शिक्षणात मराठी

दि. १ मे १९६० रोजी मराठी भाषिकांचा महाराष्ट्र अस्तित्वात आला. हा लढा केवळ राज्यासाठीचा किंवा प्रदेशासाठीचा लढा नव्हता, तर तो मराठी भाषा, मराठी संस्कृती व महाराष्ट्र धर्मासाठीचा लढा होता. या लढ्याचा इतिहासच महाराष्ट्रीय जनतेला माहीत नसल्यामुळे मराठी भाषा, संस्कृती व प्रदेश यांचे मूल्यच जनतेला उमगलेले नाही. याचा एकूण विपरित परिणाम भाषेच्या व प्रदेशाच्या विकासावर होतो. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचा शालेय व महाविद्यालयीन पातळीवर मराठीतून शिकवला जाणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणाची भाषा मराठीच होणे आवश्यक आहे.

प्रश्नाचं स्वरूप


आज विद्यार्थ्यांचे शिक्षण प्राथमिक ते महाविद्यालयापर्यंत आपल्या मातृभाषेतून, म्हणजे मराठी भाषेतून व्हावे असा सन्मानाने विचार केला जात नाही. व्यक्तीची मातृभाषा आणि शिक्षण यांच्या परस्पर संबंधाचा मूलभूतपणे विचारच केला जात नाही. शालेय जीवनात काही टप्प्यांवर 'मराठी भाषा' हा फक्त एक विषय म्हणून शिकवला जातो. आज शहरांमध्ये 'मराठी भाषेतून शिक्षण' ही संकल्पनाच जवळपास हद्दपार झाली आहे. शालेय शिक्षणापासून कोणतेही व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी मराठी भाषा ही अपूर्ण, बिनकामाची आहे असा (गैर)समज विविध कारणांमुळे महाराष्ट्रात प्रबळ होत चालला आहे. मराठीतून शिक्षण तर नाहीच पण मराठीचेही शिक्षण नाही....अशी परिस्थिती आज मराठी लोकांच्याच महाराष्ट्रात आहे.

असं का होतं?


इंग्रजीच्या आकर्षणापोटी महाराष्ट्रात इंग्रजी शाळांचे प्रमाण वाढते आहे आणि मराठी शाळांचे प्रमाण घटते आहे. मुळात मराठी माध्यमाच्या शाळांना परवानगी नाकारण्याचे धोरण शासन गेल्या अनेक वर्षांपासून अवलंबवत आहे. त्याचाच परिणाम शिक्षणाच्या माध्यमावरही होतो. आजूबाजूच्या सार्वजनिक ठिकाणी (प्रामुख्याने छापील साहित्य व लेखी व्यवहारांच्या बाबतीत) इंग्रजीचा वापर अधिक होत आहे, हे दिसत असल्याने 'स्पर्धेत टिकण्यासाठी (!?) आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवले पाहिजे', ही भावना मराठी पालकांच्या मनात दृढ होत चालली आहे.

मराठी माध्यमांच्या शाळांना परवानगी न देण्याचे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पायघड्या घालण्याचे धोरण शासन अवलंबत आहे. स्थानिक भाषांतून शिक्षण घेतले असता चांगली कारकीर्द घडू शकते असा आत्मविश्वास निर्माण करण्यात शासन अयशस्वी ठरते आहे. उलट इंग्रजी माध्यमातील शिक्षणालाच महत्व प्राप्त होईल, पालक व विद्यार्थ्यांपुढे इंग्रजीशिवाय पर्यायच उरणार नाही अशी स्थिती केंद्र व राज्य शासन निर्माण करत आहे. याचा विपरित परिणाम अर्थातच मराठी भाषेच्या सार्वजनिक वापरावरही होतो आहे. मराठी माणूस स्वतःच आपल्या भाषेत बोलायला, लिहायला, वाचायला कमीपणा मानत आहे, फर्ड्या इंग्रजीमध्ये बोलण्यात, इंग्रजी तत्ववेत्यांचे दाखले देण्यात आपल्या ज्ञानाची धन्यता मानायला लागला आहे.

काय करायला हवं?


 • प्राथमिक शाळांमध्ये मराठी भाषेतच शिक्षण द्यायला हवे.
 • अभ्यासक्रमात मराठी भाषा, मराठी कला-संस्कृती-साहित्य यांबद्दल सखोल माहिती द्यायला हवी.
 • इंग्रजी भाषेचे उत्तम शिक्षण द्यायला हवे.

महत्वाच्या कल्पना


 • मराठी भाषा स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना
 • पदवीपर्यंतचे शिक्षण मराठीतून घेण्याची सोय
 • प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषा-कला-साहित्य-संस्कृती यांमध्ये शिष्यवृत्ती, संशोधनाच्या संधी
 • जागतिक पातळीवर मराठी साहित्य-संस्कृती संशोधनासाठी परदेशी विद्यापीठांशी संधान

कार्यक्रम


मराठी माध्यमाच्या ज्ञानकेंद्रांना प्रोत्साहन

मराठी भाषेतून ज्ञाननिर्मिती झाली, तरच मराठीतून शिक्षण देता येऊ शकेल आणि मराठी भाषा स्वतंत्र प्रभेसह टिकेल, विस्तार पावेल. ज्ञानभाषा ही संकल्पना समजून घेऊन मराठी भाषा राज्यभाषा कशी होईल यासाठी तज्ञ अभ्यासकांचे सहकार्य घ्यायला हवे. लोकभाषा ते ज्ञानभाषा अशा मराठीच्या प्रवासासाठी अर्थसाहाय्य करणे आणि कायदे, नियम व तरतुदी करणे, अशा सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने करायला हव्यात.

मुख्य म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळांना परवानगीच नाकारणारे आणि त्याच वेळी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पायघड्या घालणारे, त्या शाळांचे महत्व वाढवणारे धोरण रद्द करायला हवे. ज्या सक्षम, दर्जेदार, अनुभवी, कल्पक व उत्साही संस्थाचालकांनी मराठी माध्यमाच्या शाळेसाठी प्रस्ताव पाठवले आहेत, त्यांची योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेद्वारे छाननी करुन मराठी शाळांना त्वरित परवानगी देण्यात येईल. असंख्य मराठी शाळा स्थापन होऊन, त्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली तर ते मराठी भाषा व शिक्षणासाठी एक सुलक्षणच ठरेल. उगाचच प्रमाणाच्या बाहेर इंग्रजी शाळांना परवानगी देण्यात येणार नाही. इंग्रजी शाळांच्या परवानगीबाबत सढळ हात, अधिक सवलती आणि मराठीबाबत मात्र आखडता हात असे आमच्या राज्यात घडणार नाही. महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य व योग्य तो सन्मान दिला जाईल.

स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करणे आवश्यक आहे.

केवळ आणि केवळ मराठी भाषेचा सर्वंकष अभ्यास करणार्याय स्वतंत्र विद्यापीठाच्या स्थापनेची आवश्यकता आहे. भाषा विकासाची पुढील कामे या विद्यापीठाच्या माध्यमातून करता येतील.

शाळा, महाविद्यालये अशा विविध स्तरांवर मराठी भाषेचे शिक्षण कशाप्रकारे दिले जावे याबाबतचे संशोधन व नियोजन 'मराठी विद्यापीठातून' होईल. तसेच कृषी, विधी, सामाजिक विकास, ग्रंथालय शास्त्र, पत्रकारिता या शाखांसह अभियांत्रिकी, वैद्यकीय, संगणक व माहिती तंत्रद्न्यान, व्यवस्थापन... इत्यादी आधुनिक अभ्यासक्रमांतील सर्व विषयांचे शिक्षण मराठीतून कसे दिले जावे याबाबतचेही संशोधन व नियोजन या स्वतंत्र विद्यापीठाद्वारे करता येईल.

महाराष्ट्रातील विद्यापीठांत व शिक्षण संस्थांत मराठी भाषा शिकवणारे प्राध्यापक, शिक्षक आणि शिकणारे विद्यार्थी यांचे नियमित प्रशिक्षण या विद्यापीठाद्वारे होईल. जेणेकरुन भाषा विषयक संशोधन आणि अद्ययावत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल.

भाषाशास्त्र, व्याकरण, उच्चार शास्त्र यांचा अद्यतन अभ्यास विद्यापीठात होऊ शकेल.

मराठीच्या बोली हा भाषेच्या दृष्टीने एक महत्वाचा घटक आहे. भाषा विकासामध्ये या बोलींचे जतन हा एक महत्वपूर्ण भाग आहे. मराठीच्या बोली, महाराष्ट्रातील आदिवासी जमातींच्या बोली जतन करण्यासाठीचे प्रत्यक्ष कार्य आणि बोलींबाबतचे संशोधन, लेखन व प्रशिक्षण या विद्यापीठातून कार्यान्वित केले जाऊ शकेल.

मराठी भाषेची पहिली लिपी म्हणजे मोडी लिपी होय. भाषेच्या इतिहासात मोडी लिपीला अर्थातच महत्वाचे स्थान आहे. मोडी लिपीत मराठी भाषेतील प्रचंड, समृध्द असे एतिहासिक महत्वाचे साहित्य उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने आणि भाषा विकासाच्या दृष्टीनेही मोडी लिपी प्रशिक्षण व मोडी लिपीतील पुरातन कागदपत्रांचे देवनागरी लिपीत लिप्यंतर या दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत. मराठी विद्यापीठाच्या माध्यमातून या गोष्टी सहजगत्या होऊ शकतात. या विद्यापीठामध्ये मोडी लिपीचा स्वतंत्र विभाग स्थापन करुन संबंधित कामे करता येतील. मराठीच्या बोली व मोडी लिपीविषयी अधिक माहिती परिशिष्टात जोडली आहे.

इयत्ता ११ वी पासूनची विज्ञान व वाणिज्य शाखेचे मराठी अभ्यासक्रम तयार करणे; कृषी, विधी, सामाजिक विकास (MSM, MSW), ग्रंथालय शास्त्र; पत्रकारिता (वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या) या शाखा-विषयांचे पदविका, पदवी व पदव्यूत्तर शिक्षणाचे अभ्याक्रम सर्व विद्यापीठांसाठी निर्माण करणे; अभियांत्रिकी, वैद्यकीय, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन याही शाखांचे पदवी-पदव्यूत्तर स्तरावरील अभ्यासक्रम तयार करणे; तसेच वरील सर्व शाखांची अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे, अशी सर्व कामे मराठी विद्यापीठातून चालतील. हे अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू करण्यासाठीचा कार्यक्रमही विद्यापीठातून आखण्यात येईल.

इतर उपाय

'विज्ञान - अभियांत्रिकी – वैद्यकीय या शाखांसाठी मराठी अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके' या मुद्यांचा उल्लेख या टिपणात केला आहे. अशाप्रकारे ११ वी, १२ वी ची विज्ञान शाखेतील काही विषयांची पाठ्यपुस्तके पुण्यातील ज्ञानभाषा प्रकाशनाने निर्माण केलेली आहेत. 'मराठी काका' म्हणून स्वत:ला अभिमानाने संबोधणारे आणि त्याच नावाने लोकप्रिय असलेले प्रा. अनिल गोरे यांनी ही आश्वासक सुरुवात केली आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची पुस्तके तज्ञ व मराठी भाषाभिमानी प्राध्यापकांच्या सहकार्यािने तयार झाली आहेत. त्यांचा वापरही शेकडो विद्यार्थ्यांनी सुरु केला आहे.

या उपयुक्त उपक्रमाचा वेग व प्रभावक्षेत्र वाढायला हवे, असा आमचा विचार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमानुसार ११ वी व १२ वी ची विज्ञान शाखेची परिक्षा विद्यार्थी इंग्रजी, हिंदी, मराठी व उर्दू माध्यमातून देऊ शकतात. ज्ञानभाषा प्रकाशनामुळे मराठी माध्यमातून परिक्षा देणार्याल व मराठी पाठ्यपुस्तक वापरणार्याा विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

आम्ही ज्ञानभाषा प्रकाशनासारखा उपक्रम संपूर्ण राज्यभरासाठी मराठी विद्यापीठाच्या किंवा बालभारतीच्या माध्यमातून कार्यान्वित करायला हवा. यासाठी संबंधित प्राध्यापक – तज्ञांचे सहकार्य घेता येईल. प्रथम इयत्ता ११ वी, १२ वी चे विज्ञान-शिक्षण मराठी माध्यमातून घेतले की, अभियांत्रिकी-वैद्यकीय प्रवेश परिक्षा (सीईटी) विद्यार्थी मराठी माध्यमातून उत्तम प्रकारे देऊ शकेल आणि या शाखांत शिक्षण घेणार्याष मराठी विद्यार्थ्यांचे प्रमाण निश्चित वाढेल.

विविध स्तरांवरील मराठी भाषा अभ्यासक्रमाचा पुनर्विचार व अभ्यासक्रमाची पुनर्बांधणी करण्याची आज गरज आहे. वरील टिपणात सविस्तर दिलेल्या समस्यांचा विचार करता अद्ययावत व आधुनिक माहिती व ज्ञान मराठीमध्ये आणण्याचा विचार (व कृती) गांभीर्यातने करण्याची गरज आहे. या अनुषंगाने विद्यापीठ पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुन्हा जोमाने कार्यरत होण्याची गरज आहे. तसेच राज्य मराठी विकास संस्था व भाषा संचालनालय यांचीही कार्यक्षमता वाढण्याची आवश्यकता आहे. आम्ही या संस्थांच्या कार्यक्षमतेवर भर देऊ.

शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना संगणकाची सवय व्हावी या दृष्टीने सोप्या मराठी भाषेतून संगणकाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, तसेच युनिकोडप्रणित मराठी व इन्स्क्रिप्टचा कळफलकही शिकवणे फायदेशीर ठरेल. या दृष्टीने अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येईल आणि यासाठी आकर्षक पाठ्यपुस्तकेही तयार करता येतील. यासाठी तज्ञ व संबंधित संस्थांचे सहकार्य घेता येईल.

मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये उत्तम इंग्रजी शिक्षण आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये उत्तम मराठी शिक्षण या सूत्राचा अवलंब केल्यास अनेक समस्या सुटतील. इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये, सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये उत्तम दर्जाचे मराठी शिकविण्याची व्यवस्था केली जाणे आवश्यक आहे.

केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांतच नव्हे, तर मराठी माध्यमातही शिकवल्या जाणार्या 'मराठी भाषा' विषयाबाबत अधिक संशोधन व्हावे, तसेच शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण ही दिले जावे. तरच शैक्षणिक क्षेत्रातील आणि महाराष्ट्रीय जनजीवनातील 'मराठीचा दर्जा' कायम राहिल. त्याचबरोबर मराठी माध्यमाच्या शाळांतही उत्तम दर्जाचे इंग्रजी शिकविले जाणे, हा मुद्दाही महत्वाचा.

या शिक्षणातून मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्म या संकल्पना, महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास आणि मुख्य म्हणजे मराठी भाषेची समृध्दी विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित व्हायला हवी. या गोष्टी घडल्यास संभ्रमात पडलेल्या पालकांची व विद्यार्थ्यांची सुटका होईल आणि मुख्य महणजे मराठी भाषेचा विकास व विस्तार होऊ शकेल.

रोजगाराच्या संधी

जे विद्यार्थी पदवी किंवा पदव्यूत्तर स्तरावर खास मराठी भाषा-साहित्य हा विषय शिकत आहेत, त्यांच्यासाठी भाषांतर, संगणक-तंत्रज्ञान भाषा, संपादन व मुद्रितशोधन, प्रसारमाध्यमे, भाषिक क्षेत्रातील संशोधन, मोडी लिपीचा अभ्यास व लिप्यंतर, अध्यापन व स्पर्धा परिक्षा ...इत्यादी क्षेत्रांत चांगली संधी उपलब्ध आहे. याचा जोमाने प्रचार करता येईल. जेणेकरुन अशा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन पुढील काळातही याचा चांगला परिणाम साधता येईल.

मराठी भाषा आणि आर्थिक यांचा संबंध आणखी घट्ट करण्यासाठी मराठी विद्यापीठात (प्रस्तावित) किंवा विद्यापीठाच्या उपकेंद्रात पुढील छोटे-मोठे अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यशाळा किंवा पदविका अभ्यासक्रम याद्वारे विद्यार्थ्यांना मराठीतून शिकवण्याची सुविधा निर्माण करता येईल.

 • भाषांतर / अनुवादाचे प्रशिक्षण
 • प्रकाशन व्यवसायाचे प्रशिक्षण
 • ध्वनिपुस्तके, ई-पुस्तकांच्या निर्मितीचे प्रशिक्षण
 • छायाचित्रण, ध्वनिमुद्रण व चित्रीकरणाचे प्रशिक्षण
 • संकेतस्थळ (प्रामुख्याने मराठीतील) निर्मितीचे प्रशिक्षण
 • वृत्तवाहिन्यांमधील पत्रकारिता
 • संपादन व मुद्रितशोधन
 • भाषिक संशोधन, दस्तावेजीकरण व माहितीचे जतन (छाननी, डिजीटायझेशन...इत्यादी)
 • कार्यक्रम संयोजन (प्रामुख्याने मराठी सांस्कृतिक)
 • महाराष्ट्रातील गडकोटांचा अभ्यास
 • महाराष्ट्रातील पर्याटनाविषयीचा विशेष अभ्यासक्रम
 • विशेषत: भावगीत व नाट्यसंगीत या क्षेत्रांचा अभ्यास
 • मराठी खाद्यसंस्कृतीचा अभ्यास
 • महाराष्ट्रातील लोककलांचा व लोकसाहित्याचा अभ्यास
 • नाटक व चित्रपट निर्मिर्ती

हे सर्व अभ्यासक्रम मराठी भाषा व संस्कृतीशी संबंधित आहेत. यातून मराठी तरुणांना अनेक उपयुक्त विषयांचे प्रशिक्षण मराठीतून मिळेल, त्यांना अनेक संधी प्राप्त होतील आणि त्यातूनच मराठी संस्कृतीचा विकास साधता येईल. मराठी संस्कृतीचा प्रसार होण्याच्या दृष्टीने वरील अभ्यासक्रम परराज्यांतील व परदेशांतील जिज्ञासू विद्यार्थ्यांनाही इंग्रजी भाषेतून शिकवण्याची व्यवस्था करता येईल. परंतु मुळात मराठीतूनच हे अभ्यासक्रम तयार करण्याची गरज लक्षात घेऊन मराठीला प्रथम प्राधान्य देण्यात यावे.

मराठी शाळांना मान्यता, उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर स्तरांवरचे सर्व शाखांचे (विज्ञान, कला, वाणिज्य) शिक्षण मराठीत; अत्याधुनिक शाखांसह सर्व विषयांचे शिक्षण मराठीत, मराठी विद्यापीठाद्वारे शिक्षणाबाबतचे संशोधन व विकास आणि मराठीतून शिक्षण घेणार्यां्ना आर्थिक उत्पन्नाच्या संधी... या महत्वाच्या टप्प्यांद्वारे भाषा-शिक्षण विकास साधल्यास मराठीला ज्ञानभाषा होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही अशी आमची खात्री आहे.


Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.