जैवविविधता

जैवविविधतेच्या वैभवाने बहरलेला महाराष्ट्र !

जैवविविधतेच्या वैभवाने बहरलेला महाराष्ट्र !

महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती टिकेल, बहरेल यासाठी लोकांना बरोबर घेऊन विशेष प्रयत्न

महाराष्ट्र राज्य आधुनिकीकरण, औद्योगिक प्रगती, माहिती तंत्रज्ञान क्रांती यामध्ये अग्रेसर असला तरी, आपल्या निसर्गदत्त जैविक संपत्तीचे जतन करण्यात फारच मागे, किंबहुना नापासच झाला आहे. भौतिक संपत्ती, पैसे कमावण्याच्या नादात आपण झाडे, वनस्पती, पक्षी, जलचर यांचे आयुष्य नष्ट करत चाललो आहोत. आधुनिक होणे म्हणजे निसर्गाशी दुरावा घेणे नव्हे. आधुनिकीकरणाबरोबरच आपण निसर्गाशी जवळीक साधायला हवी. स्थानिक जैविक संपत्तीचे जतन व संवर्धन हे परिसरात राहणारे लोकच जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात हे कुणालाही पटेल. आता कायद्याने स्थानिक लोकांना वनसंपत्तीवर भक्कम हक्क मिळाले आहेत. या कायद्यामुळे जैविक संपत्तीचा शहाणपणाने, टिकाऊ पद्धतीने वापर करण्याची जबाबदारी स्थानिकांवर आली आहे. जुन्या चुका दुरूस्त करून भविष्यातील निसर्ग वैभवाने नटलेल्या महाराष्ट्राचे स्वप्न आपण सर्वांनी पहायला पाहिजे.

प्रश्नाचं स्वरूप


महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेलगतच्या अरबी समुद्रापासून ते पूर्वेच्या डोंगराळ प्रदेशांपर्यंत शेतजमिनी, जंगले, यांमध्ये पसरलेली झाडे, पशु, पक्षी, कीटक व पाणीसाठ्यांमधल्या वनस्पती आणि प्राणीमात्र हे सर्व म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जैवविविधता. या जैवविविधते मधल्या प्रत्येक घटकाचे निसर्गामध्ये एक विशिष्ट स्थान असते. हे सर्व जीव-जंतू निसर्गाचे चक्र अबाधितरित्या चालवायला मदद करतात. पण त्यांच्या कार्यभारामध्ये जर कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप झाला तर याचा त्यांच्यावर विपरित परिणाम होतो. तसेच यापैकी एक जरी जाती-प्रजाती नष्ट झाली तर नैसर्गिक चक्र बिघडते.

जैवविविधतेच्या दृष्टीने पश्चिम घाटाला विशेष महत्त्व आहे. जगातील समृद्घ जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो. भारतात सापडणार्‍या उच्च दर्जाच्या २७% वनस्पती (४,००० ते १५,००० जाती) इथे दिसतात. त्यांपैकी १,८०० जातींच्या वनस्पती केवळ याच प्रदेशात बघायला मिळतात. फुलपाखरांचे ३३४ प्रकार इथे आहेत. तसेच बरेच दुर्मिळ प्राणी देखिल पश्चिम घाटात आहेत. पक्ष्यांच्या १६ जाती ज्या जगात दुसरीकडे कुठेही सापडणार नाहीत त्या इथे आहेत. जगाच्या इतर भागांमधून दुर्मिळ किंवा नाहीश्या झालेल्या जवळजवळ ३२५ प्राण्यांच्या जाती इथे सापडतात. तसेच महाराष्ट्रात ७२० कि.मि. ची किनारपट्टी आहे, ज्यावर ८०,००० मच्छीमार कुटुंबांचा रोजगार चालतो. आपल्या या किनारपट्टीपैकी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला हे तालुके सागरी जैवविविधतेने संपन्न आहेत. इथे ३६७ सागरी वनस्पती व वन्यजीव प्रजाती आढळून येतात. यापैकी अनेक वर्ग १ मधील संरक्षित प्रजाती आहेत.

महाराष्ट्राची जैवविविधता ही नैसर्गिक समृध्दी खाण आहे. आपल्याच हितासाठी, निसर्गात आढळणार्‍या या प्रत्येक जीव-जंतू, प्राणी आणि वनस्पतींच्या विविध जाती-प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. जंगले, कुरणे, शेती, जलप्रदेश, नद्या यामधून सजिवांच्या विविध जाती, त्यामधील जनुकीय विविधतेसह जपलेला असतो. परंतु हाच जैवविविधतेचा वारसा, ही संपत्ती आज धोक्यात आल्याचे चित्र दिसते. जगाच्या पाठीवरची वाढती लोकसंख्या आणि प्रत्येकास आर्थिक महासत्ता बनण्याचा लागलेला ध्यास यामुळेच जैविक विविधतेचा र्‍हास होत आहे.

असं का होतं?


आज माणसाची औद्योगिकीकरण, शहरीकरणाच्या रेट्यात निसर्गात आढळणार्‍या विविध जाती-प्रजातींशी स्पर्धा सुरू आहे. यामुळे माणसाचा निसर्गामध्ये हस्तक्षेप वाढत चालला आहे आणि आपल्या राज्यातील जैवविविधता नष्ट होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पुरवण्यासाठी अवैध जंगल तोड मोठ्या प्रमाणात होत आहे यामुळे प्राण्यांची नैसर्गिक घरे (habitat) आणि अन्न साखळी नष्ट होत आहे. माणूस स्वतःच्या हव्यासापोटी वन्यजीवांच्या परिसरावर अतिक्रमण करत चालला आहे. यामुळे आता वाघ, बिबटे हे अन्न आणि पाणी शोधण्यासाठी गाव-वस्तीत येऊ लागले आहेत. यामुळे माणसांच्या, त्यांच्या संपत्तीला, पाळीव प्राण्यांच्या जीवनाला धोका तर पोचतोच आणि त्याबरोबर हे वन्यप्राणी स्वतःचा जीवालाही मुकतात.

पाश्चिमात्य पद्धतीचे अनुकरण केलेले जीवनमान, गतिमान जीवनशैलीमुळे, आपल्या "वापरा व फेकून द्या" (use and throw) या वाढत चाललेल्या वृत्तीमुळे वस्तूंचे महत्व जाणून त्या पुन्हा पुन्हा वापरणे बंद झाले आहे. जमिनीवरचा कचरा, नद्या-समुद्रांमधले सांडपाणी यांमुळे तिथल्या वनस्पती, प्राणी, मासे आणि त्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती नाहीशा होत चालल्या आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांनी स्थानिक भारतीय लोकांचे निसर्ग-संपत्तीवरचे सर्व हक्क हिरावून घेतले, व ही संपत्ती स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी वापरून घेतली. देशातली वनसंपत्ती काडीमोलाने उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्याची कायदा-व्यवस्था लावून दिली. हेच पुढे चालत राहिले, व आपले लोक आपल्याच वन संपत्तीची किंमत करणे आज विसरून गेले आहेत.

स्थानिक लोकांचा आवाज दाबला जाऊन उपटसुंभ्या उद्योजकांच्या बाजूने कायदे करणार्या सरकारी कारभारामुळेच आज ठिकठिकाणी राज्याच्या जैविक संपत्तीचा र्‍हास झाला आहे व होतो आहे.

काय करायला हवं?


 • राज्यात स्थानिक शासन पातळीवर जैविक संपत्ती संरक्षणाचे कायदा-अधिकार, कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा ठोठावण्याची तरतूद अशी संपूर्ण व्यवस्था करायला हवी.
 • नदी, समुद्र प्रदूषण पूर्णपणे रोखण्यासाठी कारखान्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सक्ती केली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याच्या उद्योग-धोरणाप्रमाणे तेथील जैविक संपत्ती संरक्षणाचे कायदे - नियम हे वेगवेगळे केले गेले पाहिजेत. काही जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने जैविक संपत्ती संरक्षण करायचे असेल तिथे विशिष्ट प्रकारच्या कारखान्यांना मनाई केली जाईल. उदा. जागतिक दर्जाच्या सौंदर्यपूर्ण ७२० कि.मी. च्या कोकणकिनारपट्टीवर कोणतेही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प बांधण्यास मनाई केली जाईल.
 • वने, जंगले, प्राणीजीवनात व्यत्यय न आणता, त्यांचा परिसर सुरक्षित ठेऊन मगच आपण आपला भौतिक विकास केला पाहिजे. आपण त्यांना सुरक्षित ठेवले तर त्यांचा आपल्याला अनेक प्रकारे चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो.
 • अन्नसाखळीतील सर्वांत वरच्या पातळीवरच्या वाघासारख्या प्राण्यांचे संरक्षणासाठी त्यांची आवश्यक नैसर्गिक घरे (habitat) जपायला हवी. त्याचबरोबर या प्राण्यांना लागणारे त्यांच्या अन्नसाखळीतील खालच्या पातळीवरचे असलेले प्राणी व त्या प्राण्यांना लागणारे खाद्य (गवत, वनस्पती) या सगळ्याचे संवर्धन केले पाहिजे. वाघासोबतच विविध वनस्पती, इतर प्राणी, पक्षी यांचे अधिवास टिकून राहतील यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. म्हणून व्याघ्र प्रकल्पासारखे प्रकल्प योग्य रीतीने आणि मोठ्या प्रमाणावर राबवायला पाहिजे. तसेच प्राण्यांचे एका जंगलातून दुसर्यान जंगलात जाण्यासाठी ठराविक मार्ग असतात. माणसांच्या अतिक्रमणामुळे ते हरवले आहेत. ते मार्ग शोधून त्यांचा पुनःनिर्माण केला पाहिजे.
 • यापुढे त्यांचे भवितव्य व माणसाचे अस्तित्व हे एकमेकांशी निगडित आहे हे आपण ओळखले पाहिजे. आपण आपले हितसंबंध निसर्गाशी घट्ट जोडले पाहिजेत व त्यांच्या बरोबरचे आपले सहजीवन आपण अंगवळणी पाडले पाहिजे.
 • वनस्पतींच्या संवर्धनास लोकांचा सहभाग वाढवला पाहिजे व त्या वनस्पतींचे पारंपारिक ज्ञानाचा वारसा पुढे नेला पाहिजे. आपल्या शेकडो वर्षांच्या वैद्यकशास्त्र परंपरेला धरून आज आपण दुर्मिळ औषधी वनस्पतींचा उपयोग वाढविला पाहिजे.

महत्वाच्या कल्पना


 • परिसरातील जैविक संपत्ती जोपासण्यासाठी स्थानिकांना कायदा-अधिकार
 • त्या त्या जिल्ह्यातील विशिष्ट जैविक संपत्ती लक्षात घेऊन तेथील उद्योग-धंद्यांचे नव्याने धोरण आखणी
 • प्राणी, वनस्पती जिथे आहेत त्या जागेवर त्यांचे संवर्धन
 • जागतिक दर्जाचे "सह्याद्री जैव-विविधता केंद्र
 • लोणारला जैव विविधता संशोधन केंद्र

कार्यक्रम


स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समितीची स्थापना

जैवविविधतेचे स्थानिक पातळीवर नियोजन करणे गरजेचे आहे. जैवविविधता कायदा २००२ व जैवविविधता नियम २००४च्या अंतर्गत प्रत्येक स्थानिक संस्थेला एक जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. या कायद्यानुसार स्थानिक जैवविविधता व त्याच्या उपयोगांची नोंदणी हे या स्थानिक समित्यांद्वारे केले जाईल. या कायद्यात जैवविविधतेच्या संवर्धनाच्या तरतूदी आहेत, त्यांची अंमलबजावणी नीट केली जाईल.

निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन

वनाचे व तिथल्या जैवविविधतेचे संवर्धनासाठी व नागरिकांमध्ये वनाचे महत्त्व कळण्यासाठी निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे स्थानिक रोजगार देखील निर्माण होतील.


Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.