शहरातल्या सुंदर, मोकळ्या, प्रशस्त, राखीव जागा म्हणजे शहराचा श्वास. झपाट्याने वाढणार्या शहरीकरणाच्या रेट्यामुळे मिळेल त्या जागेत बांधकाम करणे आणि पैसे कमावणे अशी चढाओढ चालू आहे. यामुळे आधीच्या असलेल्या मोकळ्या जागांवर अतिक्रमणे केली जातात, आणि तिथे राहणार्या लोकांची विसाव्याची ठिकाणे हिरावली जातात. आज लोकांना आपण राहतो तिथून सहज चालत जाता येईल अशा अंतरावर, मुद्दाम वेळ काढून एकत्र येण्याकरता, स्वच्छ आणि सुशोभित हक्काच्या मोकळ्या जागा असणे अतिशय गरजेचे आहे.
शहरांमधले वाढते धकाधकीचे जीवन, गावे ओस आणि शहरांमध्ये भाऊगर्दी, नोकरीसाठी आलेले आणि मग इथेच स्थायिक होऊन जाणार्या लोकांसाठी भरमसाठ घरे बांधायची यांमुळे शहरातल्या उरल्या सुरल्या मोकळ्या जागा काबीज केल्या जातात. आणि मग दिसायला लागतात ती सिमेंटची जंगलं. सदनिकांची, लोकांची आणि त्यांच्या वाहनांची गर्दी यामुळे शहरातले जीवन कोंडमार्याचे झाले आहे. लहानांना खेळायला, तरूणांना सामाजिक कार्यक्रमांसाठी, ज्येष्ठ लोकांना निवांतपणासाठी त्यांच्या त्यांच्या निवासी भागांमध्ये राखून ठेवलेल्या हक्काच्या अशा जागा दुर्मिळ होत चालल्या आहेत. माणूस हा समाजप्रिय असल्याने त्याला समवयस्कांबरोबर एकोप्याने समाजजीवनाचा आनंद घेण्याची इच्छा निसर्गतःच असते. आज धावपळीच्या रहाट्गाडग्यामुळे तो या सहज आनंदास रोज मुकतो आहे.
लहान मुले बाल्यसुलभ खेळ खेळायला न मिळाल्याने ते मानसिकरित्या आक्रमक होत आहेत. लहानपणापासून खेळीमेळीतून खिलाडू वृत्ती तयार होते, बर्याच गोष्टी शिकल्या जातात. तरूणांच्या वैचारिक देव-घेव मधून अनेक कल्पना, ज्ञानोपासना, समाजहित प्रकल्पांची सुरूवात होते. परंतु आज मुले अंगणे, क्रीडांगणे नाहीत म्हणून यांत्रिक खेळांमध्ये अडकत आहेत आणि त्यांचे मानसिक दुर्बल, शारिरीक स्थूल होत आहेत. तरूणांची समाजबांधिलकी लोप पावत चालली आहेत. सुसंवाद कमी झाल्याने ज्येष्ठांच्या एकटेपणाच्या, नैराश्याच्या समस्या वाढत आहेत.
रोजच्या कामांच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी कुटुंबेच्या कुटुंबे सुट्टीत वा सुट्टी काढून शहरांबाहेर निसर्गरम्य वातावरणात जाण्याचा पर्याय शोधतात.
पैसे कमावण्याच्या आधुनिक संधी, शहरी चकमकत्या दुनियेचे आकर्षण यांमुळे शहरांच्या क्षमतेपेक्षा कैक पटीने अधिक लोकांनी येथे बस्तान बसविले. टोलेजंग इमारती बांधताना शहराचे विकास नियोजन पुरते मोडकळीला आले. शहरांच्या विकास आराखड्यात कागदावर तरी ठिकठिकाणी मोकळ्या जागा राखून ठेवल्या होत्या. पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत, शहरीकरणाचा वेग इतका जास्त होता की, हळू हळू विकास आराखड्यातल्या मोठ्या मोठ्या आरक्षित जागासुद्धा पैसा व राजकारणाच्या जोरावर बांधकामासाठी लाटल्या.
सामान्य मध्यमवर्गीय माणूस हा त्याच्या रोजच्या नोकरी धंद्याच्या व्यापात गुरफटलेला असतो. लोकांचा एकत्रित आवाज ऐकून त्यांच्यासाठी योजनाबद्ध बांधकामे करवून घेणारे शहरांचे स्थानिक शासनही तेवढे सक्षम नाही. लोकांना कर भरूनही चार घटका निवांत बसायला घरांच्या आजूबाजूला पुरेशा बागा, उद्याने, ऐसपैस बैठकीची ठिकाणे मिळत नाहीत.
आपल्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागा मोकळ्याच राहतील याचा लोकांनी आग्रह धरला पाहिजे. स्थानिक शासनव्यवस्थेस भाग पाडून या जागा सुशोभित राहतील, त्यांचा आनंद जास्तीत जास्त लोकांना घेता येईल अशा बनविल्या पाहिजेत. केवळ जमिनीच नाही तर, आपल्या भागातील नद्या, नाले, तलाव हे ही स्वच्छ, सुशोभित केले जातील, जास्तीत जास्त लोकांना नौकाविहार आणि अशा गोष्टींसाठी वापरले जातील अशी तजवीज केली पाहिजे.
शहरातून वाहणार्या नद्यांच्या दोन्ही कडांना हिरवळ, बसण्याच्या सोयी, उपहारगृहे अशा सौंदर्यदृष्टीचा शहराच्या विकास आराखड्यात अंतर्भाव केला गेला पाहिजे. खाजगी उद्योग, परदेशी गुंतवणूकीच्या सहाय्याने स्थानिक शासन हे सहजच करू शकते. शिवाय, यामुळे नदीलगतच्या जागांना चांगली किंमत येऊन तिथल्या अर्थव्यवस्थेसही मोठा हातभार लागणार आहे. शहराचे सौंदर्य वाढवण्याबरोबरच लोकांचे समाजजीवन समृद्ध करण्यासाठी ठिकठिकाणी खास या मोकळ्या जागा विकसित केल्या गेल्या पाहिजे.
हजारो वर्षांपासून माणूस मोकळ्या जागांवर वाढला, मोठा झाला, शहाणा झाला. मग ते शेतावर असो, जंगलात असो की डोंगर-टेकड्यांवर. म्हणून आजही माणूस चार भिंतींमधून बाहेर पडून कुठे बागेत, कुठे मोकळ्या मैदानावर किंवा काहीच नाही जमलं तर रस्त्यावर जाऊन उभा रहातो. जिथून त्याला आकाश दिसेल. आकाश पहाणं ही माणसाची स्वाभाविक प्रेरणा आहे. महाराष्ट्रात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोकळ्या जागा शोधणं, त्या विकसित करणं, त्यासाठी स्थानिक जनता, तिथल्या संस्था ह्यांची मदत घेणं, त्या जागा जोपासणं याची एक मोठी चळवळ उभी करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात ह्या निमित्तानं "मोकळ्या जागांची मोकळी, खुली संस्कृती" यातून विकसित होईल.
ह्या मोकळ्या जागांकडे "वाया जाणारं साधन" असं मुळीच बघू नये. अशा मोकळ्या जागा माणसाला मोकळं करतात, त्याच्यातील सृजनशीलता वाढवतात, माणसाला अनंद देतात, त्यातून सामाजिक स्वास्थ्य टिकतं-वाढतं, मोकळी हवा लोकांना मिळते. अशा मोकळ्या हवेचं "मूल्य" काय? लोकांना एकत्र यायला, एकत्र खेळायला, एकत्र सांस्कृतीक कार्यक्रम करायला, विचारांची देवाणघेवाण करायला ह्यातून संधी मिळते. हा खूपशा सामाजिक समस्या आणी रोगांवरचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. एक स्वस्थ, सुदृढ, सृजनशील समाज उभा करायचा तर अशा मोकळ्या जागांची फार आवश्यकता आहे.
एका मोकळ्या मैदानावर बघा -