गड आणि किल्ले संवर्धन

गड-किल्ले संवर्धन

गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन

महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हाला वाटतं. त्यासाठीचा हा प्रयत्न.

प्रश्नाचं स्वरूप


एवढ्या मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे. राज्याच्या कोपर्‍या-कोपर्‍यात गड-किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. तसेच प्रत्येकाचे आपले एक भौगोलिक महत्व आहे. अशाच काही किल्ल्यांचे आणि गडांचे भौगोलिक महत्व जाणून एका सोळा वर्षाच्या युवकाने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि इतिहास घडवला. या ध्येय्याने झपाटून अनेक मावळे लढले, कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी केवढे मोठे योगदान दिले. या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. हा इतिहास नुसताच पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या मुलांनी बघितला पाहिजे. हे गड चढले पाहिजेत, तिथे फिरले पाहिजे, त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवले पाहिजे आणि स्थापत्त्यकलेचा नमुना अभ्यासला पाहिजे. कारण आजचा महाराष्ट्र हा याच इतिहासाच्या कर्तबगारीवर उभा आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेतून बोध घेऊनच आपण आपले भविष्य घडवू शकतो आणि आपली पुढची पिढी कालचा हा उज्ज्वल इतिहास जाणूनच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते.

ज्या काळी, ज्या भौगोलिक अवस्थेत हे गड-किल्ले बांधले आणि तेव्हा असलेली तंत्रज्ञानाची उपलब्धता लक्षात घेता, हे गड-किल्ले चमत्कारापेक्षा काही वेगळे नाहीत. अशा वास्तूंचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे कारण आपल्या मराठी ऐतिहासिक संस्कृतीचे प्रतिक म्हणून या वास्तूंना अनन्यसाधारण महत्व आहे. पण नैसर्गिक आपत्तींमुळे आणि आपल्याच अनास्थेमुळे आज बर्‍याच गडांची दुरावस्था झाली आहे, त्यांची योग्य ती दखल घेतली गेलेली नाही. या ठिकाणी बहुतांश पर्यटक फक्त मौज-मजेसाठी येतात. इथे येण्याचा आनंद प्रत्येकाने घ्यावाच, पण त्याचबरोबर या पुरातन वास्तूंचे ऐतिहासिक महत्वही जाणून घ्यावे. आज तसे फारसे होत नाही, गडावर येणार्‍या पर्यटकांना, गिर्यारोहकांना ते सांगण्याची कुठलीच सोय आज उपलब्ध नाही. दुर्गम भागातल्या किल्ल्यांच्या दुरावस्थेबद्दल तर बोलायलाच नको.

असं का होतं?


महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती आपल्या भूगोलाची आणि पुरातन वास्तू या इतिहासाच्या ठेवी आहेत. या वास्तूंचे जतन हे आपण नाही केले तर दुसरं कोण करणार? अनेक व्यक्ती, गट यासाठी आज झटत आहेत पणे त्यांचे प्रयत्न आज एकाकी पडताना दिसतात. महाराष्ट्र म्हणून आपण या गोष्टीला पुरेसे महत्व दिलेले नाही. या प्रयत्नांना लागेल ती मदत करणं हे आपलं कर्तव्य आपण मानायला हवं.

असे अनेक हौशी गट आहेत ज्यांना गड संवर्धनाबद्दल आस्था आहे. ते नियमितपणे गड चढतात. त्या गडाचा इतिहास जाणून घेतात. त्यांच्यासारख्या इतर दुर्ग-प्रेमींना तिथल्या गड-किल्ल्यांबद्दल माहिती सांगतात. काही संस्था आहेत ज्या शाळा-महाविद्यालयाच्या मुलांना इतिहास अभ्यासासाठी गडावर नेतात. त्या काळातल्या गोष्टी सांगून, तसे वातावरण निर्माण करून इतिहास जिवंत करून सांगतात. पण हे प्रयत्न त्यांच्यापुरतेच मर्यादित राहतात. या दुर्ग-प्रेमींसाठी बर्‍याच गडांवर पुरेशी व्यवस्थाच नसते. सरकारकडून त्यांना पुरेसं सहकार्य किंवा आर्थिक सहाय्य मिळत नाही. अशा गटांची दखल सुद्धा घेतली जात नाही.

आपल्या गड आणि किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आपल्या वारशाचे जतन हे आपणच करायला हवे असा विचार आता लोकांच्या मनामध्ये रुजतो आहे, तो बळावला पाहिजे. महाराष्ट्राचा इतिहास समजून पुढे जाण्यासाठी आता ही जागरूकता लोकांमध्ये हळूहळू वाढत चालली आहे, ती अधिक वेगाने पसरली पाहिजे.

या वास्तूंची अशी दुरावस्था होण्याचे आणखी एक कारण आहे. जेव्हा जेव्हा या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तेव्हा तो काही अपवाद वगळता तडीस जात नाही असा आज पर्यंतचा अनुभव आहे. बरेच गड हे पुरात्तव विभागाच्या (Archeological Survey of India - ASI) अखत्यारीत येत असल्याकारणाने ASI च्या गतीने आणि नियमांच्या चौकटीनुसार हे काम सुरु राहतं. जसा निधी मिळेल तसं जतन करायचं काम पूर्ण केलं जातं. शिवाय, ASI च्या कामामध्ये महाराष्ट्र राज्य काहीच हस्तक्षेप करू शकत नाही.

काय करायला हवं?


 • गड-किल्ल्यांना 'सांस्कृतिक पर्यट्न क्षेत्र प्रकार' घोषित करायला हवे.
 • 'महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळ' स्थापन करायला हवे.

महत्वाच्या कल्पना


 • गड-किल्ल्यांना 'सांस्कृतिक पर्यटन क्षेत्र प्रकार' (Heritage Tourism Destination) असा दर्जा देणे
 • 'महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळ' स्थापना

कार्यक्रम


महाराष्ट्रात इतके गड आणि किल्ले आहेत की त्यांची एक अधिकृत सूची तयार करायला हवी. अनेकांनी हा प्रयत्न केला आहे, ते सर्व प्रयत्न संकलित करून, इतिहासकारांकडून तपासून, त्यात अनेक प्रकारच्या माहितीची भर घालून एक कोषच बनवायला हवा. अशा प्रकारे एकत्र केलेली सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देता येईल. त्यात वेगवेगळ्या युगातील आणि कालखंडातील गडांची वर्गवारी असू शकेल. भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती तर असेलच पण सध्या तिथे पर्यटकांना जाण्यासाठी काय सुविधा आहेत, वाहतूक व्यवस्था कशी आहे हे सुद्धा कळू शकेल.

हे सर्व प्रयत्न पर्यटन विभागाच्या माध्यमातून आणि या विभागाच्या समन्वयानेच होतील.

गड-किल्ल्यांना 'सांस्कृतिक पर्यटक क्षेत्र प्रकार' (Heritage Tourism Destination) असा दर्जा सांस्कृतिक पर्यटन क्षेत्र विकसित करून गड-किल्ल्यांना या अखत्यारीत घेऊन मग त्यांचा विकास केला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची देखभाल आणि संवर्धन हे एक विशेष कौशल्य असणारे काम आहे. त्यासाठी कुशल कारागीर व प्रशिक्षित कामगारांची मदत घ्यावी लागेल. गडांचे आणि किल्ल्यांचे संवर्धन करून ते सांस्कृतिक पर्यटन क्षेत्राच्या अमलाखाली येतील

प्रत्यके सांस्कृतिक पर्यटन क्षेत्राला काही विशिष्ट मानदंड असायला हवेत. केंद्र सरकारच्या "Model Heritage Regulations" या मार्गदर्शक सूचीमध्ये सुचवल्याप्रमाणे ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करायचे आहे. या वस्तूंजवळ अतिथिगृह आणि विश्रामगृह बांधाव्यात असे त्यांनी सांगितले आहेच. इतरही काही मानक असावेत असं आम्ही सुचवत आहोत (पहा चौकट क्र. १.)

चौकट क्र. १ - सांस्कृतिक पर्यटन मानक (Heritage/Cultural Tourism norms):

 • या वास्तूंच्या जतनासाठी पर्यटकांच्या, तिथे काम करणार्‍या लोकांच्या संख्येवर मर्यादा असाव्यात.
 • सांस्कृतिक वास्तूच्या भवताली पायवाटा विकसित केलेल्या असाव्यात.
 • इतिहासात आणि संस्कृतीत पारंगत असे गाईड असावेत.
 • ती वास्तू ज्या काळातली आहे त्या काळातले कपडे, रोजच्या वापरातल्या वस्तू, खाद्य पदार्थ, जीवनशैली दर्शविणार्‍या गोष्टींचे संग्रहालय तिथे असावे.
 • शाळा-महाविद्यालयातले अभ्यास-गट इतिहास प्रकल्पांसाठी यावेत म्हणून प्रयत्न केले जावेत.
 • ऐतिहासिक महत्व सांगणार्‍या चित्रफिती, फिल्म, परिसंवाद त्या परिसरात आयोजित करण्यात यावेत.
 • ऐतिहासिक काळात असायची तशी तलवारबाजी, घोडेस्वारी, पारंपारिक खेळाची प्रात्यक्षिके आयोजित केली जावीत आणि पर्यटकांनी यात सहभागी होता यावे असे नियोजन असावे.

महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळाची स्थापना

महाराष्ट्रात आज अशा बर्‍याच वास्तू, किल्ले, बागा आहेत ज्यांची अपुर्‍या निधीपोटी, अनास्थेमुळे दुर्दशा झाली आहे. अशा वस्तूंचे संवर्धन करून त्यांना पुन्हा सुशोभित करून जनतेसाठी खुले करण्याचे काम आपण करायला हवे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळ या संस्थेची स्थापना करावी असे आपण सुचवत आहोत. या संस्थेचा हेतू गड-किल्ले, ऐतिहासिक वाडे, वास्तू, सांस्कृतिक जागा, बागा, डोंगर यांचे जतन करून त्यांना स्थानिक लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुल्या करून देणे असे असेल. या जागांचे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व लक्षात घेऊन संवर्धन, पुनर्बांधणी आणि सुशोभीकरण करण्यात येईल. पर्यावरणाचा समतोल राखून, स्थानिक लोकांचे हित जपून हे संवर्धन केले जाईल.

या उपक्रमासाठी लागणारा निधी हा नागरिकांच्या मदतीनेच गोळा केला जावा असे आम्हाला वाटते. महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूसच या संवर्धनातील गुंतवणूकदार वा भागीदार (stakeholder) असेल. या कामासाठी लागणारे मनुष्यबळ सुद्धा स्वयंस्फूर्तच असेल. इतिहास प्रेमी, निसर्गप्रेमी, विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य माणूस हे या उपक्रमात भाग घेऊ शकतील.


Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.