विकास आराखडा बनवताना...

विकास आराखडा बनवण्याला सुरूवात केली ती ऑगस्ट २००८ पासून. पण ती सुरूवात म्हणजे फक्त सुरूवात असेच म्हणावे लागेल. कामाने खरी गती पकडली ती २०११ पासून.

विकास आराखडा म्हणजे नेमके काय ? त्याची व्याप्ती काय असावी? पुढच्या किती वर्षांचा विचार करून आपली योजना मांडावी? नेमके कुठल्या विषयांचा विकास आराखडा असावा? या सर्वांची उत्तरे शोधत, मांडत, ती बदलत आणि परत मांडत असा हा सगळा प्रवास झाला.

आराखड्याची व्याप्ती ठरवताना त्यात प्रश्नाचे स्वरूप, आज काय घडते आहे याचा सविस्तर मागोवा घेत, तसे का होत आहे याचे विश्लेषण करून उपाय योजनांकडे वळायचे असे ढोबळरित्या ठरवले खरे. पण प्रश्नांतून प्रश्न निर्माण होत गेले. आणि उत्तरं मिळण्याऐवजी नवीनच प्रश्न पडत गेले.

प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची सुरूवात ही वाचनातून झाली. त्या त्या विषयातले साहित्य –

वर्तमानपत्रातले लेख, मग अभ्यासू नियतकालिकांमधले लेख व संशोधन प्रबंध, संबंधित शासकीय यंत्रणेचे अहवाल व अभ्यास, त्या त्या विषयातल्या गुरूंचे मूळ लेखन, आज जगात या विषयाबद्दल काय लिहीले, बोलले जाते आहे याचा मागोवा – असा माहिती गोळा करण्याचा बराच मोठा काळ गेला. इतका की हाती काहीच लागले नाही की काय अशी शंका निर्माण व्हावी!

विकास आराखड्याची सुरूवात केली ती १५ ते २५ वर्षाचा कालावधी डोळ्यासमोर ठेवून. या कालावधीचा विचार करताना तीन टप्पे ठरवले – ५ वर्षांचा थेट कृती आराखडा, १० वर्षांची उद्दिष्टे आणि २५ वर्षाचे धोरण. हे करताना असं लक्षात आलं की आपल्याला भविष्यात करावयाच्या योजना देणे अवघड आहे. कारण जग इतके बदलते आहे की पुढे काय घडणार आहे हे आपण सांगूच शकत नाही. आणि नेमक्या योजना देणे ही तर कसरतच होत आहे. आणि मग एकदा मा. राजसाहेब म्हणाले – ब्रिटीशांनी १०० वर्ष टिकतील अशा सुविधा भारतात निर्माण केल्या. आपण पुढच्या १०० वर्षांचा विचार करू या!

यातून एक झाले –

आम्ही प्रत्येक विषयात खोलात जात राहिलो. प्रत्येक समस्येचे मूळ शोधत राहिलो. आणि त्यातूनच खरी दिशा मिळाली. पुढची १०० वर्ष प्रगती करणार्‍या महाराष्ट्राची पायाभरणी करायची असेल तर काय करावे लागेल हे समजत गेले.

या दरम्यान काही विषयांवर भरपूर काम झाले, काहींवर थोडे, पण तरीही बर्‍यापैकी काम झाले. पण एक झाले – पक्षाचा स्वत:चा एक गट तयार झाला. आज कुठल्याही पक्षाकडे असा अभ्यास करणारा गट नसेल. महाराष्ट्रात तर नाहीच, भारतातही नाही! अगदी देशाच्या पहिल्या राजकीय पक्षाकडेही नसेल! याचा आम्हाला अभिमान आहे.

या आराखड्यात मांडलेल्या बर्‍याच गोष्टी आपण नव्याने सांगत नाही आहोत. यातले बरेच उपाय आज जगात बोलले जात आहेत. जरा थोडा, थबकून विचार केला, प्रत्येक प्रश्नाची कारणमिमांसा शोधली तर आपल्यालाही तेच उपाय सुचतील. ते उपाय आपण केले पाहिजेत याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीच शंका उरली नाही. पण तरीही, आज आपण ते करण्यापासून का लांब आहोत, हा प्रश्न आम्हाला वारंवार त्रास देत गेला. आणि एक समजलं. आपण आज आपली सदसदविवेकबुद्धी घालवून बसलो आहोत. ती नसेल, तर या आराखड्यातली एकही गोष्ट आपण करू शकणार नाही. ती सदसदविवेकबुद्धी परत कशी मिळवायची याचा आराखडा मात्र आम्ही बनवू शकलो नाही.

ही खंत मनात आहे.

हे काम न संपणारे आहे हे निश्चित. हा आराखडा खुला झाल्यावर आमचा छोटा अभ्यासगट विस्तारणार आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक यात काही भर घालणार आहे असा आमचा विश्वास आहे. आणि या प्रक्रियेतूनच हा आराखडा अधिक परिपक्व बनेल, महाराष्टाचे भविष्य घडवेल, अशी आमची धारणा आहे.


Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.