ग्रीक पुराणकथेमध्ये "गाईया" नावाची देवता आहे. आपल्याकडे "पृथ्वी" देवता आहे तशी. ती "भूमाता" किंवा "पृथ्वी माता" आहे असा तिकडे समज आहे. ह्याच कल्पनेवर आधारित जेम्स लव्हलॉक नावाच्या शास्त्रज्ञाने एक "गाईया" ह्या नावानं एक सिध्दांत मांडला. जेम्स लव्हलॉक म्हणतात की "पृथ्वी" ही एका सजीव प्राण्यासारखी आहे. जी स्वत:चं ला लागणारी ऊर्जा किंवा अन्न स्वत: मिळवते. बाहेरच्या वातावरणातून जी संकटं येतात त्याचा ती मुकाबला करते, तशी तिची स्वतंत्र व्यवस्था आहे. स्वत:च्या तब्येतीत कुठे काही झालं, कुठे काही तापमान वाढलं तर त्याची दुरुस्ती करण्याची यंत्रणा तिच्याकडे आहे. मग "पृथ्वी"ला सजीव म्हणावे का?
सजीवाची एक व्याख्या अशी आहे, "सजीव जो की जो स्वत:चं अन्न स्वत: मिळवतो, त्यासाठी त्याची स्वत:ची एक व्यवस्था असते. सजीव जो की जो बाहेरून काही संकट आलं तर त्याचा मुकाबला करतो, निदान त्याला प्रतिकार करतो".
मग "पृथ्वी" सजीव नाही का?
जिची फुफ्फुसं म्हणजे जंगलं आहेत, नद्या आहेत तिच्या रक्तवाहिन्या.
समाजही खरं म्हणजे असाच आहे. "जिवंत" समाज म्हणजेही असाच. जो स्वत:ला लागेल ते स्वत: निर्माण करतो, मिळवतो, साठवतो आणि वापरतो. त्याच्यावर संकट आलं, हल्ला झाला तर त्याचा प्रतिकार करतो. उद्योग करतो, एकत्र रहातो.
अशा जिवंत, उद्योगशील समाजाला ही निर्मिती करण्यासाठी, उद्योग करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी योग्य वातावरण हवं, चांगल्या सुविधा हव्यात, उत्तम संसाधनं हवीत. ह्या विषयीचा आपला हा विभाग तिसरा.
जसं, उत्तम रस्ते, रेल्वे ह्या तिच्या रक्तवाहिन्या, तर जंगलं, मोकळ्या जागा, बागा तिची फुफ्फुसं. चांगली मलनिस्सारण व्यवस्था, वीज निर्मिती आणि वीज वितरण, उत्तम बाजार, शहरं ह्या समाजाच्या इतर व्यवस्था.