पारंपारिक खेळ

खेळातून संस्कृती दर्शन

पारंपारिक खेळातून आणि क्रीडाप्रकारातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संवर्धन

महाराष्ट्रातले पारंपारिक खेळ अनेक आहेत.. ते रंजक तर आहेतच, त्यांतून आपल्या संस्कृतीचे दर्शनही घडते. आज डिजीटल गॅमिंगच्या जमान्यात अशा पारंपारिक खेळांचे एक वेगळेपण आहे. खेळाकडे पर्यटकांना आकर्षित करून आपण आपले खेळही टिकवू आणि आपल्या संस्कृतीची आठवणही ठेवू .

प्रश्नाचं स्वरूप


सूर पारंब्या, आट्या-पाट्या, गोट्या, सागरगोट्या, लगोरी, मंगळागौरीचे खेळ, झब्बू, बदाम सात, कबड्डी, खो-खो, विटी-दांडू, गलोल, भातुकली – एक एक आठवायला बसलं की असे कितीतरी खेळ आठवतात. काही खेळ साधे, रंजन करणारे, तर काही स्पर्धात्मक , चढा-ओढीचे, जिंकण्याची इर्षा निर्माण करणारे. या प्रत्येक खेळाबरोबर महाराष्ट्राचा, मराठी माणसाच्या संस्कृतीचा एक धागा जोडलेला आहे. हे खेळ जिथे खेळले जायचे तिथल्या समाजाचा, परिसराचा इतिहास त्या त्या खेळात आपण पाहू शकतो.

हे खेळ त्या त्या गावच्या संस्कृतीचे आणि तिथल्या रूढी-परंपरांचे प्रतिकं आहेत. सूर पारंब्या जिथे वडाची झाडे होती तिथे खेळला जात होता, गोट्या तर मुले घरोघरी खेळत होती. अख्ख्या महाराष्ट्रात मंगळागौरीचे खेळ बायका श्रावण महिन्यात खेळत असत. पूर्वीच्या काळी जेव्हा बायकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसे तेव्हा हे खेळ खेळणं बायकांनी एकत्र येण्यामागचं निमित्त होतं. अख्खी रात्र खेळ खेळण्यात जागवली जायची. काही खेळ तर प्राण्यांशी संबधित आहेत. जसे सांगली जिल्ह्यातील समडोली गावात कबूतर पालन हा एक पारंपारिक खेळ आहे. भातुकलीचा खेळ तर प्रत्येक लहान मुलांना येणार्‍या प्रौढ वयातल्या जबाबदार्‍यांची तयारीच करून घेत असे . असे अनेक खेळ महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावात प्रचलित असतील पण आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नाही.

आज हे सर्व खेळ आपण विसरलो आहोत. अशा प्रकारचे अगदी महाराष्ट्रातल्या भूमीतले काही खेळ होते हे आज सांगितले तर अनेकांना आश्चर्यच वाटेल. हे खेळ नेमके कुठले, पहिल्यांदा कधी खेळले गेले? आज कुठे खेळले जातात का? आपल्याकडे आज या प्रश्नांची उत्तरे नाहीत. महाराष्ट्राच्या या क्रिडा संस्कृतीचे वर्णन कुठेही लिहीलेले नाही. हा इतिहास कोणाला अवगत आहे का हे ही सांगता येणार नाही.

आपली जीवनसरणी बदलली आणि आपण हे खेळ खेळायचे थांबलो. फारसे काही साहित्य न लागणार्‍या अशा या खेळांमधून उत्तम व्यायाम तर होतोच पण आपल्यातले उपजत कला-कौशल्य पणाला लागते. सध्याच्या मोबाइल आणि कॉम्प्युटर 'गेम्स' च्या युगात लोकांनी एकत्र येऊन खेळायला अनन्यसाधारण महत्व आहे.तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दुसरी बाजू ही की लोकांमधील तुटत चालेला संवाद… या खेळांमुळे रोजच्या कामांमधून वेळ काढून लोक एकत्र येतात, खेळतात, करमणूक होते, संवाद वाढतो आणि मन प्रसन्न राहते. आपल्या संस्कृतीची आठवण म्हणून आपण येत्या पिढीला हे खेळ शिकवायला हवे.

आज जगभर पारंपारिक आणि स्थानिक खेळ पर्यटनाचे एक आकर्षण असताना महाराष्ट्रात मात्र आपण त्याचा ह्या दृष्टीने विचार केलेला नाही. आपल्या खेळांमुळे जगभरातले पर्यटक आकर्षित होऊ शकतात; ही संधी आपण घेतली पाहिजे.

असं का होतं?


आपल्याला आपल्या मराठी संस्कृतीचा अभिमान आहे, हे नक्की. पण हा अभिमान नक्की कशा कशा मुळे आहे याचा आपल्याला विसर पडतो. आपल्या संस्कृतीचे घटक कोणते, ती कशामुळे एवढी समृद्ध झाली हे आपण जाणून घ्यायला हवे. महाराष्ट्राची क्रीडासंस्कृती सुद्धा समृद्ध आहे, हे या निमित्ताने आपण समजून घेऊ शकतो.

आपल्याकडे एकूणच खेळाला दुय्यम स्थान दिले गेलेले दिसते. क्रीडा आणि खेळाकडे आपण गांभीर्याने बघत नाही. पारंपारिक क्रीडाप्रकारांना दुय्यम स्थान दिले जाते आणि मोठ्या शहरात तर क्रिकेट, टेनिस, फुटबॉल या सारखे प्रचलित खेळच फक्त माहित असतात. पारंपारिक खेळ काही छोट्या गावांपुरतेच सीमित राहिले आहेत. ह्या खेळांचे महत्त्व लक्षात न घेतल्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती उपलब्ध नाही आणि त्यांचा प्रचार त्या त्या गावांबाहेर झालेला नाही.

काय करायला हवं?


  • सर्व पारंपारिक खेळांची एक यादी तयार करून त्याचा एक कोष तयार करायला हवा. त्याच्यात त्या खेळांची सर्व माहिती, खेळाचा उगम, इतिहास, संस्कृतिक महत्त्व, कसा खेळायचा, सद्यपरीस्थिती, इत्यादी माहिती असेल.
  • ज्या ठिकाणी हे खेळ खेळले जातात ती ठिकाणे 'पारंपारिक खेळ पर्यटन क्षेत्र' म्हणून जाहीर करायला हवी.

महत्वाच्या कल्पना


  • पारंपारिक खेळांचा कोष
  • महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, अनेक खेळांची "पारंपारिक खेळ पर्यटन क्षेत्रे"
  • महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्था मार्गदर्शन संस्था

कार्यक्रम


मराठी संस्कृती ही अनेक क्रीडाप्रकारांचे माहेरघर आहे. असे खेळ महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात आहेत. राज्य सरकारच्या पर्यटन खात्याच्या अंतर्गत एक गट स्थापन करायला हवा जो या सर्व खेळांची माहिती गोळा करून 'पारंपारिक खेळ आणि क्रीडा कोष' तयार करेल.

महाराष्ट्र सरकारचं पारंपारिक खेळ आणि क्रीडा याचे एक स्वतंत्र संकेतस्थळ असायला हवे. हे संकेतस्थळ स्वयंस्फूर्त निधीतून (crowd-funding / voluntary financing) उभे केले जाइल. या संकेतस्थळावर हा कोष उपलब्ध होऊ शकेल. गावागावातील पारंपारिक खेळ संघ या संकेतस्थळावर आपला खेळ / क्रीडा प्रकार नोंदवू शकतील. या गावांना पारंपारिक खेळ क्षेत्र म्हणून सरकार मान्यता मिळायला हवी. जिल्हा पातळी वरून हे काम केले जाईल पण सर्व जिल्ह्यांचा समन्वय राज्य पातळीवरून व्हायला हवा.

जे खेळ अजूनही खेळले जातात त्या त्या ठिकाणाला त्या खेळाचे 'पारंपारिक खेळ पर्यटन क्षेत्र' म्हणून जाहीर करायला हवं. ज्या गावांमध्ये आता फारसे खेळणारे उरले नाहीत, तिथे गावकर्‍यांनी ठरवल्यास या खेळांचे पुनरुज्जीवनही करता येईल.

या पारंपारिक खेळ-क्रीडा पर्यटन क्षेत्राला खालीलप्रमाणे काही विशिष्ठ मानदंड असावेत:

  • किमान एक पारंपारिक खेळ / क्रीडा प्रकार स्थानिक गावातील असावा.
  • स्थानिकांना हा खेळ येणं आवश्यक असेल.
  • खेळ / क्रीडा प्रकार शिकवता येऊ शकेल असे प्रशिक्षक असावेत.
  • पर्यटकांसमोर प्रात्यक्षिक / प्रशिक्षण देता येऊ शकेल असा स्थानिक गट असावा.
  • शिकणारे खेळाच्या कौशल्याची एकेक पायरी चढत सर्वोत्कृष्ट पातळी गाठू शकतील असे प्रशिक्षक असावेत

प्रत्येक जिल्हा अशा प्रकारच्या पर्यटनाला संधी मिळावी म्हणून एका खेळासाठीचे विशेष केंद्र असू शकेल. जे गाव या खेळाचे पारंपारिक स्थान असेल तिथे या खेळाची माहिती आणि प्रशिक्षण दिले जाईल, तिथेच या खेळावर संशोधन केले जाईल. या खेळांची प्रात्याक्षिके पर्यटनाच्या हंगामात दाखवली जातील. या खेळाविषयी उत्कृष्ट माहितीपट, चित्रपट, ग्रंथ, पुस्तके ह्याचे एक ग्रंथालय तिथे विकसित करता येईल. या केंद्राया केंद्राला पर्यटकांना आकर्षित करायला विशेष सहाय्य उपलब्ध करता येऊ शकेल.यटकांसाठी या खेळाची प्रात्यक्षिके आयोजित करता येऊ शकतील, तसेच उत्सुक पर्यटकांना तो खेळ शिकण्याची सोयही असेल. या गावातील हे केंद्र इतर जिल्ह्यात आपापल्या पारंपारिक खेळाचा प्रचार करेल. इतर जिल्ह्यातील मुले-मुली हे पारंपारिक खेळ शिकायला या केंद्रावर येऊ शकतील.

काही खेळ जे आता फारसे प्रचलित नाहीत त्यांना अशा पद्धतीने पुनरुज्जीवन करता येऊ शकेल.

हे खेळ आपापल्या गावी खेळले जातात तसे इतर ठिकाणीही जायला हवेत. महाराष्ट्रातल्य इतर जिल्ह्यात, इतर राज्यांमध्ये आणि परदेशात सुद्धा या खेळांबद्दल कुतूहल जागृत व्हायला हवे, त्यांची माहिती मिळायला हवी.

काही बैठे खेळ, उदाहरणार्थ सागरगोटे, लगोरी, गोट्या हे सद्धा तितकेच महत्वाचे. या बैठ्या खेळांचे नाशिक जिल्ह्यात एक केंद्र स्थापन करून तिथे हे खेळ शिकवायचे आणि प्रचलित करायचे सुरु व्हावे असे वाटते. प्राथमिक शाळांमधून हे बैठे खेळ शिकवले जावेत. राज्य सरकारच्या पर्यटन खात्याच्या अंतर्गत एक गट स्थापन केला जावा जो प्राथमिक शाळेच्या पातळीवर पारंपारिक क्रीडा प्रकार आणि खेळ शिकवण्यासाठी समन्वय साधेल.

तळटीप


  • आज मानसतज्ञ अशाप्रकारच्या खेळाचा त्यांच्या समुपदेशनात उपयोग करून घेतात यावरून या खेळाचे महत्व अधोरेखित होईल...

Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.