याला सांडपाणी म्हणतात. सांडपाणी हे शौचालय, न्हाणीघर, स्वयंपाकघर, धुणी-भांडी, कारखाने इ. ठिकाणी होणार्‍या पाण्याच्या वापरातून निर्माण होते. सांडपाण्याची नीट विल्हेवाट लावण्याची गरज असते; ते न केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या पाण्याचा पर्यावरणावर देखील विपरित परिणाम होतो.

आज राज्यात अनेक ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया न करता स्थानिक जलसाठ्यांमध्ये सोडले जाते, ज्यामुळे पाण्याचे साठे दूषित होतात.

सांडपाणी व्यवस्थापन म्हणजे शौचालयातून, घरगुती वापरातून व कारखान्यातून निर्माण होणारे सांडपाणी सुरक्षितरित्या एकत्रित करून, त्याची साठवण केल्यावर त्यावर प्रक्रिया करून त्याची नीट विल्हेवाट लावणे. सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्यावर त्याचा पुनर्वापर करता येतो आणि नागरिकांचे आरोग्यही सुधारते. त्याबरोबरच परिसरातल्या नद्या, नाले व तलाव यांचे संरक्षण होते, तिथला निसर्ग अबाधित राहतो. सांडपाण्यावर प्रक्रिया करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे ही गरज कायमच अपुरी पडत असते. या अपुर्याल सोयींमुळे विकसनशील देशांत अंदाजे १८ लाख लोकांचा अतिसारामुळे दर वर्षी मृत्यू होतो , पैकी ९०% ५ वर्षाच्या आतली मुले असतात.

महाराष्ट्रात्ल्या शहरांत व गावांमध्ये बरीच घरे व वस्त्या अशा आहेत जिथे घरात किंवा त्यांच्या परिसरात शौचालयाची सोय नाही. यामुळे नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागते. याने मुख्यत: लहान मुले आजारी पडतात. शाळांमध्ये शौचालयाची सोय नसल्यामुळे किंवा अव्यवस्थित शौचालयांमुळे मुलींचे शाळेत जाण्याचे प्रमाण कमी होते. इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक्सच्या अभ्यासानुसार अस्वच्छ शौचालयांमुळे २% ते ३% शाळेतील मुले, मुख्यत: बालवाडीतील मुले, युरिनरी ट्रॅक्टच्या आजाराने व पोटाच्या विकाराने त्रस्त असतात. मुलांपेक्षा मुलींमध्ये हे त्रास जास्त होतात .

राज्याच्या ग्रामीण भागात घराघरातले सांडपाणी उघड्या गटारींद्वारे, कोणतीही प्रक्रिया न करता, नदीत, तलावात किंवा नुसते जमिनीवर सोडले जाते. ग्रामीण भागांत सांडपाण्याच्या प्रक्रियेची कोणतीही सोय नाही. काही भागांमध्ये जरी सेप्टिक टॅंक असले तरी वेळोवेळी देखरेख होत नाही आणि बहुतांश वेळा त्यात जमा केलेले सांडपाणी तसेच्यातसे नाल्यात सोडले जाते. यामुळे त्या भागांत आरोग्याला अपायकारक स्थिती निर्माण होते. डास होतात. पावसाळ्यात याचे प्रमाण अधिकच वाढते. पावसाच्या पाण्यामुळे नाले तुडूंब भरून वाहतात आणि हे नाल्याचे पाणी व पावसाचे पाणी आजूबाजूला पसरून अख्खा परिसर दूषित होतो.

राज्यातील शहरी भागांत सांडपाणी बंद गटारींद्वारा प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत वाहून न्यायची सोय असते. पण खरी समस्या ही प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी असते. सकाळच्या वेळेस या प्रकल्पांवर त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त भार असतो आणि सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. त्यामुळे बहुतांश सांडपाणी प्रक्रियेशिवाय नदीत सोडले जाते. शहरांमध्ये सार्वजनिक शौचालयांचे प्रमाण कमी असल्याकारणाने बरेच लोक रस्त्यावर शौचास जातात ज्यामुळे दुर्गंधी पसरते आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. राज्यातील सगळ्या शहरांमध्ये महिलांसाठीच्या सार्वजनिक शौचालयांचे प्रमाण देखील कमी आहे.

काही कारखान्यांमध्ये त्यांच्या आवारात निर्माण होणार्‍या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची सोय नसते आणि ते तसेच नद्यांमध्ये किंवा जमिनीवर सोडले जाते. तसेच झोपडपट्टींमधील सार्वजनिक शौचालयातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते. हे प्रदूषित पाणी नदीनाल्यांमध्ये सोडल्यामुळे फक्त पाणीसाठेच नाही तर प्रवाहाच्या खालच्या बाजूस राहणार्‍या लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. थोडक्यात, नदीच्या स्वच्छ गोड्या पाण्याच्या बदल्यात आपण नद्यांना सांडपाणी परत देतो. हे योग्य नव्हे!

पावसाळी पाणी आणि पूर

प्रत्येक शहर, वस्ती आणि गावाची स्वत:ची नैसर्गिक पाणी निचरा करण्याची सोय असते. पण अनेक दशकांपासून वाढत्या शहरीकरणामुळे या नैसर्गिक निचरा करण्याच्या सोयी नष्ट झाल्या आहेत. बर्‍याचशा नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत किंवा ते कचरा व राड्या-रोड्याने भरले गेले आहेत. नाल्यांवर अतिक्रमण केल्यामुळे पाण्याचे प्रवाह अरूंद होतात व थोड्याशा पावसात देखील पाणी रस्त्यांवर वाहू लागते. जेथे सांडपाणी व्यवस्थापनाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत तेथे सांडपाणी सर्रासपणे नाल्यांमध्ये सोडले जाते. मोठा पाऊस आल्यावर पावसाच्या पाण्याला नाल्यातून वाट मिळत नाही आणि ते सांडपाणी मिश्रित पावसाचे पाणी घरांत शिरते आणि पूरसदृष परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते.

नाल्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. या पारंपारिक नैसर्गिक पाणी निचरा प्रणालींचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत गरजेचे आहे.

पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन हा पायाभूत सुविधांचा एक महत्वाचा भाग आहे. यामध्ये पावसाचं पाणी साठवले आणि जिरवले जाते. पावसाचे पाणी आणि सांडपाणी हे एकत्र वाहून नेणे चुकीचे आहे. न्यायालयाने पालिकांना दिलेल्या आदेशानुसार, पावसाळी पाण्याची आणि सांडपाण्याची गटारे वेगळी असावीत. यामुळे सांडपाणी जमिनीत मूरून भूजल प्रदूषित होत नाही.

असं का होतं?


असा समज आहे की शौचालये बांधल्यावर उघड्यावर शौच करणे बंद होईल आणि नागरिकांचे आरोग्य सुधारेल. हे खरं आहे, पण प्रश्नाची ही अर्धीच बाजू आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या कार्यक्रमांतर्गत राबविले जाणारे उपक्रम हे शौचालय बांधण्यावर जोर देतात, पण सांडपाण्याच्या विल्हेवाटीची कोणतीही सोय करत नाहीत. घरांसमोर असलेली उघडी गटारे बहुतांश वेळेला कचरा किंवा गाळ साठल्यामुळे तुंबलेली असतात. गटारींमध्ये साचलेले सांडपाणी सामाजिक स्वास्थ्यास हानिकारक असते. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साधारण ३.७ कोटी जनता सांडपाणी वाहून नेण्याच्या सुविधेपासून वंचित आहे. उरलेल्या घरांपैकी ज्यांच्याकडे ही सुविधा आहे, तेथे अर्ध्याहून अधिक सांडपाण्याची गटारे उघडी आहेत.

सांडपाणी हे तीन प्रकारचे असते - sullage (आंघोळ, स्वयंपाकघर, धुणीभांडी), sewage (शौचालयात वापरलेले पाणी) आणि effluent (कारखान्यांमधील पाणी). हे तीन्ही प्रकारचे सांडपाणी एकत्र होत असल्यामुळे सांडपाणी शुद्धिकरण प्रक्रियेच्या यंत्रणेवरचा भार वाढतो आणि प्रक्रिया करण्याचा खर्च देखील वाढतो. तीन वेगवेगळ्या स्त्रोतांमधून निर्माण होणार्याभ सांडपाण्यावर प्रक्रिया करावे लागणारे तंत्रज्ञान हे वेगवेगळे असते.

भारताच्या महानगरांमध्ये वापरल्या जाणार्‍या एकूण पाण्यापैकी जवळजवळ ८०% पाण्याचे सांडपाण्यात रुपांतर होते. या सगळ्या निर्माण झालेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. याचे कारण असे की हे सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया यंत्रणेच्या क्षमतेपेक्षा जास्त असते व ५०% हून अधिक सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय तसेच नदीत सोडले जाते.

काय करायला हवं?


सांडपाण्याचे व्यवस्थापन हे कमी न लेखता प्राधान्य देऊन त्याचा पाठपुरावा करण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे. हे न केल्याने आपल्या नद्यांना आज गटाराचे स्वरूप आले आहे. छोटे नाले देखील प्रदूषित झाले आहेत. उघड्या, तुंबलेल्या गटारांमुळे डासांना वाव मिळून मलेरिया, डेंग्यु, इ. सारख्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. हे टाळण्यासाठी १००% सांडपाण्यावर १००% प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आपल्याला ठेवावे लागेल, आणि ते गाठण्यासाठी कंबर कसावी लागेल.

सांडपाणी व्यवस्थापनाला 3R (रिड्युस, रिसाइकल आणि रियुझ – कमी करा, इतरत्र उपयोग करा आणि पुन्हा वापरा) या तत्वाच्या आधारावर प्रोत्साहन द्यायला हवं. ही सर्व प्रक्रिया विकेंद्रित करावी लागेल.

शक्यतो सांडपाण्याचा उगम जिथे होतो तिथेच प्रक्रिया होईल, जेणे करून यंत्रणेवरचा ताण आणि खर्च कमी होईल हे पहावे लागेल. प्रक्रिया करताना शक्यतो नैसर्गिक पद्धतींचा अधिक प्रमाणावर वापर आणि प्रक्रिया केल्यानंतरच्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचे तत्व स्वीकारावे लागेल. असे करता यावे म्हणून गृह निर्माण उद्योगाला सज्ज व्हावे लागेल; औद्योगिक क्षेत्राला सुद्धा आपली जबाबदारी नेटाने पेलावी लागेल.

हे कसं करावं, कुठलं तंत्रज्ञान वापरावं यावर जगात खूप संशोधन चालू आहे. नव-नवीन उपाय सुचवले जात आहेत. सांडपाण्याचा उपयोग करून वीज व गॅस निर्मिती, खत, असे बहुउद्देषिय प्रकल्पांचा विचार होत आहे. कमी पाणी वापरणारी शौचालये तसेच इतर उपकरणे बाजारात येत आहेत. या सर्वाचा आढावा घेऊनच आपले नियोजन करायला हवे.

सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी व या प्रक्रियांमध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करावे लागतील.

महत्वाच्या कल्पना


 • विकेंद्रित सांडपाणी आणि पूरपाणी व्यवस्थापनावर भर
 • सांडपाण्याच्या आणि पूरपाण्याच्या पुनर्वापराचा प्रयत्न
 • सांडपाणी व्यवस्थापनातून उद्योग निर्मिती आणि रोजगार

कार्यक्रम


विकेंद्रित सांडपाणी व्यवस्थापन

जास्त क्षमता असलेल्या केंद्रीकृत सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पांपेक्षा विकेंद्रित व कमी क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प अधिक प्रभावशाली असतात. अशा विकेंद्रित प्रकल्पांमुळे मुळे स्थानिकांकडे सांडपाणी प्रक्रियेची जवाबदारी राहते आणि या कामात त्यांचा सहभाग वाढतो. म्हणूनच विकेंद्रित पर्यावरणीय (ecological) सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांना प्रोत्साहन द्यायला हवे.

विकेंद्रित व्यवस्थापनामुळे रोजगार निर्मितीचे नवीन मार्ग आणि पर्याय उपलब्ध होऊ शकतात. कमी वस्तीच्या आणि दूरस्त भागांमध्ये व निवासी इमारती आणि विश्रामगृहांमध्ये विकेंद्रित सांडपाणी व्यवस्था उभारणी व देखरेख केल्याने रोजगारास प्रोत्साहन मिळेल, मुख्यतः ग्रामीण भागात जेथे रोजगारांचा अभाव आहे तिथे.

औद्योगिक आणि घरगुती सांडपाण्याचे एकत्रिकरण टाळावे, ज्यामुळे प्रक्रियेवर होणारा खर्च कमी होईल. उद्योगांनी त्यांच्या कारखान्यात निर्माण होणार्या औद्योगिक सांडपाण्याची सोय त्यांच्याच परिसरात करावी. आणि प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा स्वत:च्याच परिसरात वापरावे. जे कारखाने प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदी किंवा मोकळ्या जागेत सोडतील अशांना दंड करण्यात यावा. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च हा प्रकल्प उभारतानाच विचारात घेतला जावा.

सर्व प्रकारच्या सांडपाण्याचे एकत्रीकरण टाळणे

घराघरातून येणार्‍या सांडपाण्याचा पुनर्वापर त्या परिसराच्या आवारात झाला पाहिजे. लोकसहभागाद्वारे स्पष्टपणे चर्चा झाल्यावर, sewage आणि sullage पद्धतशीररित्या वेगळे केले जावे. त्यासाठी योग्य असा तांत्रिक पाठिंबा पुरवला जावा. अशा प्रकारे प्रत्येकजण आंघोळ, स्वयंपाकघर, धुणी-भांडी यांमधून निर्माण होणार्‍या सांडपाण्याचा योग्य असा वापर करु शकेल (उदा., बाग किंवा परसबागेसाठी, गाड्या धुवायला, शौचालयात फ्लशिंग साठी, शेतीसाठी). यामुळे नैसर्गिक स्वच्छ पाण्याचा वापर कमी होऊन पाण्याचा अपव्यय टळेल आणि तसेच सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया यंत्रणेवरचा भार देखील कमी होईल.

कमी पाणी वापरणारे व शौचालयातून बाहेर पडणार्‍या पदार्थांचे (मल व मूत्र) विघटीकरण करणार्‍या आधुनिक शौचालयाच्या वापराला प्राधान्य दिला जावे. या प्रकारचे वर्गीकरण फायदेशीर ठरते कारण केवळ मूत्रात एकत्रित केलेल्या मल-मूत्रापेक्षा कमी जंतू असतात, त्यामुळे ते शुध्द करण्याची प्रक्रिया सोपी असते. विष्ठेला कमपोस्टने निर्जंतुक केल्यावर खत म्हणून वापरण्यात येते. आधुनिक शौचालय ही काळाची गरज आहे. कारण, इतके वर्ष आपण जे नैसर्गिक संसाधन वाया घालवत आहोत त्याचा सामाजिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

सांडपाणी निरिक्षण समिती व लोकशिक्षण अभियान

विभाग पातळीवर एक समिती बनवण्यात यावी ज्यात नागरिक, स्थानिक कार्यकारी संस्था, पर्यावरण अभियंता आणि पर्यावरण शास्त्रज्ञ यांचा सहभाग असेल. प्रत्येक सांडपाणी प्रकल्प यंत्रणा, उद्योग आणि घरगुती सांडपाण्याचे परिक्षण दर तीन महिन्यांनी केले जाईल.

फक्त शौचालय आणि सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बांधून उपयोग नाही पण त्याचा योग्य वापर सुध्दा झाला पाहिजे. यासाठी ही समिती वेगवेगळ्या प्रकारचे लोकजागृती उपक्रमही राबवेल. सांडपाण्याचा सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेपर्यंतचा प्रवास, वेगवेगळ्या जनजागृती उपक्रमातून शौचालयाच्या स्वच्छतेचे महत्च, सफाई सेवेची आणि कार्यकारणीचे संख्यात्मक आणि परिमाणात्मक निरिक्षण आणि वरील नमूद केलेल्या सर्व गोष्टींची पूर्ती केल्यावर नैसर्गिक पाण्याच्या साठ्यांचे संरक्षण हे सांडपाणी व्यवस्थापनाची शेवटची पायरी असेल.

दुहेरी किंवा तिहेरी पाणी वितरण प्रणालीचा वापर करणे

समुद्रकिनारी वसलेल्या भागात दुहेरी किंवा तिहेरी पाणी वितरण प्रणाली पध्दतीचा वापर करावा आणि बाकीच्या भागात दुहेरी पाणी वितरण प्रणालीचा वापर करावा. हॉंगकॉंग मधली दुहेरी पाणी वितरण प्रणाली गेले ५० वर्ष कार्यरत आहे. हॉंगकॉंग शहर आपल्या ७ दशलक्ष लोकसंख्येपैकी ८०% लोकांना समुद्राचे पाणी शौचालयात वापरण्यासाठी पुरवते. त्यामुळे नगरपालिकेचा शुध्द पाण्याचा वापर २०% ने कमी होतो. हॉंगकॉंग विमानतळावर तिहेरी पाणी वितरण प्रणाली वापरली जाते. त्यात शुध्द पाणी, समुद्राचे पाणी आणि आंघोळ, स्वयंपाक आणि धुणेभांड्यांसाठी वापरलेले पाणी वापरले जाते ज्यामुळे नगरपालिकेच्या पाण्याची ५०% बचत होते .

नैसर्गिक पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन

सध्याच्या परिस्थितीत, सांडपाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया यंत्रणा अपूरी असल्यामुळे महाराष्ट्रातले अनेक नदी, नाले व तलाव प्रदूषित झाले आहेत. या नदी, नाले व तलावांना पुन्हा वाहतं करण्यासाठी सर्वात प्रथम सांडपाणी नद्यांमध्ये सोडण्याआधी त्याच्यावर १००% प्रक्रिया होणे आवश्यक आहे. नद्या, नाले, तलाव व पाणथळ जमिनी यांचे टप्प्याटप्प्याने पुनरुज्जीवन केले गेले पाहिजे. पाणीसाठे स्वच्छ करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जायला हवेत.

वाढत्या शहरीकरणाबरोबर आपल्याला नद्या, नाले, तलाव यांच्या स्वच्छतेची ठोस उपायोजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जायला हवेत. यामुळे माणसाच्या प्रगतीचा आणि पर्यावरणाचा समतोल असे दुहेरी उद्दिष्ट साधले जाईल.

सार्वजनिक खाजगी भागीदारी

शौचालयातून निर्माण होणार्‍या सांडपाण्याची साठवण आणि त्यावर प्रक्रिया हे काम खाजगी संस्थांना देता येईल. यामुळे रोजगार निर्मिती होऊ शकेल. स्थानिक प्रशासन सांडपाणी निरिक्षण समितीच्या बरोबरीने नियंत्रक आणि सहायक म्हणून काम करेल.

पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन

 • पावसाळी पाणी वाहू न देणे
 • पावसाचे पाणी हे गोड्या पाण्याचा महत्त्वाचा स्त्रोत आहे, म्हणून तो वाया न घालवता त्या पाण्याची साठवण करून ते वापरणे आणि भूजलाची पुनर्भरणा करणे महत्वाचे आहे.

 • प्रत्येक घरात आणि इमारतीत पावसाच पाणी साठवण्यास प्रोत्साहन
 • भूजलावर अवलंबून नैसर्गिक पाणीसाठा कमी करण्यापेक्षा, पावसाचे पाणी साठवून वापरणे ही पर्यावरणाला अनुकूल पद्धत आहे. ही प्रक्रिया प्रत्येक घरात आणि इमारतीत करण्यासारखी आहे. छपरावर पडणारे पावसाचे पाणी हे घरातल्या अनेक गोष्टींसाठी वापरता येईल. ऑस्ट्रेलियात पावसाचे पाणी कपडे धुण्यासाठी, शौचालयात आणि बागांमध्ये वापरले जाते ज्यामुळे घरगुती वापरासाठी लागणारे पालिकेच्या पाण्याची ४०% बचत होते.

 • भूजलाची पुनर्भरणा करणे
 • जर भूजलाची पुनर्भरणा होत नसेल तर दुष्काळात नद्या व विहिरींचे पाणी आटून जाईल. काही भागांत पाणी भूजलात जास्त प्रमाणात पाझरते. अशा भागांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

 • नैसर्गिक नाल्यांचा जास्तीत जास्त वापर करणे
 • नैसर्गिक नदीनाल्यांचे संवर्धन व त्यांचा वापर करायला हवा. नदी व नाल्यांचा परिसर वृक्षारोपणाद्वारे सुशोभित करता येईल. नाल्यांवरचे अतिक्रमण काढून नैसर्गिक मार्ग मोकळे करायला हवेत.

 • पावसाच्या पाण्याचे प्रदुषण थांबवणे
 • पावसाचे पाणी हे गोडे पाणी आहे. सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारे वेगळी असावी, जेणे करून सांडपाण्यावर करायच्या प्रक्रियेच्या खर्चावर अतिरिक्त भार पडाणार नाही आणि गोड्या पाण्याचा वेगळा उपयोगही करणे शक्य होईल. नाले आणि नद्या वाहत्या राहतील.

 • नाले आणि गटारांची बांधकामे
 • रस्त्याच्या कडेला गटारे अशा पद्धतीने बांधावी की रस्त्यावरून वाहून जाणारे पाणी आणि पावसाचे पाणी नैसर्गिक ओढ्यांना जाऊन मिळेल.

तळटीपCopyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.