प्रत्येक व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी, आपली प्रगती करण्यासाठी धडपड करावी लागते. व्यक्ती-व्यक्तींमधील परस्परसंबंध उत्पादन-व्यवहारामुळे निर्माण होतात. माणसे एकत्र येण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे. या निमित्ताने होणारे आर्थिक व्यवहार व देवाण-घेवाणीमुळे माणसा-माणसात नाती निर्माण होतात. माणसा-माणसांची कल्पकता, त्यातून निर्माण होणार्या संधी व नवीन मिर्मिती क्षेत्रं यामुळे समाजातील इतर घटकांवरही प्रभाव पडतो.
आणि या सर्वामुळे समाजाचा पाया रचला जातो, समाजाचा स्वभाव ठरतो.
नागरिकांना आपल्यात असलेल्या अंगभूत कौशल्यांचा वापर करता यावा, तशी संधी त्यांना मिळावी यासाठी समाजात न्याय प्रस्थापित असावा लागतो. समाजातील व्यवहारांची नीति-नियमांची चौकट सुरक्षित ठेवण्याची महत्वाची जबाबदारी शासनाची असते. समाज सुदृढ असावा, समाजाचा स्वभाव कसदार आणि प्रगल्भ बनावा यासाठी शासनाने पोषक वातावरण निर्माण करावे लागते.
प्रत्येक नागरिक स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मुळातच समर्थ असतो हा विश्वास ठेवून, शासनाची भूमिका ही उत्तम नियामकाची बनण्यासाठी काय करावे लागेल हे आम्ही या विभागात मांडत आहोत.
स्थानिक परिस्थितीला अनुसरून, स्थानिकांच्या कौशल्यांचा विचार करून तिथल्या उद्योगजकतेला वाव देण्यासाठी काय करावे लागेल, बाजार व्यवसथा कशी सक्षम करावी लागेल तसंच बाजार आणि शासन यांचे परस्पर संबंध कसे असायला हवेत, राज्यासाठी कृषी व पर्यटन क्षेत्र महत्वाचे आहे, त्याविषयीची मांडणी. आणि या सर्वाचा शिक्षणाशी कसा संबंध जोडता येईल हे सांगितले आहे.