आमची भूमिका

मनोगत 


सप्टेंबर २०१४

हा आराखडा कशासाठी?

माझ्या तमाम मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो,

९ मार्च २००६ या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि त्यानंतर दहाच दिवसांनी मुंबईच्या शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेत "महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू-प्रिंट मी महाराष्ट्रासमोर आणेन" असं म्हटलं होतं. जवळजवळ आठ वर्षांनी तो शब्द पूर्ण केल्याचं समाधान आज वाटत आहे.

या इतक्या वर्षात "अजून कशी ब्लू-प्रिंट आली नाही?" अशा प्रकारचे प्रश्न मला खूप वेळा विचारण्यात आले. टीकाही झाली, पण माझं यावरचं काम सतत चालू होतं. हेच इतक्या वर्षांचं काम मी आज तुमच्यासमोर ठेवतो आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे. जे लोक सत्तेवर होते, आहेत, त्यांना "तुम्ही काय केलंत?" हे विचारण्यापेक्षा तुम्ही या राज ठाकरेला गेली आठ वर्षं विचारत राहिलात याचा अर्थ तुम्हाला या राज ठाकरेकडून अपेक्षा आहेत. सत्तेवर आहेत त्यांच्यापेक्षा तुम्ही मला विचारत राहिलात ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. याबाबतीत तुमचा अपेक्षाभंग होणार नाही अशी मला आशा आहे.

ज्या समाजाला हजारो वर्षांचा इतिहास आहे, ज्या समाजाची एक वैभवशाली परंपरा आहे, त्या समाजानं पुढे कुठल्या दिशेनं जावं? त्या समाजानं काय आकांक्षा धरावी? आपल्या विकासाचा मार्ग काय आणि कसा निवडावा ही गोष्ट काही दोन-चार महिन्यांची किंवा पाच-सात जणांनी बसून नुसती लिहून काढण्याची नाही. त्यासाठी खूप फिरावं लागणार होतं. खूप पुस्तकं, अहवाल, शोध-निबंध पहावे लागणार होते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मोठमोठी माणसं आहेत, संस्था आहेत, त्यांना भेटणं, त्यांचं ऐकून घेणं याची गरज होती. कुठल्याही संशोधनाला एक शिस्त असावी लागते, एक शास्त्रीय पद्धत बसवून त्याप्रमाणे काम करावं लागतं. आम्ही हे सगळं गेल्या काही वर्षांत केलं आणि त्या अभ्यासातून आम्ही ज्या गोष्टी समजलो आणि महाराष्ट्राला जे करण्याची आज नितांत आवश्यकता आहे असं आम्हाला त्यातून वाटलं ते आज तुमच्यासमोर अत्यंत नम्रपणे ठेवत आहोत.

महाराष्ट्रातील जनतेनं त्याचा स्वीकार करावा, त्यावर आपल्या सूचना द्याव्यात आणि आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला प्रगतीच्या एका शिखरावर नेऊन ठेवावं एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. ज्या एका महान माणसानं आम्हाला आमची ओळख दिली, आम्हाला आम्ही कोण आहोत हे सांगितलं आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्याबरोबरच ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला त्या संत-समाजसुधारकांना मी हा "महाराष्ट्राचा विकास आराखडा" अत्यंत आदरपूर्वक अर्पण करीत आहे. आपण सर्वांनी त्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती.

सस्नेह जय महाराष्ट्र!

आपला नम्र

राज ठाकरे

विकास आराखडा कशासाठी


राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवानं आपण तशा व्यापक अर्थानं त्याच्याकडे पाहत नाही.

"आपला देश किंवा राज्य कसं चाललं पाहिजे? कुठल्या तत्वांवर चाललं पाहिजे? त्याचे आग्रह काय असले पाहिजेत? राज्य कशासाठी चालवलं पाहिजे? याचा विचार मांडणं, त्या विचाराचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवणं" म्हणजे राजकारण.

म्हणूनच राजकारण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं, त्या विचाराला मूल्यांचा आधार असणं आवश्यक आहे, हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा, काही आग्रह असणं आवश्यक आहे. तो विचार आपण सर्वांनी मिळून ठरवावा, कुठे जायचं ते निश्चित करावं, आपली दिशा पक्की असावी आणि आपण सर्वांनी मिळून एका मोठ्या मराठी समाजाचं आणि संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न पहावं म्हणून हा "महाराष्ट्राचा विकास आराखडा" आम्ही तयार केला आहे.

स्वत:चं राज्य कशासाठी आहे, ते काय करणार आहे याचा आराखडा देणं ही गोष्ट इतिहासाला नवीन नाही. जगात कित्येक राजांनी, राष्ट्राध्यक्षांनी, पक्षांनी आपला दृष्टीकोन, आपला विचार त्यांच्या त्यांच्या लोकांसमोर ठेवला आहे. आपल्या समाजाला पुढे नेण्याचा आराखडा दिला आहे. आमचाही तोच प्रयत्न आहे.

यातलं सर्वात मोठं उदाहरण आपल्या सम्राट अशोकचं. इसवी सन पूर्व २६४ ते २२७ म्हणजे सुमारे २२५० वर्षांपूर्वी हा राजा होऊन गेला . केरळ आणि तमिळनाडूचा काही भाग सोडला तर आजच्या भारताच्या जवळजवळ सर्व भागावर आणि आजच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान पर्यंत सम्राट अशोकचं साम्राज्य होतं. जवळजवळ चाळीस वर्षं हा राजा सत्तेवर होता आणि त्यानं समाजोपयोगी अनेक कामं केली. असं म्हणतात की माणसाच्या इतिहासातला सम्राट अशोक हा पहिला राजा की ज्यानं लोकांचं भलं करणं, आर्थिक विकास करणं आणि समाजात शांतता पसरावी म्हणून प्रयत्न करणं ही कामं केली. एच.जी. वेल्स नावाचे एक फार मोठे इतिहासकार होऊन गेले. त्यांचं एक पुस्तक आहे, The Outline Of History या नावाचं. त्या पुस्तकात ते सम्राट अशोकचा उल्लेख फारच आदरानं करतात. ते म्हणतात - "इतिहासाच्या पानांपानांतील हजारो राजा-सम्राटांमध्ये सम्राट अशोकचं नाव सर्वोच्च स्थानातील एकुलता एक तारा असावा असं आहे ."

आणखी एक गंमत म्हणजे याच सम्राट अशोकने आपल्या साम्राज्यात ठिकठिकाणी शिलालेख लिहून आपले विचार, आपली तत्वं किंवा एका अर्थानं "आपली ब्लू-प्रिंट" लोकांसमोर ठेवली. यातीलच एक शिलालेख आपल्या महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्यातील सोपारा या गावाजवळ सापडला आहे .

सम्राट अशोक प्रमाणेच काही राजांनी, राष्ट्राध्यक्षांनी, राजकीय विचारवंतांनी आपापल्या परीनं त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या दृष्टीनं समाज कसा असला पाहिजे याची मांडणी केली आहे. आपल्याकडे चाणक्यानं इसवी सन पूर्व तीनशेच्या आसपास लिहून ठेवलं, १८४८ मध्ये कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एन्जल्सनी कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा लिहिला किंवा १८४९ मध्ये हेन्री डेव्हीड थोरो, ज्यांच्यापासून गांधीजींनी प्रेरणा घेतली आणि जॉन रस्कीन यांनी १८६० मध्ये समाज कसा असावा आणि राज्य कसं चालवावं हे लिहून ठेवलं. लेनिनने रशियात १९०५ मध्ये Two Tactics of Social Democracy in the Democratic Revolution हे पुस्तक लिहिलं किंवा गांधीजींनी १९०९ मध्ये त्यांची आदर्श भारताची संकल्पना "हिंद स्वराज्य" मध्ये मांडली. हिटलरनं लिहिलेलं "Mein Kamph" किंवा "माझा लढा" हे सुद्धा त्याच पठडीतलं लेखन जगानं पाहिलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची २२ तत्वं, माओनी सांस्कृतिक क्रांतीविषयी केलेलं लिखाण, किंवा धरमपाल यांनी १९८३ मध्ये The Beautiful Tree मध्ये लिहिलेल्या एका आदर्श समाजाची कल्पना यातून समाज कसा असावा, कसा चालावा या बाबतीत अनेक विचारवंतांनी, थोर लोकांनी लिहून ठेवलंच आहे. इथे त्यांच्याशी तुलना वगैरे करण्याचा मुळीच हेतू नाही. ही सर्व माणसं मोठीच आहेत, फक्त समाजाला पुढे जायचं असेल तर त्यासाठी विचार असावा, दृष्टी असावी आणि राजकारण हे समाजाला पुढे नेणारं असावं; असं जर असेल तर राजकारणाला पक्क्या विचाराची बैठक असावीच लागते हे मात्र अगदी निश्चित !

त्यामुळे राजकारणाला विचार असावा लागतो, काय योग्य किंवा काय अयोग्य हे ठरवायला लागतं आणि कशा मार्गानं पुढे जायला हवं हे ही सांगावं लागतं. राजकारणाचं काम समाजाला दिशा देण्याचं आहे. जो समाजाला दिशा दाखवतो, पुढे नेतो तो नेता.

आम्ही महाराष्ट्राचा विचार कसा करतो आहोत, या महाराष्ट्रानं आता कुठल्या मार्गानं जायला पाहिजे असं आम्हाला वाटतं या विषयी आमची भूमिका मांडणं हे या "महाराष्ट्राच्या विकासाच्या आराखड्यात" करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

एक प्रश्न तुमच्या मनात नक्की येत असणार की: एवढा गाजावाजा करून, अनेक वर्षं ती बनवण्यासाठी घेऊन ही ब्लू-प्रिंट किंवा हा "महाराराष्ट्राचा विकास आराखडा" लिहिण्याची खरंच काय गरज होती?

एकेकाळचा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेला महाराष्ट्र आज अधोगतीच्या मार्गावर आहे. देशात जे राज्य पुढारलेले व विकसित म्हणून ओळखले जायचे ते राज्य आज केवळ आपल्या गतवैभवाची टिमकी मिरवण्यात गर्क आहे किंवा खरं पाहिलं तर धड त्यातही गर्क नाही. इथे सध्या काही नवीन घडताना दिसत नाही. नवीन निर्मिती होत नाही. कुठल्याच क्षेत्रात नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांतील चांगल्या प्रयोगांना बळ मिळण्याऐवजी ते आज त्यांच्या अस्तित्वासाठीच धडपडताना दिसत आहेत.

जे राज्य सुधारकांचे राज्य म्हणून ओळखले जायचे ते आज नीतीमत्तेच्या अत्यंत खालच्या पातळीला जाऊन पोचले आहे. समाज सुधारकांचे हे राज्य आज स्त्री-भृण हत्येच्या दुष्कृत्यानं गाजत आहे. किंबहुना या अधोगतीची चिन्हे आज सर्वच क्षेत्रांत दिसत आहेत. राज्याच्या राजकीय नेतृत्वाच्या बाबतीत विचार केला तर आजच्या इतके भ्रष्ट व स्वार्थी राजकीय नेते व प्रशासन राज्याच्या इतिहासात कधीही सापडणार नाही. उद्योग क्षेत्रातूनही विशेष ऊर्जा मिळताना दिसत नाही.

राज्य आज कर्जात बुडाले आहे. राज्याच्या तिजोरीत जमा होणारा पैसा सार्वजनिक कामांसाठी वापरला जाण्याऐवजी भ्रष्ट नेते आणि अधिकारी स्वतःच्याच खिशात भरत आहेत. राज्यातील बहुतांश सरकारी - निमसरकारी संस्था (पालिका, ग्रामपंचायती, महामंडळे, सहकारी बॅंका, इ.) आर्थिक दृष्ट्या डबघाईला आल्या आहेत (२०११-१२ मध्ये अकोला महानगरपालिका बुडाल्यामुळे बरखास्त करावी लागली होती). आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडलेली आहे. सर्वत्र एक अंधाराचं, निराशेचं वातावरण आहे.

या बद्दल फार काही सांगण्याची गरज नाही. रोज, वर्तमानपत्रातील अग्रलेखांतून, वाहिन्यांच्या चर्चा सत्रांतून आणि प्रत्यक्ष अनुभवातून आपण हे सर्व ऐकतो आहोत, पाहतो आहोत. अनुभवतो आहोत.

हे सर्व आपल्याला इतक्या खोल दरीत घेऊन गेलंय की आपली स्वप्नं पहायची क्षमताच आपण हरवून बसलो आहोत.

जागतिक पातळीवर मात्र प्रगती, विकास या संकल्पनांचा विचार नव्याने आणि फार झपाट्याने होत आहे. एकीकडे जी-८ या बलाढ्य देशांची आर्थिक परिस्थिती कोसळत आहे. दुसरीकडे हवामान बदलाचे वारे अनिश्चितपणे सगळीकडे वाहत आहेत. आजपर्यंत कधी न जाणवलेला नैसर्गिक साधन संपत्तीचा र्हा्स होत असताना आपण उघड्या डोळ्यानं पाहतो आहोत. या सगळ्याची नोंद घेत आज जगात नव्या जीवन पद्धतीचा नवीन विचार मांडला जात आहे. हा विचार तपासून पाहण्यासाठी नवीन नवीन अभ्यास होत आहेत, नवीन सिद्धांत, नवीन कल्पना मांडल्या जात आहेत. अनेक ठिकाणी तर तसे प्रयोगही केले जात आहेत. माणसाला नेहमीच प्रश्न पडले आणि त्यातून त्यानं उत्तरं शोधली. किंबहुना प्रश्न पडले म्हणूनच माणसानं प्रगती केली. आव्हानं आली म्हणूनच त्यानं धडपड केली आणि समाज पुढे नेला. आज सर्वत्र याचा शोध फार गंभीरपणे चालू आहे. आपणच यात काही करत नाही. आपणच डोळ्यांवर झापडं लावून आपल्याच नादात मश्गूल आहोत.

आपल्याला जागं व्हायला पाहिजे. आज आपल्याला देखील एक स्वप्न पडायला पाहिजे.

जे स्वप्न आपल्याला दिशा देईल, सर्वांना एकत्र ठेवेल. एक उर्जा देईल. चारी बाजूनं दाटत असलेल्या गर्द काळोखात एक दिवा पेटवेल.

या दरीतून महाराष्ट्राला बाहेर खेचण्यासाठी काही मूलभूत विचार करण्याची आम्हाला आवश्यकता वाटली आणि विचार करताना तो विचार लांबपल्ल्याचा असावा हे ही प्रकर्षानं जाणवलं. राज्याची बांधणी करताना आपण पुढच्या शतकाचा तरी विचार करायला हवा. आपण जी काही पायाभरणी करु त्यामुळे महाराष्ट्र पुढची १०० वर्ष विकासाच्या, प्रगतीच्या वाटेवर चालत राहिला हवा. ज्या गोष्टी आपण येत्या दहा वर्षांत उभ्या करू त्यानं मराठी समाज पुढची अनेक दशकं नव्हे तर अनेक शतकं वैभवशाली वाटेनं चालत राहिला हवा.

केवळ या आणि एवढ्याच भावनेनं तुमच्यासमोर हा महाराष्ट्राच्या विकासाचा समग्र आराखडा मांडतो आहोत.

या विकास आराखड्यामुळे काय होईल? त्याचा महाराष्ट्राला काय उपयोग होईल?

खूप गोष्टी होऊ शकतील...

सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना, सर्व मराठी समाजाला एक स्वप्न पाहता येईल.

हा आराखडा हा काही एका व्यक्तीचा, एका पक्षाचा नाही. तो आम्ही बनवला असला तरी तो पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे. माणसाचा इतिहास असं सांगतो की अशाच समाजांचा विकास झाला आहे ज्या समाजांना सर्वांचं मिळून एक आणि एकत्र पाहिलेलं स्वप्नं होतं. लिंकन किंवा रूझवेल्टच्या काळातली अमेरिका घ्या, चर्चिलच्या काळातलं इंग्लंड घ्या, माओच्या वेळचा चीन घ्या, महाराजांच्या काळातला महाराष्ट्र घ्या किंवा स्वातंत्र्याच्या काळातला भारत देश किंवा अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळचा महाराष्ट्र घ्या. या सर्व समाजांना त्या त्या वेळी एका स्वप्नानं पछाडलं होतं. वेडं केलं होतं. सर्व समाज एक होऊन एक महान स्वप्न पाहत होता. आज आपणही महाराष्ट्रात असं स्वप्न पाहण्याची गरज आहे.

आपण भविष्यात बघायला शिकू

म्हणतात की ज्याला इतिहासाचं भान आहे त्यालाच भविष्य आहे आणि जो भविष्यात पाहतो त्याचंच भविष्य घडतं सुद्धा. आपण भविष्यात पहायला शिकलं पाहिजे. भविष्यवेध घेतला पाहिजे. भविष्याचा विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आपला मराठी समाज, आपला महाराष्ट्र कसा असला पाहिजे? येत्या काही वर्षांत या समाजापुढे काय आव्हानं असणार आहेत? त्यावर आपण कशी मात केली पाहिजे यावर आपल्यातल्या एक-दोघांनी नव्हे, एखाद्या पक्षानं नव्हे तर सगळ्याच समाजानं विचार करायला पाहिजे. हा आराखडा या सर्वांची उत्तरं देईल असं आम्ही मुळीच म्हणणार नाही पण निदान त्यामुळे आपल्या समाजाचा भविष्यवेध घ्यायची सुरुवात तरी आपल्यामध्ये नक्कीच होईल.

"रोजच्या प्रश्नाच्या पलीकडे" जायला लावेल

आपण सगळेच रोजच्या प्रश्नांत गुंतलेले असतो, आहोत. तुमच्या वॉर्डातला कचरा कुंडीचा प्रश्न असेल किंवा तुमच्या मुलीच्या शाळेच्या प्रवेशाचा प्रश्न असेल किंवा तुमच्या गावात, शेतात पाणी नाही असा तुमचा प्रश्न असेल. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा प्रत्येक प्रश्न जरी इथे सुटेलच असा दावा आम्ही करणार नसलो तरी या आराखड्यातून "तुमचा प्रश्न कसा सुटेल?" याची दिशा तरी अगदी नक्कीच तुम्हाला दिसेल. ह्या आराखड्यात आम्ही "मोठे", "व्यापक संदर्भ असलेले" प्रश्न घेतले असले तरी त्याचा संबंध रोजच्या प्रश्नांशी, रोजच्या समस्यांशी आहे. आपल्या रोजच्या जगण्याशी आहे. मात्र आपल्याला त्या रोजच्या प्रश्नांच्या जंजाळातून सुटून प्रगतीच्या वाटेनं गतीनं सुसाट निघायचं असेल तर तसं करण्याची संधी या आराखड्यामुळे मिळेल.

आपलं मूल्यमापन, आत्मपरीक्षण होईल

आज आपण कुठे आहोत हे यामुळे समजेल. जगात अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आपला पुढचा समाज कसा असावा यावर सखोल विचार चालू आहे. काही समाजांनी, देशांनी यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. ज्या क्षेत्रात त्यांना प्रगती करण्याची इच्छा आहे त्या क्षेत्रात फार अभिनव पद्धतीनं मार्ग काढत आहेत. त्या संदर्भात, जगाच्या तुलनेनं आप ण कुठे आहोत हे ही आपल्या या आराखड्यामुळे लक्षात येईल. काही प्रश्नांवर जगानं मार्ग काढला पण आपण तसेच मागं राहिलो असं होऊ नये. या विकास आराखड्यामुळे जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत आणि काय करायला हवं याची स्पष्टता येईल.

समाज चिरंतन टिकावा, संपन्न रहावा याचा विचार होईल

एक छान म्हण आहे. म्हटलंय: "तुम्हाला आत्ता भूक लागली असेल तर समोरच्या झाडावरचं फळ तोडून खा. तुम्हाला पाच वर्षं, सात वर्षं असा विचार करायचा असेल तर झाड लावा, पुढच्या २०, ३० वर्षांचा विचार करायचा असेल तर माणूस पेरा आणि पुढच्या १००-१५० वर्षांचा विचार करायचा तर समाजात विचार पेरा". आपल्याला चिरंतन विचार करायचा आहे. मराठी समाज प्रगतीच्या वाटेनं कायमच चालत रहावा अशी आमची तळमळ आहे, पण त्यासाठी महाराष्ट्रात विचार पेरला पाहिजे. तो विचार पेरण्याचं काम हा आराखडा करेल असं आमचं म्हणणं नाही, पण निदान त्याची सुरुवात तरी करेल किंवा तसा काही विचार चालू असेल तर त्यात हा आराखडा आपलं योगदान देईल.

सर्वांगीण, मूलगामी विचार करता येईल

खूपदा आपण पठडीबद्ध विचार करतो. झापड लावून पहात असतो. या आराखड्यामुळे आपल्याला सर्व बाजूनं विचार करता येईल. पर्यावरण आहे, हवामानातील बदल आहेत या गोष्टींपासून ते अगदी शेती, शिक्षण,वाहतुक अशा समाजातल्या सगळ्या अंगांचा आपला अभ्यास या निमित्तानं होईल. खूपदा प्रगतीच्या वाटेनं चालत असताना काही गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. काही भाग मागे पडण्याची शक्यता असते. आपल्याला महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील समाजाच्या विकासाचा चारी बाजूनं विचार यामुळे करता येईल. आम्ही काही मांडलं असलं आणि आमच्याकडून काही राहिलं असलं तरी तुमच्या सूचना घेऊन आपल्या सर्वांना पुढे जाता येईल.

काही जगावेगळा विचार करण्याची संधी मिळेल

असं म्हणतात की जगाचे प्रश्न इतके जटील झालेत, इतके गुंतागुंतीचे झालेत की ते सोडवण्यासाठी काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. ज्याला इंग्रजी मध्ये "out of the box" कल्पना म्हणतात तसा विचार केला तरच मार्ग निघेल. तसं काहीसं करण्याचा प्रयत्न आम्ही इथे केला आहे, पण त्यामुळे मराठी समाजात काही आगळा-वेगळा पण समाजाला अत्यंत लाभदायक विचार ह्यामुळे होऊ शकला तर ते ह्या आराखड्याचं यश म्हणावं लागेल.

समाजातील सर्वांचा साकल्यानं, पूर्णपणे विचार करता येईल

आपल्याला समाजातल्या प्रत्येकाचा विचार करायला हवा. अगदी शेवटच्या माणसापर्यंत, त्याच्या झोपडीपर्यंत पोहचायला हवं. छोट्या छोट्या योजनांमध्ये हे शक्य होत नाही. छोटा छोटा विचार केला तर तो आवाका मिळत नाही. इथे मात्र अधिक विस्तारपूर्वक विचार केला असल्यानं समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करता येईल. कुणीही सुटणार नाही, मागे राहणार नाही.

महाराष्ट्राला आपला प्राधान्यक्रम ठरवता येईल

आणि, सर्वांत महत्वाचं म्हणजे आधी काय, महत्वाचं काय, काय वाचवलं पाहिजे, काय सोडून देऊन चालेल, कशावर भर द्यायला पाहिजे अशा संवेदनशील, कधीकधी कटू वाटतील अशा गोष्टींना या निमित्तानं हात घालता येईल. आपला महाराष्ट्र इतिहासानं, परंपरेनं खूप श्रीमंत असला, आपल्याकडे चांगली निसर्गसंपत्ती असली आणि थोरा-मोठ्यांचा वारसा आपल्याला असला तरी आपण काही पैशानं, संसाधनानं फार श्रीमंत, संपन्न नाही. त्यामुळे कमी पैशात, मर्यादित साधनांमध्ये आपल्याला प्रगती कशी साधता येईल याचा विचार करायचा तर आपल्याला आपला प्राधान्यक्रम या निमित्तानं ठरवता येईल.

हा विकास आराखडा तयार करताना आम्ही पाच प्रश्न डोळ्यापुढे ठेवले होते

आपण जे सुचवतोय ते "चांगलं" आहे का?

सुंदर आहे? आपल्या संस्कृतीला भावेल असं आहे? त्यात हिंसा, कुणाचं नुकसान असं तर नाही ना?

ते "न्याय्य" आहे का?

काही सुचवताना, काही विकास साधताना आपण एकाचा घास काढून तो दुसरीकडे देत नाही ना?

जे करतो आहे तेच करणं "योग्य" आहे का?

आवश्यक आहे? ते करण्याची हीच वेळ बरोबर आहे का? आपल्याला ते करणं लागू आहे का?

"बरोबर" आहे का?

खरं आहे का? कुठे याचा विचार, प्रयोग झाला आहे का? ते तपासलं आहे ना?

हे केल्यामुळे माझा मराठी समाज अधिक "चांगला", "अधिक पुढचा", "अधिक वरच्या दर्जाचा" होणार आहे ना?

शेवटी समाज शहाणा होणं, मोठा होणं, उन्नत होणं, संपन्न होणं महत्वाचं, ते आपण करू इच्छितोय ते यानं होणार ना?

अर्थातच, या पाच प्रश्नांची उत्तरे जिथे "होय" असं असेल त्याच गोष्टी आम्ही या आराखड्यात समाविष्ट केल्या आहेत.

आजचा महाराष्ट्र


कसा आहे? लक्षणं काय? वैशिष्ट्य काय? धोके काय? संधी काय?

समाजप्रबोधनाचा, समाजसुधारणेचा फार मोठा वारसा

महाराष्ट्राचं वैशिष्ट्य जर एका वाक्यात सांगायचं असेल तर असं म्हणता येईल की हा समाज असा आहे की कदाचित संपूर्ण जगात इतक्या ताकदीची सामाजिक सुधारणेची परंपरा इतकी वर्षं इथे टिकली तितकी दुसरीकडे कुठे झाली नसेल. लोकहितवादी-महात्मा फुले यांच्यापासून ते यशवंतराव चव्हाण-बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत सुमारे १५० वर्षांची इतकी प्रदीर्घ परंपरा जगात नाही. महाराष्ट्राचं हे फार, फार मोठं वैशिष्ट्य. जे जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

उज्ज्वल इतिहास, परंपरा

परकी सत्तेला आव्हान देणारा, स्वराज्याचा उच्चार सर्वप्रथम करणारा, देशभर आपल्या शौर्याचा डंका पिटवणारा, संतपरंपरेसारखी मोठी शिकवण असणारा, स्वाभिमान हा अभिमानानं रक्तात भिनवणारा हा समाज आहे. ज्या समाजाच्या रक्तातच शौर्य आहे, धाडस आहे, नवी नवी क्षेत्रं पादाक्रांत करण्याची आस आहे.

देशात सर्वात मोठं उद्योग क्षेत्रं

देशात उद्योगाचं वारं सर्वात आधी आलं आणि रुजलं महाराष्ट्रात. त्याला कारण होतं इथला शिक्षित समाज, कुशल कामगार आणि त्याची पुरोगामी वृत्ती. अजूनही विविध उद्योग संधी पाहतात ती महाराष्ट्रातच. महाराष्ट्रातील कारखाने हे आकार, प्रमाण, उत्पादन या तीनही बाबतीत देशात अग्रेसर आहे. देशातील सर्वांत जास्त परदेशी भांडवल गुंतवणूक (२०%) ही एकट्या महाराष्ट्र राज्यात होते.

आंतरराष्ट्रीय व्यापार-मार्ग (trade route) वरील मुंबईचे स्थान

मुंबई ही महाराष्ट्राचं भूषण आहे, जगाकडे जाणारं महाराष्ट्राचं दार आहे. युरोप, दुबई कडून पूर्व आशिया च्या मार्गावर मुंबई येते. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या तिचं स्थान फार महत्वाचं आहे. या शहरात अगोदरच संसाधनं आहेत, उद्योग-व्यापाराची या शहराला एक परंपरा आहे आणि म्हणून जगाच्या आर्थिक नकाशावर मुंबई फार मोठी भूमिका बजावू शकते, ज्याचा महाराष्ट्राला उपयोग करून घेता येईल.

सर्वात जास्त शहरीकरण

महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे शहरीकरणात देशात पुढे, पण या शहरीकरणाला शिस्त नाही, दिशा नाही, सौंदर्यदृष्टी (aesthetics) नाही. त्यामुळे हे शहरीकरण, जे पूर्वी फायद्याचं होतं, ते आता धोक्याचं बनत चाललं आहे. त्याकडे अत्यंत तातडीनं बघायला लागेल, हस्तक्षेप करावा लागेल.

लोकसंख्येत दुसरा नंबर, क्षेत्रफळात तीन नंबर

राज्य मोठं आहे. राज्याचं अर्थकारण मोठं आहे, जगात ५०-५२ क्रमांकाची राज्याची आर्थिक उलाढाल आहे. संसाधनं प्रचंड आहेत असं नाही पण कमी नाहीत. लोकसंख्या ही गोष्ट नीट धोरण आखलं तर ती जमेची बाजू होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. तशी धोरणं मात्र आखायला हवी आहेत. त्यासाठी वेगळा विचार करायला हवा आहे.

लोकसंख्येचं स्वरूप: तरूण लोक

महाराष्ट्रातले ५०% लोक, ० ते २९ वयोगटातले आणि २८% लोक १५ ते २९ वयोगटातले - ही एक संधी आहे. हे सर्वजण नव्या महाराष्ट्राकडे नव्या आकांक्षेनं पहात आहेत. अशा लोकांना स्वप्नं पडतात, ईर्षा निर्माण होते. त्यांना राज्यातील जेष्ठांच्या अनुभवाची जोड मिळाली की राज्य एका वरच्या पातळीवरचा विकास साधू शकेल.

७२० किलोमीटर्सची किनार पट्टी

मच्छिमार व्यवसाय, पर्यटन, सागरी उद्योग व्यवसाय यांची मालिका महाराष्ट्रात सुरू होऊ शकते. तशी "किनारपट्टी संस्कृती" फार पद्धतशीरपणे विकसित करावी लागेल. ही महाराष्ट्राची एक फार मोठी जमेची बाजू आहे.

सुमारे १५% जंगल क्षेत्रं

जसा किनारा तशीच परिस्थिती जंगलाची. महाराष्ट्रातलं जंगल हे विविधतेनं श्रीमंत आहे. तिथल्या आदिवासी समाजाबरोबर बोलून, व्यापक चर्चा करून त्यावर आधारित प्रगतीच्या वाटा खुल्या करण्याची संधी आपल्याला आहे.

कृषि उत्पन्न कमी होत चाललेलं

गेली दोन-तीन दशकं शेतीतून मिळणारं उत्पन्न कमी होत चाललं आहे. ही चिंतेची बाब आहे. लोकसंख्या वाढते आहे, वाढणार आहे मग त्या लोकसंख्येला पुरेल असं अन्नधान्यही आपण मिळवलं पाहिजे, त्याबाबतीत आपण स्वयंपूर्ण व्हायला हवं आहे नाहीतर संकट निर्माण होईल. तसंच शेती सबसिडी च्या ओझ्याखाली आणि चुकीच्या धोरणामुळे पांगळी करून ठेवली आहे तिथंही लक्ष द्यायला लागणार आहे.

खूप मोठ्या प्रमाणावर इतर राज्यातून स्थलांतर

राज्यात इतर राज्यातून अनन्यसाधारण स्थलांतर होत आहे . महाराष्ट्रात उद्योगाची, कामाची संधी आहे आणि देशात कुणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतं असं असलं तरी त्यानं महाराष्ट्रावरील संसाधनांवर परिणाम होतो आहे. पुढच्या नियोजनात या गोष्टीचा विचार बारकाईनं व्हायला हवा.

शिक्षणाचं प्रमाण चांगलं पण नोकरी योग्य शिक्षणाची वानवा

देशाच्या तुलनेत महाराष्ट्र शिक्षणात कमी नाही, पण स्वत:च्या पायावर उभं राहील, स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा नागरिक त्यातून तयार होईल असं शिक्षण नाही. ही फार गंभीर बाब आहे. शिक्षण म्हणजे चांगला आत्मविश्वासी माणूस बनवण्याचं शिक्षण असं त्याचं सध्याचं स्वरूप नाही. यात काहीतरी क्रांतीकारक बदल केला नाही तर भविष्यातील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.

ग्लोबल युगातलं मराठी, जागतिक वातावरणात, जागतिक स्पर्धेत मराठी

जसजसं जग जवळ येत चाललं तसतशी जगातली विविधता कमी होत चालली. स्थानिक भाषा, स्थानिक संस्कृतीवर जागतिक दडपण येऊ लागलं. इतिहास असं सांगतो की ज्या समाजानं आपला स्वाभिमान, अस्मिता जपली त्याच समाजांचा उत्कर्ष झाला. हा स्वाभिमान जपणं म्हणजे आपली भाषा जपणं. हे करायचं तर हीच १०-१५ वर्ष आहेत. आत्ता लक्ष दिलं नाही तर महाराष्ट्राच्या सीमा राहतील, नकाशा असेल, सह्याद्री असेल पण महाराष्ट्र नसेल. जागतिकीकरणाच्या रेट्यात, सांस्कृतिक संघर्षात आपण दक्ष राहिलो नाही तर महाराष्ट्राची ओळख पुसट होईल.

जाती आणि राजकारण ह्यानी समाज फाटलेला

महाराष्ट्र जसा नव्हता तसा झाला. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहूमहाराज, प्रबोधनकार ठाकरे आणि अनेकानेक समाजसुधारकांनी घडवलेला महाराष्ट्र जाती-जातींच्या भांडणात तुटला-फाटला आहे. त्याला राजकारण कारणीभूत आहे. महाराष्ट्राला अग्रेसर राहून पुढे जायचं तर ही उसवण शिवली पाहिजे. समाजाची वीण घट्ट केली पाहिजे.

दारूनं अनेक घरं उद्धवस्त

दारूनं हसते-खेळते आनंदी असे लाखो संसार महाराष्ट्रात दरवर्षी उद्धवस्त होतात तेंव्हा प्रश्न गंभीर आहे हे लक्षात येतं. दारूचे व्यसन हा रोग आहे असं जगात मानलं जातं. आपणही तसंच पाहिलं पाहिजे आणि हे प्रमाण थांबवून, कमी करून संपवलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या लाखो आया-बहिणींची चिंता जर 'दारू' असेल, त्यांना होत असलेल्या मारहाणीचं कारण 'दारू' असेल, त्यानं भरल्या घराला काडी लावली जात असेल तर, त्यामुळे उद्धवस्त होणारे संसार वाचवणं हे महाराष्ट्राचं ब्रीदवाक्य असायला हवं.

गुन्हेगारी वाढते आहे

समाज बदलला तशी गुन्हेगारी बदलली. झपाट्यानं बदलली. त्याचं स्वरूप बदललं. पण त्याचे कायदे, त्यासाठी लागणारी प्रशासन यंत्रणा तशीच राहिली. गुन्हेगारीच्या प्रमाणाला जोपर्यंत चाप लागत नाही तोपर्यंत माणसाला सुरक्षित वाटणार नाही. मात्र आपल्याला जुन्या मार्गानं, जुन्या कायद्यानं नवीन प्रश्न सोडवता येणार नाहीत. आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, कायद्याची नवी चौकट बसवावी लागेल. लोकांचा सहभाग घ्यावा लागेल, नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं लागेल आणि कायदा-सुव्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील.

ऊर्जा संकट

असं म्हणतात "उर्जा" समाजाची प्रगती घडवते. अगदी सुरवातीच्या आगीपासून, वाफेच्या इंजिनापासून ते अणुउर्जेपर्यंत पहा, ज्याच्या कडे प्रगत आणि पुरेशी उर्जा त्याची उडी स्पर्धेत बाकीच्यांच्या पुढे. महाराष्ट्राला आज चटके बसताहेत पण ही मोठ्या संकटाची फक्त छोटी चाहूल आहे. इथे काही मोठा विचार महाराष्ट्राला करावा लागेल. नाहीतर पुढचा प्रवास खडतर आहे.

दुष्काळ

साधारण निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या पट्ट्यात आणि महाराष्ट्राच्या पोटातलं पाणी कमी होत चाललेलं आणि त्यातच वाढती लोकसंख्या, स्थलांतर आणि पाण्याची वाढती- मागणी ही परिस्थिती महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या प्रगतीला अडसर ठरू शकेल. महाराष्ट्रानं फार गंभीरपणे याचा विचार केला पाहिजे.

पाणी टंचाई

महाराष्ट्रात पाणी वाटपात घोळ आहेत. प्राधान्य कशाला द्यायचं हे ठरलेलं असूनही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातंय. पिण्याचं पाणी कमी पडतंय, शेतीचं पाणी उद्योगाला वळवण्याची उदाहरणं आहेत. दूरदृष्टीनं याकडे पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रानं याकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सहमतीनं काही आचारसंहिता आखून घ्यायला पाहिजे. तरच प्रश्न सुटेल.

समृद्ध चित्रपट क्षेत्रं – बॉलीवुड

मुंबईत असलेलं चित्रपट निर्मिती क्षेत्रं ही एक महाराष्ट्रापुढची संधी आहे. त्याच्या अनुषंगानं अनेक उद्योग विकसित होऊ शकतात, वाढू शकतात. त्याला वळण द्यायला हवं. महाराष्ट्रानं त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

भाषा मराठी: जगातली १५ वी भाषा

महाराष्ट्राची भाषा मराठी, इथला माणूस मराठी. ही भाषा जगात किती लोक बोलतात असं पाहिलं तर मराठीचा क्रमांक १५ वा लागतो. ही गोष्ट छोटी नाही. अर्थकारणात आणि बाजारात संख्येला फार महत्व असतं. जगातल्या मोठ़या आर्थिक सत्ता असलेल्या अनेक देशांच्या भाषांपेक्षा मराठी जास्त लोक बोलतात. पण पुढे काय? आपण त्याचा काय उपयोग करून घेतो? आपण मराठीला कसं पुढे आणतो? काय नियोजन आहे महाराष्ट्राचं?

एकेकाळी समृद्ध सहकार चळवळ

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात जिथे जिथे प्रगतीचे धुमारे फुटले त्यात महाराष्ट्राचं सहकार क्षेत्रं अग्रेसर होतं. राज्याच्या सहकार चळवळीस १०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या काही भागात सहकारानं कायापालट केला. नवी दृष्टी दिली, पैसा आणला पण नंतर राजकारणानं त्याला वाळवी लागली. सहकारातून सर्वांचं हित बाजूला जाऊन स्वार्थ शिरला पण महाराष्ट्राच्या मातीत सहकार रुजला आणि वाढला यात शंका नाही. आज महाराष्ट्रात सहकारी संस्थांची संख्या २.२४ लाख आणि या सहकारी संस्थांची सभासद संख्या ५.५० कोटी (जवळपास ५०% महाराष्ट्र) आहे. हे महाराष्ट्राचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे.

एकेकाळचं बलवान सामाजिक कार्याचं, चळवळींचं क्षेत्रं

महात्मा गांधी महाराष्ट्राला "सामाजिक कार्यकर्त्यांचं मोहोळ" म्हणायचे. सामाजिक क्षेत्रातले कित्येक मोठे प्रयोग, कामं महाराष्ट्रात झाली. सामाजिक भान महाराष्ट्राच्या रक्तात आहे, डीएनए मध्ये आहे. हे पहायला पाहिजे की महाराष्ट्राच्या पुढच्या उभारणीला याचा उपयोग करून घेता येईल का? य़ाआ प्रवृत्तीला विधायक पद्धतीनं राज्याच्या विकासात कसं सहभागी करून घेता येईल?

नाट्य, साहित्य याची उत्तम परंपरा

कला, संस्कृती, साहित्य याची परंपरा महाराष्ट्रात फार जुनी आहे. संतांच्या अभंगापासून जात्यावर दळण दळत ओव्या सांगत स्वत:ला व्यक्त होत असलेल्या बहिणाबाईंपर्यंत. ही परंपरा समाजाला दिशा द्यायची. प्रश्न विचारायची. समाजाला आधार द्यायची. समाजाला शहाणं करायची. आज ते कुठेतरी थांबलं आहे. समाजातला जागरूक आवाज, जागरूक मन आज शांत आहे. त्या आवाजाला वाव मिळाला पाहिजे.

अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था

महाराष्ट्रात मूलभूत संशोधन करतात अशा संस्था खूप आहेत. ते आधुनिक महाराष्ट्राचं वैभव आहेत, मात्र दुर्दैवानं त्यांचा महाराष्ट्राबरोबरचा सांधा निखळलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आज ते नाहीत. त्यांचं संशोधन चालू आहेत, प्रयोग होत आहेत पण महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांचं योगदान मिळताना दिसत नाही. दोष त्यांचा नाही. दोष आपला आहे, जबाबदारी आपली आहे, त्यांच्या शहाणपणाचा महाराष्ट्र उभारणीला उपयोग करून घेण्याची.

सह्याद्री – उत्तम जैव-वैविध्य

सह्याद्री हा महाराष्ट्राचा ठेवा आहे, जसा सातपुडा आहे, जशा नद्या आहेत. मात्र या सह्याद्रीचं वैशिष्ट्य हे की यात प्रचंड जैव-विविधता आहे जी जगात फार थोड्या ठिकाणी राहिली आहे. इथल्या वनस्पती, फुलं, झाड-झाडोरा वेगळा आहे. जगात कुठेही नाही असा आहे. तो ठेवा आपण जपणार की नाही ? की ओरबाडणार ? की संपवणार? लुटणार? त्याकडे दुर्लक्ष करणार?

खाल पर्यंत पोचलेली पंचायतराज व्यवस्था

देशात ज्या राज्यांनी अत्यंत समर्थपणे पंचायतराज व्यवस्था अंगिकारली, वाढवली आणि राज्याचं राजकारण त्यातून नांगरून घेतलं, समाजमन घडवलं आणि कार्यक्षम प्रशासन व्यवस्था बसवली त्यात महाराष्ट्र जवळजवळ अग्रेसर आहे. महाराष्ट्राचे अनेक नेते त्यातून घडले. नंतर मात्र बिघडलं, पण मूळ साचा घट्ट आहे. पंचायत व्यवस्था आपल्यात भिनली आहे. आपण भविष्यात याचा उपयोग करू शकतो का?

शिक्षित महिला वर्ग

काही समाजाची काही वैशिष्ट्यं असतात. त्यातलं एक म्हणजे शिकलेला, शहाणा आणि नेतृत्व देणारा महिला वर्ग. समाजाच्या वेगवेगळ्या भागांत, कार्यक्रमांत भाग घेणं आणि तिथे नेतृत्व देणं याची परंपरा महाराष्ट्रात राजमाता जिजामातांपासून मुक्ताबाईंपासून सुरु होते, जी आजवर चालू आहे. येत्या काळात या गुणाचा फायदा महाराष्ट्राला खूप होऊ शकतो.

बहुपेडी, बहुआयामी-समाज आणि तसे समाजमन

महाराष्ट्राचा माणूस मोकळा आहे. खुला आहे. दिलदार आहे. नवं स्वीकारायच्या मानसिकतेचा आहे. चट्कन "ग्लोबल" होणारा आहे. त्याला जगाला कवेत घेण्याची सवय आहे, भिती नाही. तो नव्या गोष्टी स्वीकारायला मागे-पुढे पाहत नाही. नव्या युगाच्या नव्या रचनेला सामोरं जाताना याचा, या वृत्तीचा, उपयोग होणार आहे.

महाराष्ट्राची ही स्वभाव वैशिष्ट्यं. काही आव्हानं आणि काही संधी.

परिस्थिती गंभीर असली, सगळीकडे अंधार दिसत असला तरी महाराष्ट्रानं असा काळ पूर्वी पाहिलेला आहे. महाराष्ट्र फार मोठा आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीतच संघर्ष आहे.

संकटांवर मात करण्याची त्याच्यात अंतर्गत ताकद आहे.

याच ताकदीतून हा विकास आराखडा साकारला आहे आणि आज तो तुमच्यासमोर मांडातो आहोत.

"विकास" म्हणजे काय?


आपला हा "महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा" आहे, त्यामुळे आपण आधी " विकास " म्हणजे काय हे पहायला हवं. "विकास" हा शब्द कदाचित मराठीतील सर्वांत जास्त वापरून वापरून गुळगुळीत झालेला शब्द असावा. विकास हा शब्द 'कस' या शब्दापासून बनतो. 'कस' म्हणजे हलणे, जाणे. "विकास" म्हणजे पुढे जाणे. आत्ता आहोत त्यापेक्षा पुढे जाणे. आपलं जीवनमान सर्व बाजूनं सुधारणे. आनंद वाढवणे.

जगभर यावर गेली काही वर्षं खूप विचार झाला. आपण नुसताच "विकास" करणं उपयोगी नाही तर तो सतत चालणारा असला पाहिजे. म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे म्हणून ती कापून खायची नसते तसंच विकासाचं आहे. विकास असा करायचा नसतो की तो क्षणभंगुर ठरेल. विकास असा करायचा नसतो की तो आज होईल पण उद्या होणार नाही. म्हणून जगात हे मान्य झालं की " विकास " म्हणजे "टिकाऊ विकास". "टिकणारा, सतत चालू रहाणारा विकास". "चिरंतन विकास"

विकास अणि पर्यावरण याविषयावर काम करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे युनायटेड नेशन्स वर्ल्ड कमिशन ऑन एनव्हायर्नमेंट अॅन्ड डेव्हलपमेंट (United Nations World Commission on Environment and Development) या नावाची. या संस्थेने १९८७ मध्ये "टिकाऊ विकासाची" एक सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात: "जेंव्हा आजची पिढी त्यांच्या आजच्या गरजा भागवताना उद्याच्या पिढीच्या विकास करण्याच्या क्षमतेत बाधा आणत नाही तेंव्हा तो टिकाऊ विकास म्हणायचा ".

"विकास" म्हणजे "टिकाऊ विकास", "चिरंतन विकास" आणि तो करताना काहीही ओरबाडणार नाही, उद्याच्या पिढ्यांना त्रास होणार नाही तो विकास असं आम्हीही मानतो. त्यासाठी आम्ही १० प्रश्न समोर ठेवले आहेत. ज्यांची उत्तरे दिल्यावर विकास झाला की नाही हे ठरेल. ते प्रश्न असे:

 • लोक सुरक्षित आहेत ना?
 • महाराष्ट्रातल्या माणसा-माणसांमध्ये आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक गोष्टींमध्ये भीषण अशी तफावत तर नाही ना?
 • लोकांना पुरेसं खायला आणि पुरेसं प्यायला शुद्ध पाणी मिळतंय ना?
 • लोकांना परवडणारी घरं - त्यात शांतता, खाजगी जागा, नळानं पाणी, शौचालय अशा सुविधा - मिळताहेत ना?
 • त्यांना पुरेशा, समाधानकारक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत ना?
 • ते त्यांच्या मुलांना त्यांना परवडेल अशा पद्धतीनं दर्जेदार आणि नव्या युगाच्या दृष्टीनं योग्य असं शिक्षण देऊ शकताहेत ना?
 • त्यांना त्यांच्या जवळ आणि त्यांना परवडेल अशी आरोग्य सेवा मिळतीय ना?
 • त्यांना शुद्ध हवा, त्यांच्या हक्काची नैसर्गिक साधनसंपत्ती, सोयी-सुविधा आणि मनोरंजनाची साधनं मिळताहेत का?
 • लोकांमध्ये अस्मिता जागृत आहे का?
 • ते भविष्याकडे आशेनी, अपेक्षेनी, महत्वाकांक्षेनी पहाताहेत ना?

अगदी थोडक्यात -

विकास म्हणजे लोकांचा विकास.

विकास म्हणजे लोकांची सुरक्षितता, लोकांचा आनंद.

विकास म्हणजे सर्वांना पुढे जाण्याची संधी.

महाराष्ट्राकडे जे आहे ते वाचवणं, टिकवणं, जोपासणं आणि वाढवणं म्हणजे 'विकास'. मग त्यात निसर्ग आला, संपत्ती आली, नद्या आल्या, माणसं आली, माणसांची क्षमता आली, मराठी संस्कृती आली.

महाराष्ट्राचा विकास म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचा विकास

महाराष्ट्राचा विकास आराखडा बनवताना आपण हे पक्क लक्षात ठेवलं आहे.

जगातील बदलते वारे 


जगात सध्या काही महत्वाचे बदल घडत आहेत आणि जग आता इतकं एकमेकाला जोडलं गेलंय की जगात जे घडतंय त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणारच आहे.

जगाची लोकसंख्या

इसवी सन २००० मध्ये जगाची लोकसंख्या होती ६१० कोटी आणि फक्त ५० वर्षांत ती होणार आहे ८९० कोटी. म्हणजे फक्त ५० वर्षांत ती ४७%नी वाढणार आहे! त्याच काळात २००० साली भारताची लोकसंख्या होती १०१ कोटी, जी २०५० ला होणार आहे १५३ कोटी, म्हणजे ती साधारण ५०%नी वाढणार आहे. त्याच वर्षी भारत जगातील सर्वांत जास्त लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जाईल. अजून ५० वर्षांनी हळूहळू जगाची लोकसंख्या स्थिर होत जाईल पण जगापुढे इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या लोकांना पुरेसं खायला देणं आणि प्यायला पाणी देणं या दोन गोष्टी महत्वाची ठरतील. येत्या ५०-१०० वर्षांचं महाराष्ट्राचं अत्यंत चांगलं असं नियोजन आपल्याला करायचं असेल तर आपल्याला या गोष्टींचा बारकाईनं विचार करायला हवा. महाराष्ट्राची लोकसंख्या किती असेल, कशी असेल, त्यात परप्रांतातून होणारे स्थलांतर किती असेल; तसेच त्या लोकसंख्येला पुरेल असं पाणी, अन्नधान्य आणि इतर साधन संपत्ती आपल्याकडे असणार आहे ना याचं भान आपण ठेवायला हवं. फक्त जगण्यासाठीच नव्हे, तर चांगलं जगण्यासाठी! त्याचा नेमका हिशेब आपल्याकडे हवा.

हवामानातील बदल

जगापुढचे आणखी एक आव्हान आहे आणि ते म्हणजे हवामानातील, वातावरणातील बदल. पृथ्वी गरम होते आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण धृवावरील बर्फ वितळत चाललं आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आहे. जगभर दुष्काळ किंवा काही ठिकाणी पूर येताहेत. ऋतुचक्र निश्चितपणे बदलत आहे ज्याचा परिणाम पर्यावरणावर, जंगलांवर, हवेवर, झाडाझुडपांवर, माणसाच्या तब्येतीवर होताना दिसतो आहे. या सर्वाचा परिणाम महाराष्ट्रावर काय होईल, कुठल्या नैसर्गिक संकटांचा विचार करून ठेवून महाराष्ट्रानं त्यासाठी तयार रहायला हवं? या गोष्टी येत्या काही दशकात फार महत्वाच्या आहेत. महाराष्ट्राचं पुढचं नियोजन करताना या गोष्टींचा विचार आपल्याला करायला हवा. मुख्यत: या संदर्भात महाराष्ट्रात वारंवार पडणारा दुष्काळ आणि त्याचा महाराष्ट्राच्या जनजीवनावर होणारा परिणाम याचा नेमका अंदाज आपल्याला घ्यायला हवा.

तंत्रज्ञानाची झेप

जगभरच्या विविध शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचा जो अभ्यास चालू आहे त्यामुळे फार वेगानं समाज बदलणार आहे. नॅनोटेक्नोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय शास्त्र यांतील शोधांमुळे पुढचा समाज नेमका कसा असेल याचा अंदाज बांधता येणं कठीण आहे. वय उलटं फिरवता येईल, माणूस जास्त वर्षं जगेल, कृत्रिम अवयवांचा जमाना येईल, त्यामुळे अवयव बदलता येतील. कमीत कमी संसाधनांमध्ये जास्त उत्पन्न काढता येईल. त्यानं अर्थकारण बदलेल. ऊर्जेची नवी साधनं सापडतील, स्वत:ला लागणारी ऊर्जा स्वत: निर्माण करणारी उपकरणं, घरं, तयार होतील, त्यामुळे एका ठिकाणी वीज निर्माण करायची आणि ती दुसरीकडे पाठवायची ही गोष्ट थांबेल. या आणि अशा गोष्टींनी समाज येत्या १००-५० वर्षांत खूपच बदलणार आहे. आपण त्याचा अंदाज बांधला आहे का? हे पहायला हवं, तसा प्रयत्न करायला हवा.

माणसाचं शहाणपण ही सर्वात अनमोल गोष्ट

जगातील समाज हा ज्ञानी समाज (Knowledge Society) होऊ लागला आहे. अर्थकारणाच्या स्पर्धेत ज्याच्याकडे ज्ञान, कसब, कौशल्य, माहिती अधिक तो अधिक मौल्यवान असं होत जाणार आहे. ज्या समाजात ज्ञान, शहाणपण जास्त तो समाज पुढारलेला असं असणार आहे. फार पूर्वी जमिनीला जे महत्व होतं, नंतर व्यापाराला आणि त्यानंतर जे महत्व भांडवलाला आलं तसं महत्व ज्ञानाला येईल. पीटर ड्रकरनं आपल्या सुप्रसिद्ध "Next Society" या लेखात याविषयी फार मार्मिक विवेचन केलं आहे . या बाबतीत महाराष्ट्राची परंपरा मोठी तर आहेच पण आपण यापुढेही खूप प्रगती करू शकतो आणि जगात मानाचं स्थान पटकावू शकतो अशी आजची स्थिती आहे. तसा "ज्ञानी", "शहाणा" समाज आपण बनावं अशी आकांक्षा आपण ठेवायला हवी.

जगाची दिशा शहरीकरणाकडे

जग शहरी होताना दिसतं आहे. अजून १०० वर्षानी शहरी, ग्रामीण, आदिवासी असा फरक निदान जगात तरी राहणार नाही. जग शहरी होणार. जगाची दिशा तीच आहे. मग असं असेल तर महाराष्ट्र तर यात अगोदरच अग्रेसर आहे. या परिस्थितीचा आपल्याला फायदा घेता येईल का हे ही पहायला हवं. महाराष्ट्रात या प्रक्रियेला सकारात्मक, रचनात्मक वळण देता येईल का हे बघणं आवश्यक आहे.

याखेरीज सर्वच क्षेत्रांत महिलांचा वाढता सहभाग, नव्या अर्थरचनेत "शासन" या संस्थेचं बदलतं स्वरूप, कुटुंब, शाळा यांसारख्या सामाजिक संस्थांची बदलणारी गरज, जगातला संस्कृती संघर्ष, ठिकठिकाणी उफाळणारा दहशतवाद, उपराष्ट्रवादांची चळवळ यासारख्या गोष्टींचाही परिणाम महाराष्ट्रावर, महाराष्ट्रातील लोकांवर होईल ज्याचा आपल्याला आवर्जून विचार करावा लागेल.

प्रत्येक व्यक्तीचं मत महत्वाचं

बदलत्या परिस्थितीत प्रत्येक माणसाला स्वत:चं मत आहे, असतं, आणि ते मत त्यांना व्यक्त करायचं असतं. इथून पुढे प्रत्येक व्यक्तीचं मत महत्वाचं ठरणार आहे, त्याची नोंद घ्यावी लागणार आहे. ही गोष्ट खरं म्हणजे लोकशाही बळकट करू शकेल. सर्वांचं मिळून जे शहाणपण असतं ते आपल्याला खूप पुढे नेईल. तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याची संधी सहज देता येऊ शकेल. आपण हे केलं, त्याला नीट वळण दिलं तर आपल्या समाजाची ती एक मोठी बाजू ठरेल.

ज्या गोष्टी भविष्यात होऊ घातल्या आहेत, त्यातल्या काहींचा इथे उल्लेख केला आहे. हा आराखडा लिहीताना होऊ घातलेल्या या व अशा अनेक बदलांचा आम्ही विचार केला आहे.

होय. हे शक्य आहे 


शेवटी थोडक्यात –

 • आनंदी समाज, आनंदी महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र. मूलभूत गरजा भागलेला, नव्या आकांक्षा मनात ठेवून पुढे जाणारा महाराष्ट्र.
 • ज्ञानी समाज, ज्ञानी महाराष्ट्र. दर्जेदार शिक्षण, व्यवसाय शिक्षण आणि तंत्रज्ञानानं युक्त असा नव्या युगातला महाराष्ट्र.
 • खुली अर्थव्यवस्था, मुक्त वातावरण. उद्योगाचं मुक्त वातावरण, शेती खुल्या अर्थव्यवस्थेला जोडलेली असा उद्योजक महाराष्ट्र.
 • स्वावलंबन – शासनाचे, लोकांचे. नवा आर्थिक विचार, नवी करप्रणाली, बळकट स्थानिक स्वराज्य संस्था.
 • गुणांवर, मुक्त स्पर्धेला उत्तेजन देणारी व्यवस्था. सर्वत्र दर्जा महत्वाचा, कामात, शिक्षणात, उद्योगात, प्रशासनात, गुणांना वाव देणारी व्यवस्था.
 • विकेंद्रित रचना – विकासाची, राज्यकारभाराची, प्रशासनाची. स्थानिकांच्या हाती अधिक कारभार आणि जबाबदारी, विकासाचा असमतोल कमी केलेला.
 • जागतिक नकाशावरचा बलवान महाराष्ट्र प्रागतिक दृष्टी ठेवून, जागतिक स्पर्धेत अव्वल ठरलेला, मराठी महाराष्ट्र.

या घडीला आज आपण हा नवा, उद्याचा, प्रगतीशील महाराष्ट्र उभा करण्याची आकांक्षा मनात ठेवायला हवी. त्यासाठी योगदान देण्याची तयारी हवी.

मला तुमची साथ हवी..

माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्र तुम्हाला साद घालतो आहे, त्या हाकेला ओ देण्यासाठी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी तयार रहा, तसंच त्यासाठी कष्ट करण्याची आणि तुमचं योगदान देण्याचीही तयारी ठेवा. लक्षात ठेवा काहीही फुकट मिळत नाही. कष्ट करून मिळवावं लागतं आणि आपल्याला माहीत आहे जे फुकट मिळतं ते टिकत नाही आणि आपल्याला तर टिकाऊ, अनेक वर्ष चालणारा विकास या महाराष्ट्रात करायचा आहे. तुम्हा सर्वांच्या सहकर्याची मी मनोमन अपेक्षा बाळगतो.

सस्नेह जय महाराष्ट्र!

आपला नम्र

राज ठाकरे


Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.