भाषा आणि समाज

उद्याचा महाराष्ट्र

मराठी माणसाचा, मराठी भाषेसाठी आणि संपन्न मराठी संस्कृती असलेला स्वाभिमानी, सुसंस्कृत, सक्षम महाराष्ट्र

भाषेवर समाज उभा रहातो, मोठा होतो असा जगाचा अनुभव आहे. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्नं आमच्या उराशी आहे. तसा तो घडवायचा तर भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाहीतर विकास व्हायचा पण आम्ही स्वत: लाच, स्वत:च्या इतिहासालाच विसरायचो. मराठी समृद्ध करून सध्याच्या जागतिकीकरणात, आधुनिकीकरणात तिला ज्ञानभाषा करण्याचं, तिला जागतिक व्यापार-उदीमाची भाषा करण्याचं आमचं स्वप्न आहे. ते का करायचं, कसं करायचं ह्याची ही समग्र योजना. भाषेबरोबरच मराठी संस्कृती आणि मराठी समाज कसा असावा, कसा असेल ह्याचंही चित्रं ह्या विभागात मांडत आहोत. म्हणूनच म्हणतो आहोत - "असा असेल आमच्या स्वप्नातला उद्याचा महाराष्ट्र".

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापनाच मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीच्या रक्षणासाठी, त्याच्या न्याय्य हक्कासाठी आणि त्याला उज्वल वैभव प्राप्त करून देण्यासाठी झाली. अगदी पहिल्यापासूनच ह्यासाठी पक्षानं आंदोलनं केली, लढे दिले आणि पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यासाठी केसेस अंगावर घेतल्या.

ह्या मराठीपणाचे संरक्षण, जतन आणि त्याची प्रगती करणं हा पक्षाचा ध्यास आहे. "मराठी माणसाचे गोमटे करणे" हा पक्षाच्या विचारांचा आत्मा आहे.

माणूस म्हणजे भाषा - भाषा आहे म्हणून माणूस आहे

माणसाला भाषाच नसती तर काय झालं असतं? प्राणी आणि माणूस ह्यात काय फरक असता? प्राण्यापासून माणूस वेगळा आहे कारण माणसाकडे भाषा आहे. माणसाला भाषा सापडली आणि त्याची प्रगती सुरु झाली. आपल्या भाषेतून माणूस जग बघायला लागला. आपण काय शिकलो ते जगाला सांगायला लागला. जगाकडून आपल्या भाषेतच शिकू लागला. लहान मूल बघा. आईचे शब्द त्याच्या कानावर पडतात आणि त्याची जगाची ओळख सुरू होते. त्यामुळे एखाद्या मुलाचा जन्म जसा त्याच्या घरात होतो, कुटुंबात होतो तसाच त्या मुलाचा जन्म त्याच्या भाषेत होतो. मुलाचा जन्म कुठे झाला असं आपण म्हटल्यावर आपण त्याच्या गावाचं नाव सांगतो किंवा त्याच्या घराचं नाव सांगतो. ते खरंच आहे पण तसंच हेही खरं आहे की त्या मुलाचा जन्म एका भाषेत होतो.

ह्या संदर्भात ई. एम. सियोरान नावाच्या विचारवंताचं वाक्य खूप छान आहे, त्यानी म्हटलं आहे - "One does not inhabit a country; one inhabits a language." म्हणजे, "माणूस कुठल्या देशाचा नसतो, तर तो एका भाषेचा असतो.

म्हणूनच "माणूस म्हणजे त्याची भाषा". मराठी माणूस म्हणजे मराठी भाषा.

म्हणूनच भाषेच्या मुद्दयावर जगात लढाया झाल्या, देश निर्माण झाले. देश तुटले. आपल्या देशात भाषेवरच राज्यं निर्माण झाली. पाकिस्तान आणि बांगला देशाचं उदाहरण घ्या. धर्म एक, पण भाषा वेगळी. फार काळ हा फरक टिकू शकला नाही. नवा देश निर्माण करावा लागला. युरोपमधले देश घ्या. त्यांचा भूगोल सारखा आहे. व्यापारातलं चलन एक आहे पण देश वेगळे आहेत कारण त्या त्या देशाची भाषा वेगळी आहे. सध्याच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात देखील भाषेवर आधारित देशाचं वेगळेपण ते देश टिकवून आहेत आणि ते वेगळंच असलं पाहिजे म्हणून अत्यंत आग्रही आहेत.

म्हणूनच, भाषेपासून माणसाची ओळख वेगळी करता येत नाही.

आमचीही ओळख जगाला आहे ती आम्ही मराठी भाषिक म्हणूनच. ती ओळख आपणच जपली पाहिजे. दुसरे कोणी येऊन ती ओळख जपणार नाहीत. आपल्यालाच त्यात लक्ष घालायला पाहिजे. आपल्यालाच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भारतीय राज्यघटनेनंही माणसाचं अस्तित्व हे भाषेवर आहे हे बरोब्बर ओळखून भाषावार प्रांतरचना केली. त्यात असं मानलं की एक भाषा असेल तर ती राज्यं सांस्कृतिकदृष्ट्या एक रहातील. एका भाषेत बोलतील, एका भाषेत व्यवहार करतील, एका भाषेत पुढे जाण्याचं स्वप्न पहातील. आपल्या भाषेचा विकास करतील आणि देशात जी विविधता आहे ती जपतील. अर्थात भाषावार प्रांतरचना सहजासहजी झालेली नाही. त्यासाठी देशात आणि आपल्या महाराष्ट्रात लढे झाले. लोकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं, १०६ हुतात्मे झाले आणि मराठी माणसासाठी महाराष्ट्राची निर्मिती झाली. मराठी माणसाच्या अस्मितेचा मान राखला गेला.

इतिहासातून आपण आणखी एक गोष्ट शिकली पाहिजे.

माणसाचा इतिहास असं सांगतो की ज्या ज्या समाजांनी प्रगती केली, यशाची उत्तुंग शिखरं गाठली आणि आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास केला त्यांची अस्मिता पक्की होती. दुसरं महायुद्ध झालं त्यावेळची अमेरिका घ्या किंवा युद्धाच्या अगोदरची जर्मनी घ्या किंवा व्हिएटनाम, कोरिया सारखी राष्ट्रं घ्या. एका भावनेनं, एका विचारानं हे समाज एकवटले होते. त्यांची अस्मिता जागृत होती, पक्की होती.

अस्मिता म्हणजे मी कोण आहे ह्याची जाणीव. ज्याला प्रगती करायची आहे त्याला किंवा तिला आधी मी कोण आहे ह्याची जाणीव हवी. "मी मराठी आहे, माझं घर मराठी आहे, माझी भाषा मराठी आहे, माझी संस्कृती मराठी आहे, माझा इतिहास मराठी आहे, माझी वृत्ती मराठी आहे, माझं भविष्य मराठी आहे आणि माझं स्वप्नंही मराठीच आहे".

माणसाला भाषा कशी सापडली, माणसाचे पहिले शब्द कुठले, ते त्यानं कसे शोधले असतील, नंतर त्यानं भाषा कशी संपन्न केली असेल? ह्यावर खूप संशोधन झालं आहे आणि अजूनही ते चालू आहे.

ते काहीही असलं तरी एक गोष्ट नक्की की भाषा ही समाजाला घट्ट धरून ठेवते. समाजामध्ये एकीची भावना निर्माण करते. भाषा ही आपली ओळख आहे. भाषा हे आपलं अस्तित्व आहे. भाषा म्हणजेच मी आहे.

म्हणूनच, मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्राची जडणघडण मराठी भाषेमुळे झाली, मराठी भाषेच्या भोवती झाली.

त्यामुळेच देशाची स्थापना झाली तेंव्हा आपण भाषावार प्रांतरचना स्विकारली आणि मराठी भाषिकांचं राज्य म्हणजे महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची घटनात्मक चौकटीतही ओळख झाली.

आज महाराष्ट्रात ६७ टक्के मराठी माणूस आहे, म्हणजे ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशी महाराष्ट्रातील तीन माणसांपैकी दोन माणसं आहेत. महाराष्ट्राची स्थापना झाली तेंव्हा राज्यात मराठी माणूस ७५% टक्के होता. त्याअगोदर म्हणजे आजपासून शंभर वर्षापूर्वी मराठी माणूस महाराष्ट्रात ९५% टक्के होता आणि असंच चालू राहिलं तर २०५० पर्यंत मराठी माणूस ६०% टक्क्यांच्या खाली जाईल. मराठी ही ज्यांची मातृभाषा आहे अशी माणसं महाराष्ट्रात अल्पसंख्यांक होतील आणि ज्या माणसांची मातृभाषा मराठी आहे ती मराठीत किती बोलतील? त्यांची परिसरभाषा (म्हणजे त्यांच्या आसपास जी भाषा बोलतात, ज्या भाषेचा वापर होतो किंवा मराठी मुलांच्या कानावर कुठली भाषा पडते) किती प्रमाणात मराठी असेल? शाळेत, कार्यालयीन कामकाजात, न्यायदानाच्या कामात, बॅन्केत, रस्त्यावर, दूरदर्शनवर किती मराठी राहील? ह्या सर्वांची उत्तरं आत्ता देणं कठीण आहे.

महाराष्ट्रात मराठी टक्का कमी व्हायला काही कारणं आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी तीस-चाळीस वर्ष महाराष्ट्रात कारखानदारीची सुरुवात झाली. महाराष्ट्रात म्हणजे मुख्यत: मुंबईत. हे कारखाने मुंबईतच का आले? ह्या कारखान्यासाठी भांडवल घेऊन त्याची गुंतवणूक मुंबईतच का केली गेली? काही लोक ह्याचं एक सोपं उत्तर देतात की मुंबईला बंदर आहे म्हणून मुंबईत कारखाने आले. हे चूक नाही पण फक्त बंदर एव्हढंच कारण नाही, कारण मुंबईबरोबरच तेंव्हा कोलकता, चेन्नई, कालिकत, विशाखापट्टणम अशी बंदरं होतीच. मग मुंबईच का? मुंबईतच कारखानदारी का वाढली?

मुंबई आणि त्याच्या आसपास कारखानदारी वाढण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे इथं असणारा शिक्षित, कुशल आणि कष्टकरी कामगार. १९२०-१९३० च्या सुमारास महाराष्ट्र आणि इतर ठिकाणची तुलना केली तर हे लक्षात येईल की महाराष्ट्रात शिक्षणाचं प्रमाण देशाच्या इतर भागापेक्षा खूप होतं. दुसरं म्हणजे महाराष्ट्रात असणारं सामाजिक वातावरण. महात्मा फुल्यांच्या काळापासून म्हणजे १८६०-७० च्या दशकापासून, आणि नंतर शाहू महाराजांच्या राजकीय

आशिर्वादानं, लोकमान्य टिळक आणि त्यांच्या बरोबर असलेल्या राष्ट्रीय शिक्षणाच्या कार्यकर्त्यांमुळे महाराष्ट्रात समाज प्रबोधनाचं एक युग निर्माण झालं. त्यानं शिक्षणाचा प्रसार झाला, समाजमनाच्या कक्षा रूंदावल्या आणि महाराष्ट्रात भांडवल येणं, त्यामुळे कारखानदारी सुरु होणं ह्याला वाव मिळाला.

जगात सर्वत्र असं झालं आहे. सुरुवात पैसा टाकून होत नाही. सुरुवात सामाजिक परिस्थितीनं होते. तो परिस्थिती योग्य असावी लागते. हे पहा नुसता पैसा काहीच करत नाही पण ते वापरणारी माणसं कुठे आहेत, ती किती सक्षम आहेत ह्यावर किती प्रगती होते, उद्योग किती पुढे जातात हे ठरतं. तेंव्हा सामाजिक विकास आधी व्हावा लागतो, समाज आधी तयार असावा लागतो आणि मग आर्थिक विकास होतो. भांडवलदारी, कारखानदारी पोकळीत सुरु होत नाही. ज्या समाजात शिक्षण आहे, आधुनिकता आहे, पुरोगामी विचार आहे, प्रबोधनाची प्रक्रिया झालेली आहे तिथेच कारखानदारी मूळ पकडते आणि तिथंच आधुनिकता विस्तारते.

महाराष्ट्रात नेमकं हेच झालं.

भांडवल आलं की मग कुशल-अकुशल कामगारांची गरज लागली आणि ती लागली की मोठ्या प्रमाणावर मुंबईत महाराष्ट्रातून आणि देशातून लोक स्थायिक होऊ लागले. मुंबई देशातील आर्थिक आणि औद्योगिक घडामोडींचं केंद्र बनली. पुढे तो विस्तार ठाणे, पुणे अशा ठिकाणी झाला आणि आर्थिक प्रगतीचे वारे महाराष्ट्रात वाहू लागले. नोकरी, उद्योग-उदीमाच्या संधी निर्माण झाल्या. सहाजिकच मुंबई आणि महाराष्ट्राकडे लोकांचा ओघ सुरु झाला. लोक आपली भाषा घेऊन आले आणि अगोदरच समाज प्रबोधनाची आणि लोकांना सामावून घेण्याची सवय असणारा महाराष्ट्र सर्वांसाठी एक संधी बनला.

हे झालं ह्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे, आम्हालाही आहे. पण ते झाल्यानंतर हळूहळू मराठी टक्का कमी होऊ लागला. मुंबई आणि आसपासच्या परिसरावरचा मराठी प्रभाव कमी होऊ लागला.

मराठी माणूस सर्वांना सामावून घेणारा आहे, उदारमतवादी आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात लोक येत राहिले. महाराष्ट्रात मराठी खेरीज इतर भाषा बोलणारे लोकही वाढू लागले. त्याचा परिणाम मराठीवरही झाला. मराठीही बदलत गेली.

एक मात्र खरं की भाषा म्हणजे काही दगड-माती, डोंगर नाही की ज्यात काही बदलच होत नाही. खरं म्हणजे त्यातही काही वर्षानं बदल होतो. भाषा ही बदलत जाते. जसं शिवाजी महाराजांच्या काळातलं मराठी किंवा त्याच्याही नंतरचं महात्मा फुले ह्यांच्या काळातलं मराठी आणि आत्ताचं मराठी ह्यात फरक आहे. त्यामुळे भाषा बदलते हे खरंच आहे आणि ते आपण स्विकारायलाही पाहिजे. सध्या मोबाईल मुळे किंवा इंटरनेटमुळेही भाषा बदलतीय पहा. त्यामुळे ती बदलत जाणार, काळ बदलतो तसे त्यात बदल होत रहाणार हे आपण मान्य करायला पाहिजे.

पण, बदलणं आणि कमी होणं किंवा बदलणं आणि संपत जाणं ह्यात फरक आहे. असं होत राहिलं तरी मराठीपणा संपायचं काहीच कारण नाही. लंडनला जगभरातून लोक आले, पॅरिसला आले, बिजिंगला आले म्हणून तिथला स्थानिक सांस्कृतिक प्रभाव कमी झाला नाही. आम्हालाही विकास हवा आहे, जगाला जोडलं जायला हवं आहे, जगाशी व्यापार हवा आहे, प्रगती हवी आहे पण त्यासाठी आमची मराठी पुसली जाण्याची गरज नाही. त्यासाठी आम्ही आमची भाषा, आमची ओळख, आमची अस्मिता, आमची थोर परंपरा विसरणार नाही, हरवणार नाही, सोडणार नाही. मराठी टिकवून, मराठीला मोठं करत आम्ही जगाचे नागरिक बनणार.

आमची जगाबरोबर व्यापार करण्याची भाषा भले असेल इंग्रजी पण मन असेल मराठी. इंग्रजीची खिडकी असेल पण डोळे असतील मराठी. योजना करू आम्ही जगाशी स्पर्धा करण्याची पण त्याची योजना आखू मराठीतच. त्याचं स्वप्नही पाहू मराठीत, आणि त्याचा विजयही साजरा करू मराठीतच.

त्यामुळे एक नक्की की आपण लक्ष दिलं नाही, काही ठोस केलं नाही तर मराठी भाषा महाराष्ट्रातच टिकणार नाही. हळूहळू करत तिचं अस्त्तित्व संपत जाईल आणि कदाचित असं होईल की ती एक फार कमी वापरली जाणारी भाषा होईल, नगण्य होईल किंवा जवळजवळ संपत जाईल. आमची भाषा नगण्य म्हणजे आम्ही नगण्य, ते आम्हाला कसं चालेल.

अशी मराठी भाषा संपणं आपल्याला चालेल का? अशी मराठी भाषा कमी होणं आपल्याला परवडणारं आहे का?

भाषेविषयी असलेला भावनात्मक मुद्दा थोडा बाजूला ठेवून अगदी रोकडा व्यवहार म्हणूनही मराठी भाषा संपलेली आपल्याला चालेल का? असा प्रश्न विचारण्याची आज गरज आहे. मुळात एखादी भाषा का संपते, का नष्ट होते, ती तशी झाल्यामुळे काय होतं, त्याचे काय परिणाम होतात हे पहायला हवं आहे. एके ठिकाणी फार सुंदर म्हटलं आहे - "भाषा विसरली जाते जेंव्हा मुलं ती भाषा विसरतात तेंव्हा".

फेब्रुवारी २०११ च्या 'सायंटीफीक अमेरिकन' च्या अंकात लेरा बोरोडिट्सकी नावाच्या शास्त्रज्ञ बाईंनी त्यांच्या "How Languages Shapes Thought" ह्या लेखामध्ये असं म्हटलंय की भाषा तुमचा विचार ठरवते. तुम्ही कुठली भाषा वापरता ह्यावर तुम्ही काय विचार करता हे बरचसं ठरतं. म्हणून त्या लेखात त्या म्हणतात की माणसानं त्याच्या भाषेतच विचार करायला हवा, तोच त्याचा खरा विचार असतो.

हे खरं आहे. "महाराज, तोफेच्या तोंडचे आवाज ऐकल्याशिवाय मी लढाई चालूच ठेवेन" असं वाक्य अगदी चांगल्या चिनी भाषेत भाषांतरित केलं तरी मराठी माणसाच्या अंगात जे स्फरण चढेल तसं चिनी माणसाच्या अंगात चढेल का? किंवा पंढरपूरला, चंद्रभागेच्या काठाला "विठ्ठल, विठ्ठल … विठ्ठल …" ह्या गजराचं नेमकं भाषांतर तुम्ही कसं करणार? आणि, मराठी माणसाच्या मनात त्यानं जे उमटेल ते बाकीच्यांच्या मनात उमटेल का?

तर, नाही. त्यामुळे "माणूस" म्हणजे "त्याची / तिची भाषा" हे पक्कं. म्हणून मराठी माणूस टिकवायचा असेल तर मराठी भाषा टिकवायला हवी.

मराठी नुसती टिकवायला हवी असं नाही तर ती वाढवायला हवी, जसं -

इथल्या मराठी मुलामुलींनी वैभवशाली महाराष्ट्राचं स्वप्न मराठीत पहावं आणि असं स्वप्न पहाण्याची सवय त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला लावावी.
मराठीतील कादंबरीला साहित्याचं नोबेल मिळावं.
मराठी चित्रपटाला ऑस्करसारखा पुरस्कार मिळावा, आणि मिळत रहावाच पण एके वर्षी जागतिक चित्रपट महोत्सवात "मराठी चित्रपटांचेच फक्त विशेष प्रदर्शन" व्हावे. मराठी मध्ये मूलभूत शास्त्रीय संशोधन व्हावं जे इंग्रजीसह इतर भाषांमध्ये भाषांतरित करण्यासाठी चढाओढ व्हावी.
मराठी किल्ले, महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे, लेणी, जंगले, समुद्रकिनारा जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर यावा.
जगाच्या महत्वाच्या शहरात मराठी उद्योजकांचं विशेष केंद्र असावं.
आपली अनेक गुणी, कर्तबगार मराठी मुलं फार मोठ़या प्रमाणात जगात काम करत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात मर्दुमकी गाजवत आहेत त्या सर्वांना महाराष्ट्रात यावं असं वाटावं, त्यांनी यावं आणि इथे महाराष्ट्रात, महाराष्ट्रासाठी संशोधन करावं, उद्योग काढावेत
जगातल्या पहिल्या १० विद्यापीठांमध्ये मराठी विद्यापीठ असावं.
जगातल्या महत्वाच्या विद्यापीठात मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी कला ह्यावर संशोधन व्हावं.
निवडक मराठी साहित्य जगातल्या महत्वाच्या भाषांत यावं आणि मराठीनं देखील इतर भाषेतील साहित्य भाषांतरीत करण्याचं काम करावं.
जगातल्या प्रगत देशांमधून मराठी तंत्रज्ञांना, संशोधकांना, तज्ञांना, संस्थांना मार्गदर्शनासाठी बोलावलं जावं.
मराठी बॅन्केच्या जगभरात शाखा व्हाव्यात
महाराष्ट्रानं जगाला मार्ग दाखवावा …
हो, महाराष्ट्रानं जगाचं नेतृत्व करावं, जगापुढच्या प्रश्नांना महाराष्ट्रातून उत्तरं मिळावीत… महाराष्ट्राकडून उत्तरं मिळावीत..

हा मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्यानं तो राजकारणाचा आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या "महाराष्ट्राच्या विकासाच्या समग्र योजनेचा" विषय आहे.

भाषा संपली तर एक इतिहास संपतो. त्या भाषेतलं ज्ञान हरवून जातं. भाषा संपली तर एक संस्कृती संपते. शेकडो, हजारो वर्षांची एक परंपरा संपते. एका मोठया समाजाची ओळख हरवते. कित्येक पिढ्यांनी जमा केलेलं संचित नष्ट होतं. त्या भाषेतील साहित्य, कला, संगीत, म्हणी, चालीरिती, खेळ, खाद्य-पदार्थ हे सारं संपून जातं..

एव्हिन्की ही अशीच एक संपत चाललेली भाषा. ह्या भाषेतील कवयत्री अलीटेट नेमतुश्कीन ह्यांनी एक सुंदर कविता केली आहे, स्वत:च्या भाषेवर. त्याचा स्वैर अनुवाद -

माझी भाषा मी कशी विसरू?

मी जर माझी भाषा विसरले,
आणि त्या भाषेतील गाणी विसरले
तर माझ्या डोळ्यांचा आणि कानांचा उपयोग काय?
आणि, माझ्या तोंडाचा तरी काय उपयोग?

मी जर माझ्या मातीचा वास विसरले,
आणि तिच्याशी इमान सोडलं
तर माझ्या हातांचा उपयोग काय?
आणि, माझ्या जगण्याचा तरी काय उपयोग?

माझी भाषा बरोबर नाही, ती कुचकामी आहे
ह्या मूर्ख कल्पनेवर मी विश्वास तरी कशी ठेवू?
जर माझ्या आईचे मरतानाचे अखेरचे शब्द
हे माझ्या, माझ्या भाषेतले, एव्हिन्कीतले असतील तर …

अलीटेट नेमतुश्कीन, एव्हिन्की भाषेतील कवयत्री

जगाची भाषा आणि आमची भाषा

सध्या जगात जागतिकीकरणाचे आणि आधुनिकीकरणाचे वारे वहात आहेत. प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे की आपण जगाशी जोडले गेलो पाहिजे, आपला विकास करायचा असेल तर आपल्याला जगाची भाषा शिकायला हवी. जग ज्या ज्या भाषांमध्ये विचारांची देवाणघेवाण करतं, व्यापार करतं, राजकारण करतं त्या भाषांमध्ये इंग्रजी भाषा आहे (आपल्याला हेही लक्षात ठेवायला हवं की "किती लोक ही भाषा बोलतात" हे पाहिलं तर इंग्रजी जर चौथ्या क्रमांकाची असेल तर मराठीही १५ व्या क्रमांकाची भाषा आहे पहा आलेख.

त्यामुळे आपण इंग्रजी शिकायला हवी ह्यात काहीच चूक नाही. काहीच गैर नाही. फक्त जगात पुढे जायचं म्हणून इंग्रजी शिकायची आणि म्हणून मराठीचा दुस्वास करायचा ह्याची गरज नाही. ते करू नये.

आपल्याला, आपल्या मुलांना मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असायला हवं. अशीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही भूमिका आहे.

जगात चीन नवनव्या दिशा पादाक्रांत करीत आहे पण त्यांनी चीनी, मंडारीन ह्या भाषांचा दुस्वास चालवला नाही. जर्मनी, फ्रांस, जपान ह्यासारखे देशही प्रगती करीत आहेत पण त्यांनी त्यांची भाषा सोडलेली नाही. घट्ट धरून तर ठेवली आहेच पण त्यात आणखी काय काय करता येईल, आपली भाषा कशी संपन्न, समृद्ध करता येईल आणि आपल्या भाषेत जगाचं ज्ञान कसं आणता येईल ह्याचाही त्यांचा प्रयत्न चालू आहे. आपणही तसं करण्याची गरज आहे.

नुसतं "मराठी वाचवा, मराठी वाचवा" असं म्हणत बसण्यात काही अर्थ नाही. त्यासाठी मराठी वातावरण महाराष्ट्रात निर्माण करावं लागेल. ते कसं करायचं हेच या विभागात सविस्तर सांगत आहोत.

तळटीप



Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.