जागतिक व्यासपीठावर मराठी

महाराष्ट्र संपर्क केंद्र

एक महत्त्वाची भाषा म्हणून जागाने मराठी भाषा आत्मसात केली पाहिजे या उद्देशाने…

मराठी ही जगात १५ वी सर्वात अधिक बोलली जाणारी भाषा आहे. मराठी भाषिक जगाच्या कानाकोपर्या त पोचलेले आहेत. तरीही तेवढ्या प्रमाणात आपली भाषा, आपली संस्कृती जगापुढे आली नाही. मराठी संस्कृती आणि इतर जग यांच्यामधला दुवा घट्ट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे प्रयत्न करण्यासाठी शासनाची भूमिका प्रेरकाची आहे असं आम्ही मानतो. म्हणूनच, जगभरातल्या विविध देशांमध्ये वसलेल्या मराठी माणसांनी एकत्र यायला हवं. एकत्र येऊन, जगाच्या कानाकोपर्या त 'मराठीपण' जागं ठेवायला हवं! जगापुढे प्रभावीपणे ठेवायला हवं.

प्रश्नाचं स्वरूप


मराठी भाषा, मराठी माणूस आज जर मुख्य प्रवाहात दिसत नसेल तर जशी आसपासची परिस्थिती त्याला कारणीभूत आहे, तसेच, मराठी माणसाचं या संस्कृतीकडे झालेलं दुर्लक्ष, हे ही या परिस्थितीला तेवढचं कारणीभूत आहे. मराठी माणूस जगात कुठेही गेला तरी तो तिकडच्या चालीरीती, तिथली संस्कृती सहज आत्मसात करतो. आपला मराठीपणा टिकवला जावा म्हणून तो काही प्रमाणात प्रयत्न करतो देखील पण ते प्रयत्न एका छोट्या गटापुरते मर्यादित असतात. हे मराठीपण जगासमोर यावं म्हणून, एकत्र येऊन तो प्रयत्न करताना दिसत नाही.

जगाला आज जो काही थोड्या प्रमाणात महाराष्ट्र माहिती आहे, अभ्यास होतो आहे, तो आहे ऐतिहासिक महाराष्ट्र. जगभरात काही ठिकाणी महाराष्ट्रातली संत परंपरा, वांग्मय यावर अभ्यास होतो आहे. पण आजच्या महाराष्ट्राचं चित्र आपण जगासमोर आणू शकलो नाही. आपल्या इतिहासाची ओळख तर जगाला व्हायला हवीच; परंतु महाराष्ट्राचं आजचं चित्रही आपण जगाला दाखवू शकलो पाहिजे. जगभरात विविध देशात, मराठी माणूस मोठी कामगिरी करत असला तरी अजून एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काही करण्यामध्ये मागे पडतो आहे.

जगाचा महाराष्ट्राशी व्यापार थेट व्यापार वाढायला हवा. देवाण घेवाण वाढायला हवी.

असं का होतं?


आज मराठी भाषेला जगामधल्या महत्त्वाच्या भाषांच्या यादीत, किंवा महाराष्ट्राला जगातल्या महत्त्वाच्या राज्यांच्या यादीत फार महत्त्वाचं स्थान नाही. महाराष्ट्रातले तरुण आज फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, रशियन भाषा शिकतात. कारण या भाषा शिकल्यामुळे त्यांना शिक्षणाच्या, नोकरी - व्यवसायाच्या विविध संधी निर्माण होतात. त्यांना एका नव्या देशाची, भाषेची, संस्कृतीची ओळख होणं हे गरजेचं, हवंहवंस वाटतं. या भाषा शिकणार्यांरना एक प्रतिष्ठा आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राबद्दल असं होत नाही. कारण, आज महाराष्ट्र कोणत्याच बाबतीत जगाला काही उदाहरण म्हणून, संधी म्हणून देऊ शकत नाही.

आपल्याकडे जे आहे ते आपण वाढवू शकत नाही. ते जगासमोर नीट मांडू शकत नाही. आपण विविध क्षेत्रात जगासमोर कसं उदाहरण घालून देऊ शकू याबद्दल आपण याच संकेतस्थळावर इतरत्र वाचू शकाल.

हे जरी असलं तरी मराठी माणसाकडे आपल्याला असलेलं ज्ञान, कौशल्य, केलेलं महत्त्वाचे विचार जगापुढे मांडण्यासाठी हवी आहे ती इच्छा शक्ती.

आज मराठी ही व्यापाराची, न्यायाची, करमणुकीची भाषा नाही. त्यामुळे मराठीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान नाही.

काय करायला हवं?


  • जगभरात विविध ठिकाणी वसलेल्या मराठी माणसांनी एकत्र यायला हवं. एकत्र येऊन महाराष्ट्राचा आणि इतर देशांचा दुवा कसा पक्का करता येईल याबद्दल चर्चा व्हायला हव्यात. आणि एकत्रितपणे आखणी व्हायला हवी.
  • विविध देशांमधल्या मराठी, महाराष्ट्र मंडळांनी मराठी भाषा शिकवण्याचे उपक्रम हाती घ्यायला हवेत. भाषा, ही मूळ मराठी भाषिकांना आणि त्या देशातल्या लोकांनाही शिकवली जावी.
  • जगामधल्या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये महाराष्ट्राचा आणि जगाचा दुवा म्हणून काम करणारी केंद्रे स्थापन व्हायला हवीत. ही केंद्रे जरी तिथल्या स्थानिकांच्या मदतीने स्थापन होणार असतील तरी महाराष्ट्र शासनाने यामध्ये एका समन्वयकाचे काम करावे.
  • अशी केंद्रे लंडन, टोकियो, मॉस्को, न्यूयॉर्क, रोम, पॅरिस, बर्लिन शांघाय इत्यादी शहरांमध्ये स्थापन व्हायला हवीत. ही केंद्रे महाराष्ट्र आणि तो देश यांमधले संपर्क केंद्र म्हणून काम करतील.
  • या केंद्रांमध्ये मराठी भाषेचा, संस्कृतीचा, कला, साहित्याचा अभ्यास होण्यासाठी शिष्यवृत्त्या देण्यात याव्यात.
  • अनेक मराठी माणसे जगातल्या इतर भाषा शिकतात, त्यांनी मराठी साहित्य इतर भाषांमध्ये उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यासाठी भाषांतरे मोठ्या प्रमाणात झाली पाहिजेत.
  • मराठी कला, साहित्याबद्दल कार्यक्रम, मराठी कविता वाचन हे जगभरात आयोजित केले पाहिजे.
  • मराठी चित्रपट, ज्या आधारे मराठी संस्कृती जगापुढे मांडता येते, अशा चित्रपटांना विविध चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवले गेले पाहिजेत.

महत्वाची कल्पना


  • जगातल्या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये, जसे लंडन, टोकियो, मॉस्को, न्यूयॉर्क, रोम, पॅरिस, बर्लिन, शांघाय इथे 'महाराष्ट्र संपर्क केंद्र' उभारणार.

कार्यक्रम


मराठी माणूस हा जगभरात अनेक ठिकाणी राहतो आहे. त्या त्या जागी तो आपल्या परीने मराठी जपण्याचा प्रयत्न देखील करताना दिसतो आहे. पण, हे प्रमाण फार थोडे आहे. मराठी मंडळे, महाराष्ट्र मंडळे यांनी मराठी भाषा, मराठी संस्कृती जपण्यासाठी, तिला अधिक समृद्ध करण्यासाठी हातभार लावायला हवा. जगातल्या जवळ-जवळ सर्व प्रमुख शहरे जसे, लंडन, टोकियो, मॉस्को, न्यूयॉर्क, रोम, पॅरिस, बर्लिन येथे मराठी संस्कृती आणि अभ्यास केंद्रे स्थापन व्हायला हवीत. इथल्या स्थानिक मराठी माणसांच्या मदतीने अशी केंद्रे उभारता येतील.

या केंद्रांमध्ये काय करता येईल-

  • ही केंद्रे महाराष्ट्र आणि तो देश यांमधला दुवा म्हणून काम करतील.
  • या केंद्रांमधून महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल, जर कोणता उद्योग प्रस्थापित करायचा असेल, तर त्यासाठी लागणारी सर्व माहिती इथे मिळेल. मग, महाराष्ट्रातले कायदे, कार्यसंस्कृती, सुट्ट्या, महत्त्वाचे दिवस, तसेच मराठी संस्कृतीबद्दलची माहिती ही देण्यात येईल.
  • हे केंद्र अशा परदेशी पाहुण्यांना मदत करेल ज्यांना महाराष्ट्रात पर्यटक म्हणून यायचं आहे.
  • इथे एक भाषा अभ्यास केंद्रही असेल.
  • समृद्ध ग्रंथालय आणि वाचनालय.
  • मराठी सण आणि उत्सव साजरे व्हावेत.
  • चांगल्या मराठी पुस्तकांचे इतर भाषांमध्ये आणि चांगल्या इतर भाषांमधल्या पुस्तकांचे मराठीमध्ये भाषांतर व्हावे.
  • या केंद्रासाठी लागणारा सर्व निधी लोकांच्या पैशातून गोळा व्हावा आणि इथलं काम लोकांच्या इच्छेप्रमाणे वाढावं अशी कल्पना आहे.

Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.